छत्रपतींचे रामराजे यांचे संतोषगडाच्या अंमलदारास ताकीदपत्रं ‘ढवळचे वतनदार लोखंडे पाटील’ –
लोखंडे हे माण प्रांतातील मौजे पांगरी व फलटण परगण्यातील मौजे ढवळ या दोन गावांचे पाटील वतनदार होते. पैकी ढवळगावच्या वतनावरून त्यांचा ऐतिहासिक सरदार पवार घराण्याशी झालेला तंटा इतिहासात चांगलाच गाजला. अखेर हे वतन आपल्याच कब्जात ठेवण्यात लोखंडेंनी बाजी मारली असे असताना या वतनाच्या संदर्भात टिपणी देताना पवारांच्या पक्षपाती इतिहासकारांकडून लोखंडेंना नेहमीच दुर्लक्षित ठेवण्यात येते. साधारण पंधराव्या सोळाव्या शतकात ऐतिहासिक पवार घराण्यामध्ये व लोखंडे घराण्यामध्ये फलटण परगण्यातील ढवळ गावाच्या पाटीलकी वतनावरून चांगलाच वाद घडून आला. त्याची थोडक्यात माहिती अशी, या वतनावरती दोन्ही घराण्यांनी आपला दावा सादर केलेला होता. पवार घराण्याच्या एका कैफियतीनुसार, लोखंडे यांनी आपली पाटीलकी बळकावली असा पवार यांचा आक्षेप होता. तर हे पाटील वतन आपलेच असल्याचे लोखंडे यांची भूमिका होती. त्यांच्या निवाड्यासाठी पुढे गोतसभा होऊन, परगण्यातील अनेक वतनदारांच्या साक्षीने दिव्यही घेण्यात आले व त्यात आपण खरे निघालो. रवा लोखंडे यांच्या हातास लागला. त्यामुळे वतनाचे खरे हक्कदार आपण असा पवारांचा मुद्दा होता व या पवारांनीच आपल्या वतनी हक्काच्या संदर्भाने केलेल्या कैफियतीला आधार मानून हे वतन पवार यांचेच असल्याचे मत अनेक इतिहासकार नोंदवतात. मात्र इतिहासकारांच्या या भूमिकेला कागदोपत्री पुराव्यांनी तडा जातो.ढवळचे वतनदार लोखंडे पाटील.
सन १७५२ मध्ये शाहू छत्रपतींच्या काळात संतोषगडाच्या अंमलदाराने लोखंडे यांची पाटील इनाम शेते जप्त केली होती. ती त्यास परतून देण्याविषयी ताराराणी सरकारांनी संतोषगडाच्या अंमलदारास ताकीदपत्रे पाठवली आहेत. या आज्ञेत ताराराणी सरकार बजावतात होनाजी व जोगोजी लोखंडे पाटील यांची मिराशीची शेते मौजे ढवळ परगणे फलटण येथे आहेत ती त्यांस परतून देणे, फिरोन बोभाटा घेऊ न येण्याविषयी रामराजे छत्रपतींनी संतोषगडच्या अंमलदारास बजावले आहे. इ. स. १७९० मध्ये होनाजी पाटलाचा पुत्र संताजी व जोगोजी पाटलाचा पुत्र महिपतराव हे दोघे ढवळगावच्या पाटीलकीचे कामकाज पाहत होते. त्यानंतर जमाव दफ्तरमधील नोंदीनुसार या गावच्या वतनदारांच्या संदर्भाने १८३० सालापर्यंत लोखंडे घराण्यातील पुरुष नियमितपणे पाटीलकी कारभार पाहत असल्याच्या नोंदी आहेत. जमाव दफ्तरात १८३० सालापर्यंतचे कागद पुष्कळ आहेत व त्यानंतरच्या काळातील कागदपत्रांचा शोध घेणे माझ्याच्याने शक्य झाले नाही. म्हणून मी १८३० पर्यंत असाच उल्लेख केला आहे. मात्र त्यानंतर वतनदार पद्धतीचा शेवट होईपर्यंत ढवळ गावची पाटीलकी लोखंडे पाटील घराण्यात निःशंकपणे चालल्याची अन्य प्रमाणे हि उपलब्ध आहेत. याचाच अर्थ शिवरायांचे नातू शंभूपुत्र शाहू छत्रपतींच्या काळापासून ते वतनदारी पद्धत नष्ट होईपर्यंत या गावचे पाटील लोखंडे राहिले आणि आजही या गावात लोखंडेंचे प्राबल्य आहे. लोखंडे घराण्याने जतन करून ठेवलेल्या मल्लविद्येमुळे तालुक्यात या गावची ओळख पैलवानांचे गाव अशीच आहे. महानुभाव पंथाच्या जुन्या पोथ्यांमध्ये साहित्यामध्ये ढवळ गावाचे उल्लेख आढळतात.
संतोषगडाच्या अंमलदारास लिहिलेल्या मोडी पत्राचे लिप्यांतर पुढीलप्रमाणे-
* लेखांक १५-५८
प्राप्ती शाहू दफ्तर पत्र क्र. – अ ९०१८ रोजकीर्द सु ।। सलाम खमसैन छ ६ रोज माहे शाभान, राजश्री मुद्राधारी व लेखक किले संतोषगड यांसी आज्ञा केली यैसीजे होनाजी व जोगोजी लोखंडे प।। (पाटील) मौजे ढवले प।। (परगणे) फलटण हे गावावरून च्यालिस वर्ष गेले. त्यास त्यांची मिराषीची सेते व इनाम आहेत. ते पाटील मजकूर यांचे पदरी घालणे. याज उपरी फिरोन बोभाट येऊ न देणे म्हणोन पत्र १.
* लेखांक १५-५९
प्राप्ती सातारा जमाव रुमाल क्रमांक ११६१, लेखांक, शिक्का इनाम कमिशन पत्र क्र ख २०८४ मुखवस्त्रे मोफ़द
मौजे धवल प्र।। फलटण सु।।र सन ११८६ माहे रमजान अश्विन मास असामीवार १ लकार विल्हे. येकंदर
१ संताजी व।। (वलद) होनाजी लोखंडे मो।। प|| (पाटील),
२ महिपतराव व।। (वलद) जोगोजी लोखंडे मो।। प|| (पाटील),
३ संताजी व।। (वलद) आबाजी लोखंडे
४ माणकोजी व होनाजी लोखंडे
५ संताजी व खंडोजी लोखंडे
६ सेटि व खंडोजी लोखंडे चेरे
७ माणकोजी व सेट्याजी लोखंडे येताले
८ हरजी व खेलोजी लोखंडे
*********************************************************************
२ चकार विल्हे. येकंदर १० सिदू व बाजीराव चौगुला गोपणे गोरा ११ सिदू बाजी गोपणे काला ३ मकार विल्हे. येकंदर १२ तुकू माली १३ राघो व।। कनको माली
* संदर्भ- संरजामी मरहट्टे- संतोष ग. पिंगळे.
* फोटो साभार – सुमितराव लोखंडे (संशोधनाकरिता पुरालेखारातून मिळविलेलेअस्सल ताकीदपत्रं)
सुमितराव लोखंडे