महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,884

लोनाड लेणी | Lonad Cave

Views: 1640
2 Min Read

लोनाड लेणी | Lonad Cave –

कल्याणपासून दहा किलोमीटरवर लोनाड गावाजवळ एका टेकडीच्या पोटात हे लेणे आहे. आत्ता आत्ता गेल्या काही वर्षात लोकांना माहीत होत आहे. नाहीतर मोजक्याच लोकांना माहीत होते. अजूनही कल्याण-ठाण्यासारख्या जवळच्या शहरातील बऱ्याच जणांना माहीत नाहीये. इथले वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आकर्षक आहे. कल्याणला इतक्या वेळा जाणे होते, पण ही लोनाड लेणी | Lonad Cave कल्याणहून इतक्या जवळ आहे हे माहीत नव्हते. यावेळी जाऊन आलो. ते वैशिष्ट्यपूर्ण समूह शिल्प नेमके कोणाचे आहे ह्याची ठाम माहिती नाही. काहींच्या मते हे बौद्ध जातककथांमधील दृश्य आहे तर काहींचा अंदाज आहे की हे शिल्प इराणचा राजा दुसरा खुश्रु याने चालुक्य राजा पुलकेशीच्या दरबाराला भेट दिली होती त्याचे असावे. राजा, राजाचे पाय चेपणारी दासी, राणी, सेविका, मंत्री वगैरे वीस व्यक्ती या शिल्पात कोरलेली आहेत.

लेणीपासून एकदोन किलोमीटरवर लोनाड गावात शिलाहारकालीन शिवमंदिर आहे. बरीच पडझड झालेली आहे. या मंदिराचा व लोनाड गावाचा इतिहास जुना आहे. शिलाहार राजा अपरादित्य याच्या शके ९१९ मधील ताम्रपटात या मंदिराचा लोणादित्य आणि लोनाडचा लवणेतट असा उल्लेख आहे. लवणेतट या नावावरून लोनाड हे प्राचीनकाळी मीठ उत्पादनाचे मोठे केंद्र होते असे मानले जाते.

शिलाहार राजा मल्लिकार्जुन याच्या वसई येथील शके १०८३ मधील शिलालेखात आणि दुसरा अपरादित्य याच्या लोनाडच्या शके ११०६ मधील शिलालेखातही लोनाडच्या मंदिरांचे महत्त्वाचे उल्लेख आढळतात. असा मोठा इतिहास आहे. या शिवमंदिरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहेत. ठाणे जिल्ह्यातील आत्ता शिल्लक असलेल्या मंदिरांपैकी हे मंदिर सर्वात जुने आहे असे म्हणतात.

लोनाडच्या पुढे एक किलोमीटरवर चौधरपाडा गावात महादेव मंदिराजवळ एक मोठा संस्कृत शिलालेख – गद्धेगळ आहे. सहा फुटाचा हा दानपत्ररूपी शिलालेख शिलाहार राजा दुसरा केशिदेव याचा असून २४ जानेवारी १२४० रोजी त्याचे अनावरण करण्यात आले होते. शिलालेखाबरोबर चंद्र, सूर्य, मंगलकलश व गर्दभ शपवाणी कोरलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात गावोगावी अशा कितीतरी इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत.

प्रणव कुलकर्णी

Leave a Comment