लेण्याद्री – अष्टविनायकांमधील सहावा गणपती
लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. हा अष्टविनायकांमधील सहावा गणपती आहे. हे ठिकाण पुणे नाशिक हायवे वरील – चाकण – राजगुरुनगर – नारायणगांव – जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे.
गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात ३० लेण्या आहेत, त्यातील ८ व्या लेणीत गिरिजात्मकाचे मंदिर आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते. हा ३० बौद्ध लेण्यांचा समूह आहे.
कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. देवळात येण्यासाठी ३०७ पायरया चढाव्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती मंदिर आहे.
सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखडय़ावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.
२६ लेण्या ह्या स्वतंत्र क्रमांकाच्या असून दक्षिणाभिमुख व पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमांकित आहेत. लेणी क्रमांक ६ आणि १४ चैत्यगृह तर बाकी बौद्ध भिक्खूंची निवारागृहे आहेत. उर्वरित निवारागृहे आणि छताच्या स्वरुपात आहेत.लेण्यावर पुष्कळ पाण्याचे टाके देखील आहेत. पैकी दोन टाक्याजवळ शिलालेख मजकूर आहे. या लेण्यांची निर्मिती पहिल्या ते तिसऱ्या शतकाच्या दरम्यान झाली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले.
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti