लोंझा किल्ला –
महाराष्ट्रातील डोंगर दर्यात अनेक किल्ले आहेत. त्यातील काही किल्ले काळाच्या ओघात लोकांच्या विस्मरणात गेले. औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांच्या विस्मरणात गेलेला असाच एक किल्ला म्हणजे लोंझा किल्ला.
औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे त्याकाळात राजधानीकडे येणार्या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली होती. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळ्णीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे हळूहळू हे किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले.
औरांगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्याच्या दक्षिणेला जे खोर आहे त्याला स्थानिक लोक “राजू खोर” या नावाने ओळखतात. या खोर्यात “महादेव टाक” या नावाचा एक छोटा डोंगर आहे. मुख्य डोंगररांगेपासून एका खिंडीने वेगळ्या झालेल्या या डोंगरावर “लोंझा किल्ला” आजही गतकाळाची साक्ष देत उभा आहे. लोकांच्या विस्मरणात गेलेला हा सुंदर किल्ला शोधून काढण्याचे श्रेय श्री. राजन महाजन व श्री. हेमंत पोखरणकर यांच्याकडे जाते. चाळीसगाव पासून जवळ असलेला लोंझा किल्ला पाहिल्यावर एक वेगळा , सुंदर किल्ला पाहील्याच समाधान मिळत. खाजगी वाहानाने चालीसगावहून अंतूर व लोंझा हे दोनही किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
किल्ल्यावर जाण्यासाठी सिमेंटने बांधलेल्या पायर्यांचा मार्ग आहे. या मार्गाने ५ मिनिटात आपण खिंडीत पोहोचतो. खिंडीतून किल्ल्यावर जातांना डाव्या बाजूला एक शेंदुर लावलेली हनुमानाची मुर्ती पडलेली आहे. खिंडीतून ५ मिनिटात आपण कातळात कोरलेल्या काही पायर्या पायर्या चढून किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख उध्वस्त प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच कातळात कोरलेली गुहा पहायला मिळते. किल्ल्यावरील अवशेष पहाण्यासाठी प्रवेशव्दारतून आत शिरल्यावर प्रथम उजव्या बाजूला जावे. येथे एका खाली एक अशी कातळात कोरलेली दोन मोठी पाण्याची आयताकृती टाकी पहायला मिळतात. या टाक्यांना काटकोनात २ मोठी पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांच्या वरच्या बाजूला एका खाली एक अशी ३ पाण्याची टाकी आहेत, ही टाकी पाहून खालच्या बाजूस दिसणार्या मोठ्या चौकोनी टाक्याकडे जातांना वाटेत एक सुकलेल टाक व एक खांब टाक दिसते. या टाक्याच्या खालच्या अंगाला किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष व त्यात लपलेला छोटासा चोर दरवाजा आहे. चोर दरवाजा पाहून मोठ्या चौकोनी टाक्याजवळ यावे. किल्ल्याच्या या भागात एकूण १० टाकी आहेत. चौकोनी टाके पाहून डोंगराला वळसा घालून मागच्या बाजूने डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर चढावे. गडमाथ्यावर भिंतीचे अवशेष व घरांचे चौथरे पाहायला मिळतात. या चौथर्यावरच सध्या एक पीराच थडग आहे. त्याच्या पासून काही अंतरावर हनुमानाची मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. गडमाथा पाहून आल्या दिशेला परत न जाता विरुध्द दिशेने (प्रवेशव्दाराच्या दिशेला) खाली उतरावे म्हणजे आपण प्रचेशव्दारा समोरील गुहेपाशी पोहोचतो. वाटेत घरांची २ जोती पाहायला मिळतात.
प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला कातळात कोरलेली ४ खांबी प्रशस्त गुहा (लेणं) पहायला मिळते. या गुहे समोरची कातळ भिंत कोरून त्यातून गुहेचा प्रवेश मार्ग काढलेला आहे. त्यामुळे समोरून केवळ कातळभिंत व त्यातील खाच (दार) दिसते. गुहेत अनेक नविन बदल करण्यात आलेले आहेत. गुहेतील भिंतीवर वीरासनात बसलेल्या हनुमानाची प्रतिमा कोरलेला आहे. गुहेत फरश्या (लाद्या) बसवण्यात आल्या असून आत एक यज्ञकुंडही बांधलेले आहे. गुहेत एका साधूचे वास्तव्य आहे. या गुहेत २५ ते ३० जणांची रहाण्याची सोय आहे. गुहेच्या बाजूला पाण्याचे ५ खांबी पाण्याचे प्रशस्त टाक आहे. या टाक्यातील पाणी बारमही असून ते पिण्यासाठी वापरले जाते.
पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूस कातळत कोरलेल पाण्याचं कोरड टाक आहे. त्याच्या जवळच पाण्याच ५ खांबी बुजलेल प्रचंड मोठ टाक (लेणं/गुहा) आहे. त्याची लांबी ९८.५ फूट आहे. हे सर्व पाहून खाली उतरून पिण्याच्या पाण्याच्या टाक्यापाशी यावे. येथून ठळक पायवाटेने उत्तरेकडे (डोंगर उजव्या हाताला व दरी डाव्या बाजूला ठेवत) चालत गेल्यावर कातळात कोरलेल्या पायर्यांचा मार्ग लागतो. हा मार्ग नागद गावाकडे जातो. पूर्वीच्या काळी येथे प्रवेशव्दार असावे. पुढे पायर्या काटकोनात वळतात. साधरणत: ८ पायर्या उतरल्यावर डाव्या बाजूला कातळात कोरलेली शेंदुर लावलेली प्रतिमा पहायला मिळते. त्याचा आकार ओळखण्या पलिकडे गेलेला आहे. या प्रतिमेला वंदन करून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. किल्ला पहाण्यासाठी १ तास लागतो. लोंझा किल्ल्यावरून उत्तरेला अंतुर किल्ला दिसतो.
लोंझा किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.
Goraksha Ghawate