महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,931

लेवा संस्कृती भाग १

Views: 3441
21 Min Read

लेवा संस्कृती भाग १ –

संस्कृती शब्द “संस्कार” शब्दापासून तयार झाला आहे. संस्कार म्हणजे काय? संस्कृर्त म्हणजे शिजवणे संस्कार पूर्ण करणे. पदार्थात नविन गुणधर्म तयार करणे म्हणजे कर्मांना बांध घालणे, कर्मांचा मनावर परिणाम “प्रकृती विशिष्टं चातुर्वर्ण संस्कारविशेषाच्च ” निर्माण करणे.(लेवा संस्कृती)

चातुर्वर्ण्य व्यवस्था जन्मावर व संस्कारावर बसवलेली आहे आहे असे वसिष्ट्यधर्मसूत्र म्हणते. प्रकृती विशिष्ट म्हणजे जन्मावर अवलंबून असणे. नंतर प्रत्येक ऋषींनी आपापल्या धर्मसूत्रात वेगवेगळी व्याख्या केली आहे. संस्काराचा उद्देश काय तर दोष नाहीसे करून गुण उत्पन्न करणे आणि गुण निर्माण झाल्याशिवाय पुरूषार्थाची सिध्दी होत नाही. संस्कारांनी बीजविषयक व गर्भविषयक दोष नाहीसे होतात. या सर्व बाबींचा नंतरच्या काळात मोक्ष, पुण्यांशी जोडल्या गेल्या. सोळा महत्त्वाचे संस्कार आहे. जे मुख्यतः जन्ममृत्यू, विवाह, विद्यार्जन, गृहस्थाश्रमांच्या संस्थेशी या घटनांशी जोडलेली आहेत. हे झाले संस्काराविषयी, इंग्रजीत मात्र हाच शब्द कल्चर असा आहे.

जागतिक विचारवंतांनी मात्र संस्कृती शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे. संस्कृती म्हणजे जगण्याची पध्दत यात दोन मुख्य बाबी येतात. एक अतिभौतिक म्हणजे जगण्याला आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानासारख्या वस्तू ज्यात अवजारे, शस्रे , भांडीकुंडी, स्थापत्य, चलनवलन व त्यासाठी लागणारे आवश्यक साधने थोडक्यात म्हणायचे तर अन्न, वस्र, निवारा यासाठी लागणारी सामुग्री दुसरे आहे. भौतिक यात जगण्याला लागणाऱ्या आवश्यक आचार, विचार, तत्वज्ञान, कार्यकारणभाव, श्रद्धा, कला साहित्य ज्यात रोजच्या व्यवहारात जरूरी आहेत व रोजचे काम, भिती, ताण या बाबी सुसह्य करतात. काही व्यवहार व सामाजिक प्रथा, सण, समारंभ इत्यादि सामाजिक बाबी होत.

संस्कृती शब्द खरे थर मानववंशशास्राचा आहे, ज्यात भौतिक बाबींचा, मानवी सामाजिक जिवनाशी संबंध व अभ्यास आहे. या संकल्पनांमध्ये धारणा, मिथके, तत्वज्ञान, साहित्य, कला , शास्त्र, शिक्षण, वागणेबोलतणे खाणेपिणे यासंबंधीची रीती पध्दती, श्रद्धा शरीराचे बदल कपडेलत्ते दागिने व इतर जगण्याची बाबींचा समावेश आहे.

मार्क्स आणि क्रिटीकल थेअरीनुसार संस्कृतीचा वापर कायम राजकीय फायद्यासाठी केला गेला आहे. भारतीय बाबतीत हेच लागू पडते. चातूर्वण्य व्यवस्थेत चारही वर्णाचे संस्कार वेगवेगळे आहेत. तर क्षूद्रांना संस्काराचा हक्क नव्हता, ही व्यवस्था गुलामगिरी पेक्षा वेगळी म्हणता येणार नाही. या व्यवस्थेत उच्चवर्गाने व राज्यकर्त्यांनी संस्काराचा उपयोग हत्यार म्हणून केला. इतिहासातील अनेक घटना त्याला साक्षी आहेत. त्या वर्गात एक प्रकारे आभासी जाणिवा तयार झाल्या. ज्याला इंग्रजीत फार्ल्स कान्शसनेस म्हणता येईल जसे की पापपुण्याची, स्वर्गनरकाची भिती हे शोषण पिढ्यानपिढ्या एवढे भिनले की जणू आनुवंशिक आहे असे वाटायला लागले. त्यामुळे संस्कृतीचे गोडवे गाण्याआधी संस्कृती म्हणजे काय ते समजून घेणे जरुरीचे आहे. संस्कृती म्हणजे एक संच किंवा संघ जो परंपरा, रूढी, नैतिक मुल्यांचे बंधन समाजासाठी तयार करतो.

काही तज्ञांच्या मते ” जगण्याचा प्रत्येक मार्ग रीत ज्यात मनुष्य प्राणी स्वत:तील रानटीपणावर मात करतो. आणि कृत्रिम मार्गांनी चांगला माणूस होतो.” Culture हा शब्द cult म्हणजे धार्मिक गट किंवा नैसर्गिक अवस्था यापासून बनला आहे. एखाद्या व्यक्तीला आपण सुसंस्कृत किंवा well cultured  आहे असे म्हणतो.

संस्कृतीच्या खुणा शोधायच्या कशा? हाच मूळ प्रश्न पडतो. शरीरशास्राच्या अभ्यासातून डी.एन.ए. ही जनुकिय अभ्यासाच्या तुलनेतून आपण कुठल्या वांशिक गटाशी संबंधित आहेत ते समजते. मानववंशशास्रात ही एक वेगळी शाखा आहे. दुसऱ्या मार्ग आहे भाषेचा भाषाशास्राच्या अभ्यासातून कुठल्या भाषांचा प्रभाव दिसून येतो ते समजते.

लेवा संस्कृती या व्याख्येत कशी बसते ते बघतांना लेवा गण हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे. गणतंत्र व्यवस्था यातून सुचित होते. गणराज्यव्यवस्थेतील काळातील एक गण असू शकतो. यात एक महत्वाची शक्यता, प्रत्येक संस्कृतीत गृहीत धरायला पाहिजे ती म्हणजे स्थलांतर याची वेगवेगळी कारणे असू शकतात. एक युध्द, दुसरे नैसर्गिक आपत्ती जसे महापूर, दुष्काळ अन्नधान्याची कमतरता म्हणून. सुपीक सुफल देशाकडे ओघ असतो. समृध्दी आणि उद्योगधंदे विद्याभ्यास यासाठी लोक स्थलांतर करतात. यातून इतर लोकांशी संबंध येतो भांडणतंटे, मैत्री व्यापार होतो तेव्हा संस्कारांची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास दोन्ही वेगवेगळ्या करून करता येत नाही.

लेवा गण बोली ही भाषा कशी तयार झाली असा प्रश्न केला तर  मध्ययुगातील मराठी,  मराठीच्या आधीची महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत, फारशी, हिंदी, उर्दू , गुजराती, अहिराणी यांचा समावेश आणि प्रभाव दिसून येतो. काही राजस्थान आणि मारवाडी शब्दही दिसतात. वेगवेगळ्या काळातील स्थलांतरे, आक्रमणे आणि पाहुणे यांचा प्रभाव सहज दिसून येतो.

दुसऱ्या बाजूला प्रभाव दिसतो तो खाद्यसंस्कृती आणि स्थापत्यकलेवर आणि धार्मिक बाबतीत सुध्दा होय. ही पध्दतीत सुध्दा सळमिसळ सहज दिसून येते. उदाहरणार्थ पाचशे वर्षांपूर्वी शहादा प्रकाश येथे विठ्ठल मंदिर लेवा पाटलांनी बांधले असा उल्लेख आहे. मात्र मंदिराच्या आवारात असलेल्या स्तंभ आणि त्यावर राधाकृष्ण मूर्ती आहे. गोकुळाष्टमी ला होणारे गोफनृत्य ही परंपरा गुजरात मधून नंदुरबार मार्गे खानदेशात हा समाज स्थिरावला याचा पुरावा आहे आणि प्रकाशे जे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते तिथे अनेक धर्म पंथांची देवळे आहेत तिथे आपल्या समाजाचे मंदिर आणि धर्मशाळा असावी असे वाटणे स्वाभाविक आहे.

जन्म, मृत्यू आणि विवाह यातील प्रथांमधून संस्कृतीच्या खुणा शोधायच्या असतात.

समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर विचार करण्याची पध्दत, आचारांची पध्दत, भौतिक अध्यात्मिकता, नियम, रूढी, भाषा याविषयीचे संस्थाकरण, समाजाची मानसिकता, आर्थिक हितसंबंध, भौगोलिक परिस्थिती ही सगळी कारणे येतात.

आचार आणि विचारांतून लेवा समाज भावनिक दिसतो. त्यांनी स्विकारलेल्या व आचरीत असलेल्या पंथाचा विचार करता महानुभाव, वारकरी, सत्पंथ, स्वामीनारायण आणि इतर पंथांचा अनुयय केलेला दिसतो. ही भावनीकता आहे पण त्याच बरोबर नाईलाज आहे, असे म्हणता येईल. कारण भौगोलिक आणि आर्थिक गोष्टी जुळवून घेताना ही तडजोड करावी लागते.

अगदी सुरवातीच्या काळात भारतावर आक्रमक करणाऱ्या शक, क्षत्रप, हुण राजांनी इथले धर्म स्वीकारला आहे असे दिसते. भौतिक संस्कृतीचा विचार करतांना मात्र लवचिकता आणि प्रयोगशिलता ही उद्योगधंदे आणि शेतीत दिसून येते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे खाण्यापिण्याची बाबी आणि सवयी ह्या भौगोलिक परिस्थिती वर जास्त अवलंबून असतात आणि आर्थिकदृष्ट्या सुध्दा खाद्यसंस्कृती हा संस्कृतीच्या अभ्यासाचा महत्वाचा भाग आहे. राजस्थानची दालबाटी, गुजरात मधील शेंगदाण्याचा आणि गुळाचा मुबलक वापर महाराष्ट्रातील तिखटपणा यांच्या मिश्रणाने लेवा खाद्य संस्कृती तयार झाली आहे. राजकीय स्थलांतर आणि लेवागणबोलीवर एकही ग्रंथ नाही. तसेच इतर ग्रंथात उल्लेख नाही किंवा धार्मिक आद्यग्रंथ नाही. पावागडची भवानी कुलदेवता आहे एवढेच कळते.

त्यांचा मुळ पुरुष लव होता असा बादरायण संबंध काही तज्ञ लेवा शब्दावरून लावतात तर काही रेवाचा अपभ्रंश लेवा झाल्याचे सांगतात. काही लक्ष्मण हा मुळ पुरुष असल्याचे सांगतात.  अक्षयतृतीयेला बारा गाडे ओढण्याची प्रथा हे लोक बारा गाड्यांमधून इकडे आले म्हणून आहे. असे काही अभ्यासकांचे मत आहे. गावातील काली किंवा भवानी मातेला या दिवशी बळी देण्याची प्रथा आहे. आता बंद झाली. मात्र ही प्रथा पावागडशी संबंध आणि मातृसत्ताक लोकांशी संबंधित आहे. लव आणि लक्ष्मणाशी संबंध भारतातील सगळे कुळे रामायण आणि महाभारत यांच्याशी येवून थांबतात तसेच दिसते.

लेवापुराण या ग्रंथात लेवागुजर हे सोमवंशीय आहे असे म्हटले आहे. गोत्र कश्यप आहे, पुत्र लेहक यापासून लेवा व बळीचा भाऊ भद्र यापासून पुत्र कैटभ म्हणजे कडवा अशी आख्यायिका सांगितली जाते तर काही रणथंबोर येथून आलो हे सांगतात. पावागड, चंपानेर येथून आले असे मानतात.

दुसरा दुवा गुर्जर प्रतिहार राजे जे सातव्या ते अकराव्या शतकात कनौज भागात राज्य करीत होते. त्यांच्या नाण्यांवर वराह कोरलेला आहे. जो हुण या राजवंशाच्या काळात दिसतो. क्षत्रप, हुण, किंवा अभीर, गुर्जरप्रतिहार यांचे कुणाशी संबंधित होते, याचे ना वाङमयीन पुरावे आहेत ना स्थापत्य व शिलालेख त्यामुळे अर्धवट माहिती मिळते.

दुसरा एक पुरावा म्हणजे भाटांकडील नोंदी हा होय. चोपडा येथील भाटांच्या नोंदीनुसार नंदुरबारमार्गे इसवीसन १२३४ मध्ये खानदेशात आले. अहमदाबाद आणि बडोदे परिसरातून आलेत. कान टोचणे, रोटपूजा, देवाचा दिवस, नागपंचमी, आखजी हे सण साजरे केले जातात तर आखजीला पुर्वजांचे स्मरण म्हणून घागरी भरण्याची पद्धत आहे. कुणबी म्हणजे जमीन कसणारी कुळे व पाटीदार म्हणजे पट मोठे शेत होय. मोठे शेत धारण करणारा असा अर्थ काही काढतात पण पाटील..पट्टेदार म्हणजे शेतीची पट्टी वसूल करणारा होय.

देविसिंग चौहानांच्या मते इराण- खैबर खिंड-हिंदुस्थान-राजस्थान-पंजाब -मध्यप्रदेश-गुजरात – खानदेश असा प्रवास आहे. उज्जैन, मंदसौर, निमाड या मध्यप्रदेशातील भागातही वसती होती आहे. राजस्थानातील राजपूत टोळ्यांनी हिसकल्यावर चितोडगड, मल्हारगड, काठेवाड मार्गे गुजरात आणि रेवानदीकाठी स्थायीक झाले म्हणून अपभ्रंश लेवा झाला. असाही एक मतप्रवाह आहे.

कुठल्याही एकट्या जमातीचा वेगळे काढून इतिहास लिहिता येत नाही, कारण घटना एकमेकांशी संबंधित असतात. समाज हा एकमेकांच्या हितसंबंधी गुंतागुंतीची वीण असते. परस्पर अबलंबून असतात कधी तंत्रज्ञानासाठी व्यापारासाठी आणि जिवनावश्यक गरजांसाठी सुध्दा होय. असा दृष्टिकोन बाळगणे आणि तसे प्रयत्न करणे म्हणजे वर्तमानाची व्यवस्थीत बसलेली घडी विस्कटून टाकले असे होते. संपूर्ण मानवजातीच्या इतिहास आणि प्रदेशाचा इतिहास असू शकेल. म्हणून ज्या जमाती स्थलांतरीत झालेल्या आहे त्यांच्यासोबत बसावे लागते. त्यांच्या विस्थापनाच्या स्थलांतराच्या वेगळ्या कथा मात्र असू शकतील. काही परंपरा चांगल्या तर काही काळाच्या ओघात वाईट ठरलेल्या असतील.

दुसरी खूप महत्वाची बाब म्हणजे स्थलांतर होय. हे अचानक फक्त आणीबाणीच्या काळात तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात होते. ऐरवी स्थलांतर ही एक संथपणे होणारी क्रिया आहे. अतिरिक्त नागरीकरणामुळे होणारे नैसर्गिक स्रोतांचे संपून जाणे. प्रगतीच्या उर्जेच्या दिशेने माणूस नेहमी जात असतो. येथे कामधंदा, नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणी सुपीक जमीन, कुरणे आदी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात तेव्हा माणूस तिकडे ओढला जातो. राजकीय कारणे असू शकतात जसे युध्द, धार्मिक तंटे इत्यादि ही कारणे परंपरांमधून डोकावताना दिसतात जसे की अक्षयतृतीयेला बारा गाडे ओढण्याची प्रथा दिसते.

दुसरा मुद्दा हा की कुणाचे वंशज आहेत? भारतातील प्रत्येक जण सोमवंशी (चंद्रवंशी) वा सुर्यवंशी (राम) राजांशी संबंध जोडतो.  काही राजघराणी  अग्नीकुलोत्पन्न असल्याचे सांगतात. या दोन घराण्यांच्या व्यतिरिक्त इतर वंश नव्हते का हा साहजिक पडणारा प्रश्न आहे. सुबुद्ध माणसे आपण कुणाचे वंशज आहोत असा वृथा अभिमान बाळगण्यापेक्षा वर्तमानाची व्यवस्थीत परिस्थिती समजून घेतात असो.

शंकर पाटील आणि नी. रा. पाटील यांनी यावर आपल्या पुस्तकातून चर्चा केली आहे. भविष्यात अधिक सखोल अभ्यास करून या प्रकरणी अधिक तपास करता येईल. “समाज किती परिवर्तशील आहे” हे जास्त महत्वाचे असते. ही प्रक्रिया एकट्याची नसते. टोळीतल्या प्रत्येकाच्या भाकरीची काळजी करावी लागते पण नेमकी ही टोळीतील उदात्त मानसिकता विसरली गेली आणि काही लोक एसी गाडीत तर काही अजूनही मजूर अशिक्षित आहेत.

लेवे शब्दाचा अर्थ दर्भाचा मागचा भाग असा होय. लव शब्दाचा संस्कृत अर्थ कापणे असा आहे. इतर यूरोपीय भाषांमध्ये लेवे शब्दाचा अर्थ हलका, not heavy असा आहे.

इतिहास संशोधनाच्या दृष्टीने वास्तव शोधायला पुरावे लागतात. साधने तटस्थपणे तपासणी करून घ्यावी लागते. लेवा पाटील यांच्या इतिहास मांडणीसाठी काय साधने उपलब्ध आहे, याचा आढावा घेतला तर मौखिक परंपरा आणि प्रथांना महत्व आहे. कारण कुठल्याही लिखित स्वरूपात अस्तित्वात नाही.

भारतातील इतिहासात मौखिक वाडमयात कुठेही उल्लेख नाही तर बरेचसे साहित्य रामायण, महाभारतात, पुराणात, बौध्द, जैन साहित्यात उल्लेख नाही. त्यांच्या काही मौखीक परंपरा काळाच्या ओघात संपून गेल्यात. लग्नातील गाणी कुणीही जतन केल्याचे उल्लेख नाही.

लेवापुराण हा ग्रंथ सन १९१८ मधील आहे. त्यात राजा बळी व त्याचा पुत्र लेहक यापासून लेवा पाटीदार आणि बळीचा भाऊ भद्र याचा पूत्र कैटभ यापासून कडवा अशी वंदता आहे. तसेच सिकंदराने स्वारी केली. तेव्हा मथुरेच्या पश्र्चिमेला लेहकपूर नामक गावी लेवा वंशाची वसाहत होती. त्यातील सैनिक मथुरेच्या मदतीला आले होते. अजून एक उल्लेख अजय नावाच्या राजाने लेवा वंश गुजरातेत वसविले. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी वाटतात. एकदा सुर्यवंशी रामाशी संबंध तर दुसरीकडे चंद्रवंशी बळीशी संबंध त्यामुळे लेवा गण हा स्वतंत्र विचार करायला हवा.

चिनी प्रवासी युआनश्वांग हा इसवीसन सहाशे चाळीस मध्ये लिहितो की गुजरात मध्ये वृधनगर या भागात लेवा व कडवा लोकांची वसती होती. म्हणजे म्हणजे सहाव्या शतकात गुजरात मध्ये स्थीर होते. एवढे नक्की. भाटांच्या नोंदीनुसार राजस्थानशी सुध्दा संबंध येतो. सहाव्या शतकाच्या आधी कुठे होते असा प्रश्न पडतो.

गुर्जर राजांशी व टोळ्यांनी संबंध सांगितला जातो. काही इतिहासकारांच्या मते पाचव्या शतकातील इसवीसन ५१० मध्ये हुण टोळ्यांनी भारतावर आक्रमण केले. त्यांच्याबरोबर आलेल्या टोळ्यांमध्ये गुर्जरांच्या काही टोळ्या होत्या. गुर्जर ही पशुपालक जमात पंजाब, हिमाचल प्रदेश, बुंदेलखंड, राजस्थान, गुजरात, काश्मीर,व उत्तर प्रदेशात पसरली.

डॉ.भांडारकर आणि स्मिथच्या मते युरोप आणि आशिया सीमेवरील खर्गर लोक हेच गुर्जर असावेत. त्यांचा प्रवास मध्य आशिया व्हाया जॉर्जिया, कॅस्पीयन समुद्राच्या मार्गाने झाला असावा. बॅक्ट्रीया (इराण) मधील बहर ए खिजार चा अपभ्रंश गुजार -गुर्जर असा असावा. पण चि. वी. वैद्य आणि ओझा यांच्या मते गुर्जर हा एक प्रदेश असावा. यात जोधपूर, जयपूर, अलवार व मेवाडचा उत्तर भाग समाविष्ट होता. हे लोक पशुपालक होते. व नंतरच्या काळात शेतीकडे वळल्यावर कुणबी हे बिरूद लागले.

हुण हे Hepthathalits हे इसवीसन ४५० ते ५६० मध्ये इराणमार्गे आले. हेच हुण श्वेत हूण होते का याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. पण भारतात तुरूमाण या राजाने इसवीसन ४५६ मध्ये स्कंदगुप्त या गुप्तराजाला हरवून एरण हे मध्यप्रदेशातील शहर त्याच्या राज्याला जोडले. त्याच्या राज्यात माळवा, खानदेशातील पश्र्चिम भाग होता. हे ऐरण येथील शिलालेखात आणि गुजरात मधील सांदेली ताम्रपटातील उल्लेखावरून कळते. खैबर, पाक्ताख्वा, सीयालकोट, अफगाणिस्तान हा प्रदेश त्याच्याकडेच होता.

सहाव्या शतकात यशोवर्मन व नरसिंह वर्मनने त्याला हरवले व सियालकोट ही त्यांची राजधानी झाली. तरीही राजस्थान, पंजाब, गुजरात, माळवा व खानदेशमध्ये त्याचे वंशज मिहिरकुल राजाचे पुरावे मिळतात. इसवीसनाच्या ८१० मध्ये राष्ट्रकुट राजा खानदेशातील मिहिरकुलाच्या शेवटच्या वंशजांना हरवतो असा उल्लेख आहे. म्हणजे तोरमाण ते मिहिरकुल असा जवळजवळ चारशेवर्षे या वंशाचे अस्तित्व व अंमल होता असे म्हणू शकतो. ग्वाल्हेर येथील किल्ल्याच्या लेखात मिहिरकुलाचा उल्लेख आहे. काही राजपूत कुळे स्वतला या वंशाचे मानतात.

चिनी पुराव्यात या टोळ्यांचा उल्लेख ” याझदी” असा येतो.

सहाव्या शतकातील अनेक लेखांत व तिलकमंजिरी धनपाल यांची ह्यांत माऊंट अबू पर्वतावर आधीचे नाव अर्बूदा तीन गट एकत्र येऊन ब्राम्हणांनी त्यांचे शुध्दीकरण करून वंशात घेतले व त्यांना अग्नीवंशात सामिल करून घेतले. अनेक ताम्रपट व लेखांनुसार गुर्जर लोक या पर्वतावर होते हे लक्षात येते. गुर्जरांबद्दल डॉ. भांडारकर, इरावती कर्वे, या विद्वानांनी चर्चा केली आहे.

कनिंगहॅमच्या मते गुर्जर हे कुषाणांचे वंशज आहेत. जे “याची” नावाच्या टोळीतून भारतात आले. व बरेच वर्षे राज्य करून येथेच रोटी बेटी व्यवहार केला आणि इथले धर्म ही स्विकारले. कुषाणांचे अधिकारी क्षत्रप वंशही महाराष्ट्र, माळवा, गुजरात येथे राज्य करीत होता व  महाराष्ट्रातील सातवाहन घराण्याचे समकालीन होते. सातवाहन आणि  क्षत्रपांमध्ये संघर्ष व नंतर वैवाहिक संबंध राहिले. नाशिक येथील लेणीतील शिलालेखात व गुजरात मध्ये ही उल्लेख व नाणी मिळतात.

‘गुर’ शब्दांचा अर्थ शत्रूला नष्ट करणारा असा होतो. हुणांच्या आक्रमणानंतर सातव्या शतकात गुर्जर प्रतिहार हा राजवंश उदयाला आलेला दिसतो. राजौर लेखात सर्व शेतांचा मशागत करणारा ‘गुर्जर’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. माऊंट अबू पर्वतावर अग्नीवंश, राजपूत व शेषवंश असे उल्लेख लेखांमध्ये सापडतात. “नागभट्ट” हा पहिला गुर्जर संस्थापक राजा पण नागभट्ट दुसरा या राजाचे नाणी व लेखातही उल्लेख सापडतात. गुर्जर प्रतिहार राजांच्या नाण्यांवर “वराह अवतार” हे चिन्ह दिसते. खानदेशातील बऱ्याच प्राचीन मंदिराच्या समोर वराह आहे.  नंदुरबार येथे, बेटावद ,बलसाणे, विल्हाळे येथील मंदीराच्या समोर वराह दिसतो.

“मिहिरभोज” हा पण याच वंशातील राजा होता. या नावावरून धर्म आणि राजसत्ता यांच्यात देवाणघेवाण झालेली स्पष्ट दिसते. सातव्या शतकातील इ.स. ७१० मधील अंजनेरी ताम्रपट हा नांदीपूर भडोच जिल्ह्यातील गुजरात मधील गुर्जर राजा जयभाट याचा अंमल होता  असे दर्शवतो. या गुर्जरांवरून गुजरात हे नाव पडले. पुर्वी गुजरातला “लाड देश” असा उल्लेख आढळतो.

ही चर्चा करण्याचा एकच उद्देश हाच की लेवा लोक गुजरात मधून खानदेशात स्थलांतरीत झाले आहे. दुसरे म्हणजे इतिहासाची महत्वाचे साधने म्हणजे दानलेख आणि शिलालेख होय. आणि प्राचीन वाङमय आहे

गुजरात मधील लेवा पाटील कुणबी उत्तरेकडील गुजर वंशातील लोक आहेत, असा उल्लेख बुलढाणा गॅझेटीयर मध्ये आहे. ते १९१० मधील आहे. पावागड येथून स्थलांतरीत झालेल्या आहे. कुणबी शब्द हा “कुर्मीत” या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. कुर्मी म्हणजे ज्याच्याकडे जमीन आहे तो. जमीन धारण करणारा होय. कु म्हणजे भूमी, कुटुंब कुटुंबापासून कुल, कुलंबी, कुर्मी, कुणबी म्हणजे शेती करणारी कुळे होय.

कुषाणराजा कनिष्क याच्या मृत्यूनंतर अवंतीचा राजा विक्रमादित्य याने शकांचा पराभव केला. त्यांच्या जवळचे  गुजरात, माळवा, सिंध, पंजाब प्रांत जिंकले व इसवीसन पूर्व ७८ च्या आसपास गुर्जर, कुर्मी, मथुरेकडे वसती करून राहीले व अनर्तेकडे पोचले असा उल्लेख बाम्बे गॅझेटियर मध्ये येतो. पंजाब, कोटा, मंदसोर माळवा असा प्रवास झाला. नंतर इ.स. ७४६ मध्ये अनहिलपूर पाटण येथे वनराजने राज्य स्थापले आणि परत कुर्मी लोक परतले.

इ.स. १०९४ मध्ये सिध्दराज जयसिंहाने माळव्याच्या यशोवर्मनवर आक्रमण केले व त्यावेळी माळव्यातून ४३ कुणबी परिवार गुजरातेत परतले. कानम, वाकळ, चरोतर, भाल भागात वसवले. पुढे इ.स. १४८३ मध्ये महंमद बेगडाने चंपानेर लुटले पावागडवर स्वारी केली. पटाई रावळाचे शालक सियाजी बाकलिया फितूर होवून शत्रूला मिळाले. व त्यांना व लेवा पाटीदारांना किल्ल्यावरून स्थलांतर करावे लागले. गुजरातेत चारोतर भाग आनंद, नादियाड व मध्य गुजरात मधील लेवा पटेल,  सौराष्ट्रात व कच्छ मध्ये कुणबी पटेल, उत्तरेत चौधरी, अंजाना तर दक्षिणेकडे कोळी वसती होती. मुख्यतः खेडा जिल्हा येथे जास्त लोकसंख्या वसती होती.

स्थलांतराचा प्रवास हा जुनागड ते अहमदाबाद नंतर पावागड तेथे छत्तीस उपनगरांचे शहर वसवले. येथून छप्पी राजाने स्थानभ्रष्ट केल्यावर नर्मदेच्या नीलगड ते नेमाडच्या पूर्वेला करकुंद ठिकाणी बत्तीस ठिकाणी वसती करून राहीले नंतर करकुंद येथून २००० बैलगाड्यांनी खानदेशात आले.

आधी थाळनेर, तोरणमाळच्या जंगलात तर नंतर काही आसिरगडच्या भागात आले. नंदुरबारच्या मार्गे मग रावेर, जामनेर, एदलाबाद व जळगाव, यावल व एरंडोल, व इतर तालुक्यात वसले आहे. हे स्थलांतर इ.स. अकराव्या शतकात झाले असावे. कारण इ.स. १२१९ मध्ये जामनेरची देशमुखी गवळ्यांकडून लेवा गुजरांकडे आली. सावदा येथील देशमुखी सुध्दा होय.

इ.स. १०९४ मध्ये जेव्हा सिध्दराज जयसिंग या राजाने पाटण गुजरात मधील परिसरात सहाशे काही ठिकाणी ४३ कुटुंब वसवले. तेव्हा रामजी पाटील हे प्रमुख होते. चौदाव्या शतकात चंपानेरचा पाडाव झाल्यावर सारे विखुरले गेले. मोगलांच्या कारकिर्दीत विशेषतः गुजरातेत औरंगजेबाचा अधिकारी बहादुर शहाने  इ.स. १७५९ मध्ये पिपलाव येथे खैरा जिल्ह्यातील एक विशेष सभा घेतली. त्यात वीर वसनदास व पाटीदारांना कुणबी कुल यांना पाटीदार पटेल हा किताब देण्यात आला. त्या आधी पाटीदार हा शब्द दिसत नाही. खानदेशात देशमुखी मिळत गेली. नंतरचा इतिहास ज्ञातच आहे. ही फक्त धागे सापडले आहेत. नंतर सखोल संशोधनाची गरज आहे. ती तटस्थपणे करायला हवी.

इसवीसन १८८० च्या गॅझेटियर मध्ये खालील उल्लेख आहे. तो असा,

“leve patidar are. truthful, orderly and frugal almost to the niggardliness, they are the most hardworking, industries and simple minded of  the Khandesh  agricultural population since the great dispute which broke up their caste they have been remarkable for the absence of jeolosies and treacheries which distinguish the Gujjar kunabis.”

प्रत्येक समाजाचा इतिहास त्या कुळावरून किंवा वंशानुसार न ठरता त्याच्या कर्तृत्वावरून ठरतो. नंतर कर्तृत्ववान माणसे मग मोठ्या कुळांशी आपोआपच जोडली जातात. औरंगजेबासारखा बादशहा कुणबी या पदावरून पटेल, पाटील, पदवी देतो. नंतर शेतीतील खानदेशातील प्रगती केली. केळी ऊसासारखा पिकांसाठी जगात नावाजली जातात. म्हणून गौरवशाली असण्यापेक्षा कष्टातून पुढे आलेला घाम व चिकाटीच्या जोरावर शेतकरी आता व्यापारी, बुध्दीवंताचा समाज हा मोठाच अभिनंदनीय आहे. सर्वसमावेशक आणि परिवर्तनशीलता हीच खरी संस्कृती आहे.

(लेवा संस्कृती,लेवा संस्कृती,लेवा संस्कृती,लेवा संस्कृती,लेवा संस्कृती,लेवा संस्कृती)

माहिती संकलन  –

Leave a Comment