लोहगड | Lohgad Fort
लोहगड किल्ला (Lohgad Fort) हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या….
पवन मावळातील बोरघाटाचा संरक्षक असणारा लोहगड हा अतिप्राचीन मजबुत आणि बुलुंद दुर्ग. अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे. पुणे – मुंबई हमरस्त्यावरून जाताना हा सहजरित्या नजरेस पडतो. या डोंगराच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या तर परिसरात कार्ला लेणी आहेत. मुंबई – पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर किवा लोणावळा येथे उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. मळवलीहून चालायला लागल्यावर आधी आपल्याला भाजाची लेणी लागतात. इसवीपूर्वी दुसऱ्या शतकातील ही लेणी सातवाहनकालीन असल्याचे म्हटले जाते.
लोहगडाकडे जायची वाट ह्या लेण्यांवरून जात पुढे गायमुख खिंडीकडे जाते. तिथे कपला नावाची जागा आहे. एका दगडी चौथऱ्यावर घोडा, उंट, हत्ती व इतर काही अशा नऊ प्राण्यांची शिल्पे दिसतात. त्याच्या बाजूला हनुमानाची मुर्ती आहे. ह्याच्या काही अंतरावर टहाळदेव नावाचा शेंदूर फासलेला दगड आहे. गडाच्या पायथ्यापाशी लोहगडवाडी या गावात जेवण्याची घरगुती सोय होते. लोहगडवाडी हि गडाची एकेकाळची बाजारपेठ. यामुळे गावात आजही जुन्या वाडय़ांचे चौथरे, बांधीव विहिरी, मंदिरे दिसतात. लोहगडवाडी इथून गडाच्या माथ्याकडे जाणारी नागमोडी वाट आहे. गड चढाई सुरु करण्यापूर्वी पायऱ्यांच्या डावीकडे एक जुनी विहीर दिसते जी सध्या कोरडी ठणठणीत दिसते. येथून पुढे गेल्यावर पायऱ्यावरून एक वाट जंगलात गेलेली दिसते या वाटेवर पुढे गेल्यास कपारीत खोदलेल्या दोन गुहा दिसतात तसेच वाटेत एक दगडाचे चाक व दोन तोफा दिसतात ज्या अलीकडच्या काळात पायऱ्यांचे उत्खनन करताना सापडल्या आहेत. इथून पुढे पायऱ्यांनी आपला गडप्रवेश सुरु होतो.
पहिल्या दरवाजात दिसणारा दरवाजा हा पुरातत्व खात्याने अलीकडच्या काळात बसविला आहे पण त्याचे स्वरूप मात्र किल्ल्याच्या मूळ दरवाजाप्रमाणे ठेवले आहे. गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमुळे तयार झालेल्या सर्पाकार मार्गावरून जावे लागते. लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा असुन कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे. गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो. त्या प्रवेशद्वारांची नावे अशी —१ गणेश दरवाजा: ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली साबळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती जी आधी घडशी यांच्याकडे होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
गणेश, नारायण, हनुमान, आणि महादरवाजा या अनुक्रमाने येणाऱ्या चार दरवाजांपैकी हनुमान तेवढा मूळचा. बाकी दरवाज्यांचे काम नाना फडणविसांनी फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. या आशयाचा एक शिलालेखच गणेश दरवाजावर बसवलेला होता. सध्या तो नारायण दरवाजानंतर येणाऱ्या पहारेकऱ्यांच्या एका खोली बाहेर ठेवलेला आहे. तो याप्रमाणे-
श्री गणेशाय नम: —–गणेश दरवाजा बा (बां)——–धला बाळाजी जनार्दन फडणीस विद्यमान धों——डो बल्लाळ नीतसुरे प्रारंभ शके १७१२——साधारण नाम संवत्सरे अस्वीन शु——-ध ९ नवमी रवीवार समाप्त शके——१७१६ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ सुध त्रयोदशी बु—–ध वार कता(र्त) व्य जयाजी——–धनराम गव(वं)डी त्रिवकजी सुतार——- या लेखाच्या खाली दिव्यासाठी एक कोनाडासुद्धा कोरलेला आहे—-.
२. नारायण दरवाजा: हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. या दरवाजाच्या दोनही बाजूस व्याघ्रशिल्प कोरलेली आहेत येथे एक भुयारी कोठारे आहेत ज्याचा वापर भात व नाचणी साठवण्यासाठी केला जाई. पहिले कोठार लांबीला पाच मीटर, रुंदीला चार व खोलीला तीन असे आहे तर दुसरे लांबी रुंदीला दहा व खोली चार मीटर इतके मोठे आहे.—–३ हनुमान दरवाजा: हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.या दरवाजाच्या दोनही बाजूस शरभाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.—-४ महादरवाजा: हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. इथे थडग्यावर बांधलेली लहानशी इमारत दिसते व ती औरंगजेबच्या मुलीचे थडगे आहे असे म्हटले जाते पण तसा काही पुरावा सापडत नाही व त्याच्या मुलीचे नावही उपलब्ध नाही.
दर्ग्याच्या शेजारी सदरेचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तुटकी तोफ पडलेली आहे. अशीच एक तोफ अर्धवट तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास खजीनदाराची कोठी व लक्ष्मी कोठी आहे. खजीनदाराची कोठी २१ मीटर लांब व १५ मीटर रुंद आहे. तर लक्ष्मी कोठीमधे लोमेश ऋषिंचे वास्तव्य होते असे म्हणतात. हि कोठी तीन भागात विभागलेली असुन या कोठीत ४० ते ५० माणसे आरामात राहु शकतात. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे, तिथे अलीकडेच जीर्णोद्धार केलेले एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे.
थोडे पुढे गेल्यावर पठार आहे. या पठारावरील कबर शेख उमर या अवलीयाची असल्याचे सांगितले जाते. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करताना . किल्ल्यात सोळा कोन असलेला एक खोल तलाव बांधला व त्याच्या बाजूस एक शिलालेख कोरला त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी हा तलाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधवला. सध्या या तळ्यात अजिबात पाणी साठत नाही कारण नाना फडणीस यांनी या तळ्यात संपत्ती लपवली असावी या संशयाने इंग्रजांनी हे तळे फोडले. नाना फडणविसांनी हे तळे बांधले या आशयाचा एक अस्पष्ट झालेला शिलालेख आत उतरणाऱ्या पायरीमार्गावरच आहे. या तळय़ाची एक बाजू खजिन्याच्या लोभापायी इंग्रजांनीच फोडली. त्या वेळी त्यांना खजिना मिळाला की नाही हे माहीत नाही, पण या लोभापायी पाणी मात्र आजही वाहून जाते आणि हे तळे कायमचे कोरडे राहते.
मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे प्रतापगडच्या अफझल बुरुजाची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. पुर्वी येथुन विंचुकाटयावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट व एक दरवाज्याची कमान होती जी काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. आता एक थोडा धोकादायक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात पूर्वीच्याकाळी केलेली पाण्याची उत्तम सोय आढळते पण आता वापर नसल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. तटामध्ये शौचकूप आढळून येतात. तर टोकाला एक दुहेरी तटबंदीचा भक्कम बुरूज आढळून येतो ज्यात आत तटात उतरण्यासाठी दोन्ही बाजूना दरवाज्याची सोय केलेली आहे. गडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी व संपुर्ण इंद्रायणी खोऱ्यावर लक्ष ठेवण्यास विंचूकाट्याचा उपयोग होतो. विंचू काट्याच्या खाली दाट जंगल आहे.
गडाच्या सर्वोच्य माथ्यावरून आपल्याला विस्तृत प्रदेश पहायला मिळतो. येथून विसापूर, भातराशी, तुंग, तिकोणा, कोरीगड, मोरधन, सिंहगड, तोरणा, रायगड आपल्याला पहाता येतात. पवना धरणाच्या परिसराचे उत्तम दर्शन येथून होते. इसवी सन १८९६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकात लोहगडाच्या या चारही दरवाजांची ती भरभक्कम दारे शाबूत असल्याचा उल्लेख आहे. यातील गणेश दरवाजावर तर अणकुचीदार खिळेही ठोकलेले होते. याशिवाय या परिसरात काही तोफाही असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. पण आज यातील एकही दरवाजा तर दूरच, पण त्याची एखादी फळी किंवा खिळाही इथे नाही. तसेच इथे असणाऱ्या त्या तोफांनाही पाय फुटले आहेत.
महाराष्ट्रातील हा असा किल्ला ज्याच्या नावात गड हा शब्द शिवरायांच्या स्वराज्या पुर्वीच आढळून येतो. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच २५०० वर्षांपूर्वी झालेली असावी. सातवाहन चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यात लोहगड किल्ला सन १४९१ मधे निजामशाहीकडे गेला. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्र्हान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. निजामशाहीच्या अस्तानंतर इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. त्यानंतर आग्रा भेट व स्वराज्याला स्थिर करण्याच्या धामधुमीत पाच वर्ष गेली. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.
पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती आली व नंतर ती राजगडाकडे रवाना झाली. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्रेकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. नानांनी आपले सर्व द्रव्य धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली लोहगडावर आणले. १८०० मध्ये धोंडो बल्लाळ नित्सुरे यांना कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.