लिंबराज महाराज विठ्ठल मंदिर | Limbaraj Maharaj Vitthal Temple –
बाजीराव रोडवरच्या विश्रामबाग वाड्यावरून लक्ष्मी रोडकडे जाताना चौकात उजव्या बाजूला एक दोनशे ते सव्वा दोनशे वर्ष जुने मंदिर आहे. मंदिर दगडी बांधणीचे असून तीन मजली आहे. सदर मंदिर हे लिंबराज महाराज विठ्ठल मंदिर किंवा झांजले विठ्ठल मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराला लाकडी कोरीवकाम केलेले दरवाजे आहेत. मंदिराला प्रशस्त सभामंडप आहे आणि त्या पुढे मुख्य गाभारा आहे. या मंदिरात बीड येथील लिंबराज महाराजांची समाधी आहे. त्या समाधी भोवतीचा मंडपदेखील सुबक लाकडात कोरलेला आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक दगडी विहीर आहे. मुख्य गाभारा छोटासा असून गाभाऱ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या काळ्या पाषाणात घडवलेल्या मूर्ती आहेत.
मंदिरात रोज सकाळी आठ वाजता आणि रात्री आठ वाजता आरती होते. तसेच नित्य पूजाअर्चा होते. सुती कापडाच्या पताका कावेच्या पाण्यात भिजवून वाळवून त्या गुढीपाडव्याला मंदिराच्या कळसावर उभारल्या जातात. गोडाचा नैवैद्य दाखवून पूजन केले जाते. मंदिरात श्रीराम नवमी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला श्री लिंबराज महाराज यांचा छबिना म्हणजेच पालखी असते. आषाढी वारीची सुरुवात देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थान आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान येथून पालखी प्रस्थानाने होते. श्री लिंबराज महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या बरोबरचे सेवेकरी होते. त्याचबरोबर हैबतबाबा, लिंबराज महाराज, खंडुजीबाबा यांनी डोक्यावर संतांच्या पादुका घेऊन आषाढी वारीची सुरुवात केली. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या आधी लिंबराज महाराज देवस्थानाला मानाचे श्रीफळ दिले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथापुढे २७ मानाच्या दिंड्या असून दिंडी क्रमांक १ हा मान लिंबराज महाराज यांच्या दिंडीचा आहे.
पत्ता : https://maps.app.goo.gl/Bn7gMHh8772vavDq5
आठवणी इतिहासाच्या