महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,08,829

सुरतेची लुट

Views: 4172
7 Min Read

सुरतेची लुट.

(राजमाता जिजाऊ साहेब ग्रंथमाला भाग २२)

इ.स.१६६० सालापासून मोगली फौजा स्वराज्यात  धुमाकूळ घालत होत्या, खेडी बेचिराख करून प्रजेच्या कत्तली करत होते. मोगल मराठे यांचे हे सरळ सरळ  युद्ध चालू होते, सुरतेवर हल्ला करून ते शहर लुटून घेऊन शिवाजीमहाराजांना मोगल बादशहावर सुड उगवायचा होता. जगातल्या मोठ्यात मोठ्या घडामोडी सुरतेमधे चालत असत.परदेशी व्यापारी व्यापार करून, येथून गलबते भरभरून पैसा नेत होते. या सर्व लोकांनी सुरतेची पेठ गजबजली होती. गोऱ्या लोकांकडून मोगलांना तोफा, बंदुका व दारूगोळा मुबलक मिळत असे.सुरत म्हणजे मोगल साम्राज्यातील पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात श्रीमंत व सधन शहर होते. दरवर्षी हजारो भाविक मुसलमान याच बंदरातून मक्केच्या यात्रेस  जा -ये करत. मुसलमान लोक सुरतेला मक्केकडे जाणाऱ्या मार्गावरील महाद्वार असे समजत. सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेली दुभती म्हैसच होती.मुल्ला अब्दुल जाफर या व्यापाऱ्याची तर मौल्यवान वस्तूंची खच्चून भरलेली नऊ मोठी जहाजे येथे होती.ही कोट्यावधी रुपयांची मालमत्ता सुरतेत पडून होती. येथे पैशाचा अक्षरशः महापूर येत होता. मोगलांना कराच्या रूपाने भरभरून संपत्ती मिळत होती.(सुरतेची लुट)

औरंगजेबाने स्वराज्याची धुळधाण केली होती. रयतेची लुटून नेलेली मालमत्ता सुरतमध्ये सुरक्षित होती .औरंगजेबाच्या फौजांनी संपूर्ण स्वराज्याची नासाडी केली होती. सुरतेवर हल्ला करून संपत्ती लुटून आणण्याचा जसा  महाराजांचा हेतू होता,तसा औरंगजेब बादशहाची प्रतिष्ठा धुळीला मिळवणे हाही हेतू होता. सुरत शहर म्हणजे मोगलांचे नाक होते. तेच कापले गेले तर सर्व जगात आपली कीर्ती होईल याची महाराजांना पूर्ण कल्पना होती.शाहिस्तेखानाने पुण्यात येऊन महाराजांच्या लाल महालात तीन वर्षे मुक्काम ठोकून महाराजांच्या अस्मितेला धक्का दिला होता .आता सुरत लुटून महाराज बादशहाच्या अस्मितेला धक्का देणार होते. उघड-उघड सूड घेऊन ,छापा घालून दुश्मनाची दौलत लुटून आणावयाचा बेत महाराजांनी आखला होता.  पुण्यापासून सुरतेपर्यंतचा सर्व प्रदेश मोगली सत्तेखाली होता.वाटेत मोगलांचे किल्ले,लष्करी ठाणी, अवघड वाटा , नद्या,डोंगर आडवे होते. तरीही महाराजांना सुरतेची सूरत हवी होती.

स्वराज्याच्या कल्याणासाठी, विस्तारासाठी पैसा हवा होता .तो सुरतहून  मिळवावा व स्वराज्य स्थापनेसाठी वापरावा हे शिवाजी राजांचे धोरण ठरले होते. एखादी मोहीम हाती घेतली की महाराज तिची योजनाबद्द, शिस्तबद्ध आणि काटेकोर पूर्वतयारी केल्याशिवाय छ.शिवाजी महाराज पुढचे पाऊल टाकत नसत.

महाराजांनी या कामासाठी  बहिर्जी नाईकाला बोलावले. बहिर्जी हा हरहुन्नरी व हजरजबाबी आणि कुठलेही सोंग वठविण्यात वाकबगार होता. बहिर्जी नाईका कडून महाराजांनी सुरत शहराची खडानखडा माहिती मिळवली. इतक्या लांबीच्या मोहिमेसाठी अवघड आणि सुरक्षित मार्गाची माहितीही त्यांनी शिवाजीराजांना दिली. सुरत म्हणजे जणू इंद्राची नगरीच ! ती लुटायचे नियोजन पक्के झाले.

छ. शिवाजीराजे तुळजाभवानीचे दर्शन आणि आऊसाहेबांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेऊन निघाले होते. सर्व तयारी केल्यावर दक्षिणेकडे स्वारीवर जाणार अशी हूल महाराजांनी उठवली. शत्रूच्या नकळत आपल्या घोडदळासह राजगडाहून सुरतेवरील स्वारीस प्रयाण केले. अवघ्या सहा मैल अंतरावरून सिंहगडाला वेढा घालणाऱ्या मोगल सैन्याला याची  कसलीच खबर लागली नाही.  पाचव्या दिवशी महाराज गणदेवीला पोहोचले. पोहोचल्यानंतर ‘इनायत खानाला’ निरोप दिला की आम्ही उद्या सुरतेस येत आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हास भेटावे आणि आम्ही मागितलेली रक्कम आमच्या स्वाधीन करावी, अन्यथा आम्ही सुरत जाळून बेचिराख करून टाकू. त्याची सर्व जबाबदारी तुमच्यावर राहील .इनायतखानाने उध्दट मजकूर असलेले पत्र पाठवून दिले

सुरतेस खरी वस्ती व्यापारी लोकांची होती. त्यांना युद्धकलेचे ज्ञान नव्हते . आपल्या खर्चाने स्वतःचे संरक्षण करणे  ही कल्पनाही त्यांच्या मनाला शिवत नव्हती.अशा लोकांमध्ये शिवाजी महाराजांच्या स्वारीची वार्ता समजताच मोठी घबराट पसरली. पळापळ सुरू झाली .इनायतखान किल्ल्यात लपून बसला. व्यापार्‍यांनी पैसे चारून किल्ल्याच्या आत प्रवेश मिळवला .

इनायतखानाने किल्ल्यातून तोफांची मारागिरी सुरू केली. त्यामुळे मराठ्यांचे नुकसान न होता शहरातील घरे नष्ट होऊ लागली. शहरात भयंकर आगी लावण्यात आल्या. त्यामुळे रात्र दिवसा सारखी प्रखर भासू लागली. धुरांच्या मोठमोठ्या लाटामुळे दिवस रात्रीसारखा भासू लागला. शहरात मराठे दंगा घालत होते. परंतु कोणाच्याही धार्मिक वस्तुंना वा वास्तूंना किंवा स्त्रिया , व्यक्तींना शिवतही नव्हते.महाराजांनी गोरगरिबांना त्रास दिला नाही.डच वखारीजवळ बहरजी बोहरा  नावाच्या व्यापाऱ्याच्या भला मोठा वाडा होता. त्याच्याजवळ  80 लाखांची मालमत्ता असावी,  असा अंदाज होता. मराठ्यांनी हा वाडा खणून साफ केला व शेवटी त्यास आग लावून दिली.या  वाड्यातून महाराजांना कित्येक शेर   हीरे, माणके,मोती ,सोने, लक्षावधी रुपयांची संपत्ती मिळाली.हाजी सय्यद नावाचा  व्यापारी तर कित्येक लाखाची संपत्ती जिथल्या तिथे टाकून पळून गेला.

पहिल्या लुटीत मोठेच घबाड एकदम मिळाले. दोन व्यापारी तीस पिंपे सोने घेऊन तापी नदीच्या पलीकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. एवढे अवजड धन नदीच्या पलीकडे न्यायचे कसे? हा प्रश्नच होता. पण हा प्रश्न महाराजांनी सोडवला .तीस पिंपे सोने मराठा स्वराज्यात दाखल झाले. शिवाजी महाराजांचे सैन्य अगदी साधे व सडे होते.तंबू अथवा तोफा त्यांच्याजवळ काहीच नव्हते. खासा महाराज एका झाडाला बांधलेल्या सावलीत उभे असत. पाच-सहा जणांच्या टोळ्या  करून लूट करत होते. घरे पाहून उद्ध्वस्त करणे मराठ्यांचे काम होते. शिवाजीराजांच्या डोक्यावर फक्त एक बिन कनातीचे पाल होते.लोक लूट घेऊन एकसारखे त्यांच्यापुढे ओतीत होते. सोने, रुपे ,बाजूला काढून ठेवून बाकीचे जवळ उभे राहणाऱ्याला ते वाटून टाकत होते.

९ जानेवारी ला  महाराजांना बातमी लागली की सुरतेला वाचवण्यासाठी मोगली फौजा वेगाने चाल करून येत आहेत. त्या वेळी राजे सोने, चांदी, रूपे ,हिरे, माणके, रत्न अशी प्रचंड संपत्ती घेऊन रायगडावर निघून गेले. कापडचोपड इतर वस्तू त्यांनी गोरगरीबांना वाटून टाकल्या. त्वरेने महाराज सुरतेहून निघून गेले.अगदी वेगाने कूच  करून त्यांनी प्रचंड लुट रायगडाकडे आणली.महाराजांनी ही लूट आधी आणून ठेवलेल्या जहाजातून आपल्या  राज्यात आणली.महाराजांवर आपल्या आईचे फार चांगले संस्कार होते .म्हणून महाराज म्हणत “कोणाशीही आमचे  व्यक्तीगत वैर नव्हते. आम्ही सुरत लुटली ती  औरंगजेबाची म्हणून लुटली.औरंगजेबाने  आमच्या मुलखाची सतत तीन वर्ष बरबादी केली. कत्तली केल्या, त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. बरेच दिवसांची आमची मसलत पार पडली”

सुरत लुटून महाराजांनी मोगलांची बेइज्जत केली .महाराजांच्या सुरतेच्या  लुटीमुळे तेथील व्यापाऱ्यांनी आपला व्यापार हलवून मुंबईकडे आणला. परिणामी मुंबई बंदराचा विकास झपाट्याने झाला. पुढे पुढे तर मुंबई हेच पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचे शहर व बंदर बनले .आधुनिक मुंबईचा पाया महाराजांच्या सुरतेच्या या लुटीमुळे घातला गेला. लुटीतून महाराजांना प्रचंड संपत्ती प्राप्त झाली. खुद्द शिवाजी महाराजांना त्या लूटीची मोजदाद करावयास वेळ मिळाला नाही.इतकी ती  प्रचंड लूट  होती. महाराजांनी सुरत लुटल्यामुळे त्यांच्या राजकीय व लष्करी किर्तीत मोठी भर पडली. तसेच शत्रूपक्षावर मोठाच वचक बसला .सर्व हिंदुस्थान त्यांच्या सामर्थ्याकडे आदराने पाहू लागला.

सुरतेची लुट च्या परिणामामुळे औरंगजेबाने महाराजांवर दरबारातील श्रेष्ठ व महापराक्रमी सरदार मिर्झा राजा जयसिंग याची नेमणूक केली. प्रचंड सैन्य व साधनसामग्री घेऊन शिवाजीराजांची पाळेमुळे खणून त्यास नष्ट करण्याच्या इराद्याने मिर्झाराजे जयसिंग चाल करून आले. मिर्झाराजे जयसिंगाच्या रूपाने एक महाभयंकर संकट स्वराज्या समोर उभे राहिले. छ.शिवाजी महाराजांनी आपली सर्व शक्ती एकवटून त्यास तोंड देण्यास सज्ज झाले.(सुरतेची लुट)

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment