महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,342

लेवा संस्कृती भाग २

By Discover Maharashtra Views: 3251 8 Min Read

लेवा संस्कृती भाग २ –

सन १८७२ मधील जनगणनेच्या आधारे संयुक्त खानदेशात लेवा पाटीदार यांची संख्या २५,५३५ एवढी होती. ही बहुतांश पुर्व खानदेशातील होती. यावल,रावेर, एदलाबाद, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील तसेच एरंडोल जवळील नांदेड,साळवे, जामनेर तालुक्यातील हाताळे इत्यादि ठिकाणी वसती होती. पट म्हणजे मोठे शेत आणि पट्टी म्हणजे शेतीचा लांब पट्टा व तो धारण करणारा म्हणजे पाटीदार असा अर्थ निघतो. गुजरात मधील पाटीदारांना पाटील किंवा शेतकरी असेही म्हणतात. (य.रा.दाते, चिं.ग.बर्वे, महाराष्ट्र शब्दकोश खंड ५, १९१४)(लेवा संस्कृती भाग २)

गुजरात मधील लेवा कणब्यांना (कुणबी) पाटीदार आणि शेतकरी कणबी असे भेद आहेत. यातील पाटीदार याचा अर्थ जमिनदार व सावकार असा आहे. त्यांची वसती  विशेषतः खेडा जिल्ह्यातील आणंद, बोर्साद आणि नडियाद या चरोतरमध्ये विशेष करून अधिक आहे, होती. या भागातील पाटीदार स्वतःला कुलीया किंवा नार्वा म्हणजे जमिनदार व इतर भागातील कुणब्यांना अकुलिया म्हणजे सेजा म्हणजे कुळ संबोधतात.(गॅझेटीयर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी खंड ९ भाग १,१९०१) ब्रिटीश राजवटीपूर्वी प्रमुख पाटीदार शासन व कुळांमधील मध्यस्थीचे काम करत व सारा वसूल करून सरकारला देत.(कित्ता पृ.१६६)

गुजरात मध्ये पाटीदारांचे लेवा पाटीदार आणि कडवा पाटीदार असे दोन प्रकार आहेत. लेवा म्हणजे मवाळ आणि कडवा म्हणजे कट्टर असा अर्थ निघतो.(बुलढाणा गॅझेटियर ,१९१०) ज्या खेडा जिल्ह्यातून हे लोक आले तिथल्या १८८२ गॅझेटियर मध्ये  त्यांच्या विषयात खालील वर्णन दिले आहे.” Of the different classes of cultivators, the most important are the leva and kadva kunabis. The best farmers in the district, sober, quiet, industrious and except on such special occasions as marriages, thrifty … “(कैरा डिस्ट्रीक गॅझेटियर १८८२)

पाटीदारांची वसती मध्यप्रदेश, राजस्थान आणि पश्र्चिम बंगाल मध्येही आहे. गुजरात मधील कच्छ विशेषतः भुजलाही लेवा पाटीदार लोकांचे राधाकृष्ण मंदिर आहे. तिथली वजनदार जमात मानली जाते. बराच दबदबा आहे. मात्र पश्र्चिम बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील पाटीदार हे भाट आहे त्यामुळे त्यांचा संबंध कसा लावता येईल हा संशोधनाचा विषय आहे. याबाबत सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.(गॅझेटियर ऑफ इंडिया, इंडियन युनियन,खंड १, कंट्री अंन्ड पिपल ,१९७३)

(देवीसिंह व्यंकटसिंह चौहान (२२ मार्च १९११ – मृत्यु डिसेंबर २००४) हे इतिहास ह्या विषयातील एक अभ्यासक होते. त्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात होते. दख्खनी भाषेचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता. देवीसिंह चौहान यांना सन १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात स्टेट कॉंग्रेस पक्षातर्फे झालेल्या सत्याग्रहात कारावासाची शिक्षा झाली होती. पण पोलिसी कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात ते कॉंग्रेसचे पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले होते. सन १९४९ ते १९५२ या काळात ते मराठवाडा प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीसही होते. सन १९५२ ते १९५४ या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषविले होते. त्यानंतर त्यांनी मराठवाड्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. नागपूर कराराच्या वेळी मराठवाड्यातील प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. पुढे १९५७च्या मुंबई मंत्रिमंडळात उपमंत्री म्हणून ते सहभागी झाले होते. सन १९६४ ते १९७० या काळात त्यांनी लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते.

स्वातंत्र्योत्तर काळात कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून वावरताना त्यांनी जहागिरींचा प्रश्न तसेच कुळकायदा यांविषयी अनेक लेख लिहिले. कुळकायद्यावर पुस्तके लिहिली होती. सन १९५७ पासूनच त्यांनी संशोधनावर विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली होती. त्यांनी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी ह्या चार भाषांत मिळून सुमारे १५० संशोधनपर लेखांची निर्मिती केली आहे. भारतीय इतिहास कॉंग्रेस व अखिल भारतीय प्राच्य परिषद यांच्या इतिवृत्तान्तांवरून देवीसिंह यांचे अनेक संशोधनपर लेख प्रकाशित झाल्याचे आढळते. तसेच पुण्याच्या भांडारकर संशोधन मंदिर या संस्थेच्या आणि मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिक पत्रांतून त्यांनी लेखन केल्याचे आढळते.

‘दख्खनी हिंदीतील इतिहास व इतर लेख’ (लेख-संग्रह), ग्रंथमाला क्र- २१, वि.गो.खोबरेकर, इतिहास संशोधन मंडळ, मुंबई-१४, म.गो. प्रधान, सत्यसेवा मुद्रणालय, अलिबाग (इ.स. १९७३).

‘मराठी आणि दक्खिनी हिंदी’, प्रकाशक – महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे.

‘भारत इराणी संश्लेष, भाग- १’, प्रकाशक – महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे.

‘भारत इराणी संश्लेष, भाग- २’, प्रकाशक – महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे.

इंग्रजी १) ‘Understanding Reveda’ (१९८५) २) ‘फ्यूडल ऑपरेशन्स इन हैदराबाद’ (१९३९))

देविसिंग चौहान यांच्या मते हे लोक इराणमधून खैबरखिंडीतून हिंदुस्थानात आले हे मुळचे गुजरात मधील नाहीत. पुर्वी राजस्थान, पंजाब आणि मध्यप्रदेश या भागात यांची वसती होती. अजून मध्यप्रदेशातील निमाड, उज्जैन व मंदसौर या भागात हे लोक आहेत. या लोकांच्या वंशावळी चोपडा येथील भाटांकडे तर त्र्यंबकेश्वर चे क्षौरकर्म करणारे आणि काशीच्या पंड्यांकडे आहे.

चोपडा येथे भाटांच्या नोंदी व्यवस्थित आहे. त्यांच्या नोंदीनुसार संवत ११०० सुमारास गुजरात मधून हे लोक स्थलांतरित झाले. भाटांच्याच म्हणण्यानुसार हे लोक खानदेश आणि गुजरात मध्ये येण्यापूर्वी राजस्थानात होते. आजही काही भाट हे राजस्थान वरून येतात आणि चोपडा येथील भाटांनी त्यांच्याकडे चोपड्या दिल्या आहेत. त्या पोथ्या कुणालाही बघता येत नाही. पावित्र्य आणि गुप्तता पाळण्यात रिवाज ते लोक अजूनही पाळतात म्हणजे प्रक्षिप्त मजकूर येण्याची भिती नसते.

राजस्थान येथील काही टोळ्यांनी हुसकावून लावले आणि ते चितोड गड, मल्हारगड, काठेवाड मार्गे गुजरात मध्ये आले. (यावल तालुक्यात चितोडे नावाचे गाव आहे.)

रेवा नदीकाठी वसती केल्यामुळे रेवा, पुढे अपभ्रंश होऊन लेवा झाले. गुजरात मधील लेवा कणबी हे उत्तरेकडील गुजर वंशाचे आहेत. (बुलढाणा गॅझेटीयर १९१०)  जळगाव जिल्ह्यात त्यांना पुर्वी पाजणे कुणबी म्हणत. पाजणे शब्द पावाखंड म्हणजे पावागडशी जोडला जातो आणि पावागड हा गुजरात मधील भाग होता. (कित्ता पान १२४)

पांजण म्हणजे वस्र विणण्यासाठी सुताला लावायची खळ व पांजणे म्हणजे विणकरांचे सूत खळीने युक्त करणे असा अर्थ होतो. पुढे गुजरातवर मुसलमान स्वाऱ्यां होऊ लागल्यावर खेडा जिल्ह्यातील लेवा पाटीदार लोक हे पावागडला स्थलांतरीत झाले आणि नंतर काही पिढ्या तिथे राहिले.  पावागडही मुसलमान राजांनी घेतल्यावर ते खानदेशात आले. इकडे आल्यावर सुताला साळी कारागिरांच्या बरोबर सुताला ब्रशाप्रमाणे फिरवणे फणग्याने पांजण्याचे काम करू लागले. म्हणून त्यांना पांजणा हे नाव पडले. हे चोपडा येथील  वंशावळ ठेवणाऱ्या भाटांच्या मुलाखतीवरून कळले.(सरला भिरूड, मुलाखती साठी सौजन्य, चोपडा कला विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू महाजन).

पुढे शेती करू लागल्यावर पांजरा कुणबी म्हणू लागले. हे पांजरा कुणबी म्हणजेच लेवा पाटीदार लोक आहेत. त्यांच्या लेवा किंवा रेवा, नवघरे, कंडारकर, आणि थोरगव्हाण या पोटशाखा मानल्या जातात. यातील लेवा हे मुळ आहे आणि त्यांच्यातून भा़डून बाहेर पडलेल्या नऊ कुटुंबांना नवघरे म्हणतात तर थोरगव्हाणे आणि कंडारकर ही नावे रावेर तालुक्यातील थोरगव्हाण ( खूप मोठा आकाराचा गहू पिकवत) आणि भुसावळ तालुक्यातील कंडारी या प्रादेशिक नावावरून पडली आहे.  पूर्वी पांजणा जातीचा पंचायत प्रमुख हा यावलचा देशमुख घराण्यातील थोरगव्हाणे होता.(खानदेश गॅझेटियर १८८०) पोटभेदांमुळे बेटीव्यवहार बंद झाले आणि यावलचा देशमुख हा फक्त थोरगव्हाणे या पोटभेदाचा पंचायत प्रमुख राहीला आणि बाकीच्या लेवा पोटभेदांचे पंचायत प्रमुखपदी भोरटेक येथील लेवा पाटलांकडे गेले. भोरटेक येथील लेवा पाटीदारांना तेथील कोळ्यांनी हुसकून लावले आणि ते पाडळसे येथे आले आणि पाडळसे येथील पोलिस पाटील हा लेवा पाटीदार पंचायत प्रमुख बनला तरीही ती पंचायत भोर पंचायत म्हणून ओळखली जाते.

महाराष्ट्रात इतर कुणबी मांसाहारी असले तरी गुजरात मधील लेवा पाटीदारांप्रमाणे हे सुध्दा शाकाहारी आणि मद्यपान निषिध्द मानणारे आहेत. लेवा गुजर आणि बाड गुजर यांची भाषा अहिराणीशी मिळती जुळती आहे तर लेवा पाटलांची भाषा ही वऱ्हाडातील मराठीशी मिळतीजुळती आहे. गुजरात मधील मोमना कणबी हे सुध्दा स्वत:ला लेवा पाटीदार समजतात.

क्रमशः – लेवा संस्कृती भाग २.

माहिती संकलन  –

लेवा संस्कृती भाग १

Leave a Comment