महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,252

सुरतेची लुट १६६४

Views: 4446
15 Min Read

सुरतेची लुट १६६४ ( स्वराज्याची भरपाई आणि औरंगजेबाचा सूड )

विजापूर आदिलशाही व दिल्लीची मोगलशाही यांनी स्वराज्यात आक्रमण करून स्वराज्यातील रयतेस लुटले त्यामुळे स्वराज्यास आर्थिक हानी होऊन स्वराज्याचा खजिना रिता झाला होता. शाहिस्तेखान सलग ३ वर्ष स्वराज्यात ठाण मांडून बसला होता त्याने स्वराज्याची नासाडी केली . प्रजा मोगली आक्रमणामुळे भरडून गेली होती. शाहिस्तेखानास शास्त करून त्याच्या हाताची बोटे छाटून त्यास जरब बसवली गेली त्यामुळे तो पळून गेला . स्वराज्यावरील संकट तात्पुरते जरी दूर झाले तरी औरंगजेब परत स्वराज्यावर अधिक शक्तीनिशी स्वराज्यावर चालून येणार हे शिवाजी महाराज्यांनी ओळखले होते. भविष्यात येणाऱ्या संकटकाळी स्वराज्याचा खजिना समृद्ध असणे हे अपरिहार्य होते. मोगली प्रदेश लुटून औरंगजेबाचा सूड घेणे व स्वराज्याचा खजिना समृद्ध करणे हे दोन हेतू साध्य करण्यासाठी शिवाजी महाराज्यांनी सुरत लुटीची योजना निश्चित केली.सुरतेची लुट.

पश्चिम किनाऱ्यावरील मोगल साम्राज्यातील सुरत अतिशय समृद्ध असे शहर व महत्वाचे बंदर होते. दिल्लीखालोखल सुरतेची ख्याती होती. कोट्यावधी रुपयांचा व्यवहार सुरतेतून होत असे. औरंगजेबास केवळ जकातीच्या रूपानेच सुरतेतून १२ लाख रुपये वर्षास मिळत. इंग्रज,डच,पोर्तुगीज, युरोपियन तसेच इतर अनेक देशी व परदेशी व्यापारी सुरतेहून व्यापार करीत. हिरे,मोती , सोने, जड-जवाहीर यांनी सुरतेतील व्यापारी गर्भ श्रीमंत होते . अनेक अनमोल वस्तू, उंची वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, चंदन , अत्तर , रेशीम अश्या अनेक वस्तूंचा व्यापार येथून होत असे. तसेच स्त्रीया व गुलामांचा व्यापर देखील सुरतेतून होत असे. इंग्रज व डच्यांच्या वखारी येथे होत्या. मक्केला जाणारे यात्री सुरतेवरून यात्रेस जात त्यामुळे सुरतेस धार्मिक महत्व देखील होते. सुरतेचे मूळ नाव सूर्यपूर . राजगडापासून सुरतेचे अंतर ३०० मैल होते त्यावेळी सुरतेत ७००० घरे असून लोकसंख्या दोन लाख इतकी होती. वैभव संपन्नत्ता व रुबाबदारपणा यामुळे तत्कालीन मुस्लीम सुरतेस बादशहाच्या दाढीची उपमा देत असत.

स्वराज्याचे हेर बहिर्जी नाईक यांनी महाराज्यांच्या सांगण्यावरून सुरतेची हेरगिरी करून बित्तंबातमी गोळा केली . सुरतेतील गडगंज श्रीमंत व्यापारी व सुरतेच्या शाही रक्षणातील ढिसाळपणा याची माहिती महाराज्याना दिली व सुरत मारील्याने अगणित द्रव्य सापडेल असेही सांगितले. शके १५८५ मार्गशीर्ष वद्य द्वितीयेस म्हणजे रविवार ६ डिसेंबर १६६३ रोजी महाराज्यांनी सुरत लुटण्यासाठी राजगडावरून प्रस्थान केले. सुरतेस जाण्याचा मार्ग हा बहुतांशी मोगली मुलुखांतून जात होता. फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे हा समकालीन प्रवासी लिहितो “ महाराज्यांनी केवळ रात्रीचा प्रवास केला . दिवसा उन्हापासून बचावासाठी व शत्रू पक्षास आपल्या हालचालींचा सुगावा लागू नये म्हणून दिवसा ते दाट जंगलात विश्रांती घेत असत “. ३१ डिसेंबर १६६३ रोजी त्र्यंबकेश्वराच्या महादेवाचे दर्शन करून सोमवार दिनांक ४ जानेवारी १६६४ च्या रात्री सुरते जवळील घणदेवी या ठिकाणी पोहचले.

मंगळवार दिनांक ५ जानेवारी १६६४ रोजी कुणीतरी अनोळखी सरदार ८ ते १० हजार सैन्यासह आल्याची वार्ता सुरतेत सर्वत्र पसरली. महाराज्यानी आपण बादशाही सरदार असून अहमदाबादेस जात असल्याची बतावणी करून शत्रूस गाफील ठेवले. परंतु हे अनोळखी सरदार शिवाजी असावेत व सुरत लुटण्यासाठी येत आहेत अशी बातमी सुरतेस पोहचली व सुरतेत धावपळ सुरु झाली. बुधवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी महाराज सुरतेच्या उंबरठ्याजवळील उधना या गावी पोहचले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महाराज सुरतेत दाखल झाले. सुरत सुभेदार इनायतखान याने आपला हस्तक पाठवून शिवाजी महाराज्यांना निरोप पाठवला “ आपण अधिक जवळ येवू नये येथील लोक भीतीने पळून जात आहेत व हे बादशहास देखील आवडणार नाही “ . असा निरोप ऐकून महाराज्यांनी चिडून त्या हस्तकास कैद केले. डचांनी देखील आपले दोन हस्तक माहिती घेण्यासाठी पाठवले परंतू शिवाजी महाराज्यांनी या सर्व हस्तकाना कैद केले.

शिवाजी महाराज्यांनी आपली दोन माणसे सुभेदार इनायतखान याकडे पाठवून हाजी बेग, बहिर्जी बोहरा व हाजी कासम या तीन प्रख्यात व्यापार्यांनी आपल्या समोर येऊन खंडणीचा ठराव करावा अन्यथा सर्व शहर आग व तलवारीला बळी पडेल असा निरोप पाठवला. परंतु सुभेदार इनायतखानने शिवाजी महाराज्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले व किल्ल्यात दडून बसला त्यामुळे शिवाजी महाराज्यांनी सुरत लुटण्याचा हुकुम सोडला व क्षणार्धात सुरतेत अग्निप्रलय व लुटालूट सुरु झाली. सुभेदार इनायतखानने किल्ल्यातून मराठ्यांनवर तोफेचा मारा केला परंतु या तोफेचे गोळे शहरातील घरांवर पडून ती घरे पेटू लागू लागली . किल्ल्याला लागून असलेले सुरतेचे जकातघर मनसोक्त लुटण्यात आले. जकात घराजवळील इंग्रज्यांचा माल लुटण्यात आला. इंग्रज अधिकारी अ‍ॅथोनी स्मिथ वखारीतून परतत असताना त्यास मराठ्यांनी कैद केले . गुरुवार दिनांक ७ जानेवारी रोजी सुभेदार इनायतखानने एका तरुण वकिलास महाराज्यांकडे वाटाघाटी करण्यासाठी पाठवले परंतु इनायतखानाचा वकील व महाराज्य यांच्यात बोलणी चालू असताना त्या वकिलाने खंजीर घेऊन महाराज्यांवर प्राण घातक हल्ला केला परंतु महाराज्यांच्या अंगरक्षकाने त्या वकिलाचा हात छाटून टाकला या चकमकीत तो वकील महाराज्यांच्या अंगावर पडला व त्याचे रक्त महाराज्यांच्या छातीवर पडले त्यामुळे महाराज्यांचा मृत्यु झाला असा समज मराठा सैनीकांचा झाल्याने त्यांनी कैद्यांची कत्तल सुरु केली त्यात तो वकील देखील मारला गेला. परंतु या हल्ल्यात महाराज बचावले व महाराजांनी कत्तल थांबावण्याचा हुकुम दिला .

सर्व कैद्याना महाराज्यांसमोर हजर केले गेले व त्यांचा गुन्हा पाहून कुणाचे हात तर कुणाचे डोके मारले गेले या गदारोळात ४ डोकी व २४ हात कलम करण्यात आले. इंग्रज अधिकारी अ‍ॅथोनी स्मिथ याचे डोके मारण्यात येणार इतक्यात महाराज्यांनी त्याला मारू नये असे सांगितल्याने त्यामुळे त्याचे प्राण वाचले. इनायतखानाने मारेकरी पाठवल्याने मराठे चिडले व त्यांनी सुरतेत जाळपोळ व लुटालूट केली . शुक्रवार दिनांक ८ रोजी मराठा सैन्याने सुरतेत जाळपोळ आणि लुट केली. तेल्यांची दुकाने फोडून त्यातील तेल भिंती , दारे , खिडक्या यांच्यावर ओतून मराठे घरांना आगी लाऊन देत असत. सुरतेतील किमान ३००० घरे जाळली गेली. शिपाई लुटीचा ऐवज महाराज्यांसमोर रिता करीत त्यातील सोने, रूपे, हिरे ,मोती असा मौल्यवान ऐवज स्वराज्यकोषासाठी ठेऊन अन्य वस्तू गोर-गरिबांना वाटून दिल्या जात असत. शनिवार दिनाक ९ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान भडोचहुन सुरतेच्या रक्षणासाठी मोगली कुमक येत असल्याची बातमी आली व महाराज्यानी मावळ्यांना आवरण्याचा हुकुम दिला त्यानुसार मराठे सुरतेच्या विविध भागातून लुट करीत छावणीत दाखल झाले. रविवार दिनांक १० जानेवारी महाराज्यांनी परतीचा हुकुम सोडला आणि मराठे सुरतेची लुट घेऊन स्वराज्यात येण्यास निघाले.

इंग्रज अधिकारी अ‍ॅथोनी स्मिथ यास शिवाजी महाराज्यांनी “ आपला इंग्रज किंवा इतर व्यापाऱ्यांचे व्यक्तिश: नुकसान करण्याचा इरादा नसून फक्त औरंगजेबाने आपल्या मुलखावर स्वाऱ्या करून आपले संबंधी लोकांना मारले याकरिता औरंगजेबाचा सूड घ्यायचा आहे इंग्रज व डचांनी काही द्रव्य दिले तर आपण त्यांच्या वखारीना तसदी देणार नाही . नाहीतर शक्य तेवढा त्रास देईन “ असे संभाषण केले

डच अधिकारी व्हॉंल्कार्ड इव्हरसनने शिवाजी महाराज्यांनी सुरत सोडतानाचे उदगार नमूद केले आहेत तो लिहितो शिवाजी महाराज म्हणतात “ औरंगजेबाची दाढी ओढण्याची अनेक दिवसांची माझी इच्छा पूर्ण झाली “. वैभव संपन्नत्ता व रुबाबदारपणा यामुळे तत्कालीन मुस्लीम सुरतेस बादशहाच्या दाढीची उपमा देत असत.

इंग्रज वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झेडन लिहितो सुरतेच्या बऱ्याच भागाची राखरांगोळी झाली आहे . कारण संपत्ती मिळवणे हा शिवाजीचा उद्देश नसून औरंगजेबाचा सूड त्याला घ्यावयाचा होता.

पोर्तुगीज कॉस्मा डा गार्डा लिहितो “ शिवाजीचा मुख्य उद्देश श्रीमंत व्यापारी वैगरेंचे फक्त धनद्रव्य लुटणे व शाहिस्तेखानाची व औरंगजेबाची तो यत्किंचितहि तमा धरीत नाही व त्यांच्या सेना सामर्थ्याची भीती तो मुळीच बाळगत नाही , इतकेच दाखवायचे होते. त्याची खास तेथिल अधिकार्यांबरोबर किंवा लोकांबद्दल काही तेढ आली न्हवती . गरीब लोकांबद्द्दल त्याला पूर्ण सहानभूती होती त्यांनी आपणास नको असलेले लुटीतील जिन्नस गरिबांना वाटले आणि अग्नीमुळे त्याचे जे नुकसान झाले होते त्यापेक्षा अधिक किमतीचा ऐवज त्यांना मिळाला होता.

पोर्तुगीज कॉस्मा डा गार्डा लिहितो “ सुरत लुटीच्या वेळी महाराज्यांची आपल्या सैनिकांना सक्त ताकीद होती कि कुणी प्रतिकार करणार नसेल तर त्याला ठार करू नये . त्यामुळे प्रजेपैकी कोणीही प्रतिकार न केल्याने कुणालाही ठार मारण्याचा प्रश्नच उद्भभवला नाही.

रेव्हरंड फादर अ‍ॅमब्रॉस ह्या ख्रिश्चन मठाधीपतीच्या विनंतीवरून महाराज्यांनी त्याला अभय दिले व फादर अ‍ॅमब्रॉसच्या मठाला तसेच कोणत्याही धार्मिक स्थळाला नुकसान केले नाही.

मराठ्यांनी बुधवार दिनांक ६ जानेवारी सकाळपासून ते शनिवार दिनांक ९ जानेवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सलग ४ दिवस सुरत शहर लुटले या लुटीत किती लुट मिळाली त्याच्या वेगवेगळ्या नोंदी आढळून येतात लुटीचे वर्णन लक्षात घेता शिवरायांना स्वराज्यासाठी मोठी संपत्ती सुरतेतून मिळाली. इंग्रज लिहितात शिवाजीने सुरत लुटून नेलेले जिन्नस , होन, माल मोती ,हिरे मिळून सुमारे एक कोटीचे होतील.

सुरतेतील धनाढ्य व्यापारी वीरजी व्होरा याची ८० लक्ष संपत्ती असल्याचे जगजाहीर होते. या लुटीत त्याच्या घरातील संपत्ती ३००० हमालांच्या खांद्यावर २ पोती लादून लुटण्यात आली. त्यातील काही पोती केवळ मोहरानी भरलेली होती. या लुटीत २८ शेर मोठ्या आकाराचे मोती , हिरे , माणके आणि अत्यंत मोल्यवान रत्ने होती. मराठ्यांची लुट चालू असताना दोन व्यापारी आपली संपत्ती घेऊन नदी पार करून पलीकडे जात होते ते मराठ्यांच्या हाती लागले त्यांच्याकडे सोन्याने भरलेले ३० पिंप मिळाले.

अॅबिसीनीयाचा वकील ख्याजा मुराद औरंगजेबासाठी नजराणा घेऊन सुरतेस आला होता तो मराठ्यांचा तावडीत सापडला अखेर औरंगजेबासाठी आणलेला नजराणा महाराज्यांना अर्पण करून त्याने आपली सुटका करवून घेतली

कॉस्मा –द –ग्वार्दच्या म्हण्यानुसार मराठ्यांनी उंची रेशीम आणि चांदीच्या नाण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून फक्त सोन्याच्या मोहरा लुटल्या. या एका सोन्याच्या मोहरेची किंमत चांदीच्या नाण्याएवढी आहे. जेथे जेथे म्हणून सोने मिळायची शक्यता होती तेथे तेथे शिवाजीने आपली माणसे पाठवून लुटालूट केली . हि सगळी लुट ९०० बैलांवरून वाहून नेण्यात आली.

शके १५८५ च्या माघ वद्य चतुर्थीला म्हणजे ५ फेब्रुवारी १६६४ ला महाराज सुरतेची लुट घेऊन राजगडी पोहचले. १८ जानेवारी १६६४ रोजी औरंगजेब लाहोरहून दिल्लीस पोहचला असता त्यास शिवाजी महाराज्यांकडून सुरतेच्या लुटची वार्ता समजली व त्याला याची खंत वाटून सुरतेच्या लुटीचा सूड घेण्याचा निश्चय केला.

सुरत शहराच्या ऐश्वर्याचे व सुरत लुटी नंतरच्या विध्वंसाचे वर्णन समकालीन विजापूर कवी नुस्त्रती त्याच्या काव्यामध्ये व्यक्त करतो

कि सुरत ककर मुल्के गुजरात मे
बंदर यक अथा खूब सब बात में/
रव्हे बहरो –खुष्की के तुज्जार वहां
मिले वस्त जे नहीं सो आलम में वहां /
यक एक कुचा यक शहर मामुर अछे
हर यक घर में कई गंज भरपूर अछे /
लेवे हिंद नित फ़ेज इस थे नवल
कि जुं अब्रे को आबे –दर्या ते बल /

सुरत नावाचे गुजरातेतील हे बंदर सर्व बाबीत फारच छान होते. तेथे खुष्कीचे व समुद्राचे व्यापारी राहतात . जगात न मिळणारी चीजवस्तू तेथे मिळे. एकेक गल्ली म्हणजे एक वैभवसंपन्न शहर होते. एकेका घरात कित्येक द्रव्य भांडारे होती. ज्याप्रमाणे वर्षाकालातील मेघाला समुद्राच्या जलसंचयाने संपन्नता येते, त्याप्रमाणे हिन्दुस्थानाला या शहरापासून नित्य नवी संपन्नता प्राप्त झाली होती.

सुरत लुटीनंतरचे कवी नुस्त्रतीने केलेले वर्णन व त्याने काव्यात दिलेली उपमा वस्तुस्थितीचे चित्र डोळ्यासमोर उभे करते

किया लुट युं पल में बंदर को पाक
कि जुं आग लगतें न राहे बाज राक /
फिरी खूब सुरत कि सुरत ने यूं
जवानी थे महबूब पीरी में जुं /

लुटालूट करून एका क्षणात बंदराचा असा विध्वंस केला , ज्याप्रमाणे आग लागल्यानंतर राखेशिवाय काहीच शिल्लक राहत नाही. सुरत नगरीचा देखणा मुखवटा असा बदलला , जणू तरुण प्रिया वृद्धावस्थेत बदलून गेली.

सुरतेच्या लुटीची बातमी औरंगजेबास समजल्यावर तो फार दुःखी झाला . औरंगजेबाची हि अवस्था कवी नुस्त्रतीने आपल्या काव्यात रेखाटली.

पकड अपने दांतो में हैरत सुं वोंट
कह्या चाबता सख्त गुस्से सुं होंट /
मगर कुछ है यह आसमानी बला
कि हो ला-दवा युं करे मुबतला /
दिस आता है ना होय हमन ते इलाज
अली कि मदद आये बाज /

औरंगजेबाने सखेद आश्चर्याने दाताने बोट चावले. क्रोधाने ओठ चावू लागला. व म्हणू लागला कि हि काहीतरी अस्मानी बला आहे . याचा काही इलाज नाही. असे दिसते कि अलीची ( आदिलशहा ) मदत मिळाल्याशिवाय आमच्याने याचा इलाज होणार नाही.

समकालीन कवी भूषण सुरतेवरील लुटीचे व दिल्लीचा पराभव कसा झाला याचे वर्णन शिवभूषण या ग्रंथात करतात

दिल्लीय दलन गजाइ कै सिव सरजा निरसंक /
लुटी लियो सूरति सहर बंकक्करि अति डंक /
बंकक्करि अति डंकक्करि अस संकक्करि खल /
सोचच्चकित भरोचच्चलिय विमोचच्चख चल /
तट्टट्टइ मन कट्टट्टीक सो रट्टट्टील्लीय /
सद्दद्दीसि दिसि मद्दबि भई रद्दद्दील्लीय //

सर्जा शिवाजीने निर्भयपणे दिल्लीच्या सैन्याचे पारिपत्य केले आणि डंका वाजवून सुरत शहर लुटले . अश्याप्रकारे डंका वाजवल्याने शत्रूची दैना उडाली व ते आश्चर्यचकित होऊन आणि चिंताग्रस्थ होऊन नेत्रातून अश्रू वर्षाव करीत भडोच शहराकडे पळाले. हि पळण्याची योजना त्यांनी पूर्ण विचारांती, मनाची तयारी करून ठरवली . त्यामुळे दिल्ली दबून बसली व आणि चहूकडे तिचा अपमान झाला.

सुरत जराय कियो दाह पातसीह उर स्याही जाइ सब पातसाही मुख झलकी/

सुरत जाळली तेव्हा बादशहाच्या छातीत जळजळ होऊ लागली आणि त्याचा काळिमा बादशाही सल्तनतीच्या तोंडाला फसला गेला.

रूप गुमान हरयो गुजरातको सुरतको रस चुसके राख्यो /

गुजरातचे रूप आणी शोभा नाहीशी करून सुरतेला लुटले व तेथील वैभव नष्ट केले.

धुरि तन लाइ बैठी सुरत है रैन दिन सुरत को मारि बदसूरत सिवा करी /

महाराज्यांनी सुरतेला लुटून बेसुरत केले. त्यामुळे आता सुरत स्वतःच्या शरीराला रात्रंदिवस राख फासून बसलेली असते.

संदर्भ :- दख्खनी हिन्दीतील इतिहास व इतर लेख :- देवीसिंग व्यंकटसिंग चौहान .

शककर्ते शिवराय :- विजयराव देशमुख . शिवराज भूषण :- केदार फाळके.

श्री. नागेश सावंत

Leave a Comment