Lords budda, Yashodhara and Rahul
Cave number:17
पिंडाचारास्तव निघालेले तथागत एकदा स्वत:च्या च महाली येतात, त्या क्षणीचा अव्यक्त प्रसंग उपरोक्त शिल्पपटात कोरला आहे. अधोवदन, शांत चर्येसहीत, काषायवस्त्रे परिधान केलेले तथागत हाती भिक्षापात्र घेऊन उभे आहेत. त्यांच्या उजव्या बाजूस पत्नी यशोधरा पुत्र राहुल समवेत, विस्मयकारक दृष्टीने तब्बल 12 वर्षाने भिक्षू रुपात दिसणार्या आपल्या पतिस अवलोकीत आहे. तत्समयी झालेली तिच्या मनाची अवस्था चेहर्यावर दर्शवण्यात शिल्पकारास प्रमाणापेक्षा अधिक यश मिळाले आहे.(Lords budda)
राहुल च्या जन्मानंतर अगदी सातव्या दिवशी गृहत्याग केलेल्या पित्याची नेमकी ओळख पुत्रास कशी करुन द्यावी. ही संभ्रमावस्था तथा भिक्षू वेषात असलेल्या पित्याकडे पाहताना राहुल ची उडालेली धांदल, कित्येक पूर्व स्मृतींना जिवंत केलेला यशोधरेचा अव्यक्त दृष्टीक्षेप.. सारेच काही अगदी जिवंत आणि हृदयद्रावक भासते. या ठिकाणी राहुल आपल्या पित्यास पितृऋणातून मूक्त करण्यास सुचवतो, मात्र त्यासाठी पित्याजवळ कोणत्याही प्रकारचे द्रव्याधि साधन नसल्याने, हाती असलेले भिक्षापात्र च तथागत आपल्या पुत्रास देतात. तद्नंतर राहुल सुद्धा भिक्षू संघात प्रवेश करतो. पित्याचे ज्ञान काही अंशी तरी प्राप्त करणे हेच खरे पितृऋणातून मूक्त होणे होते, मात्र. यशोधरेच्या स्त्रीसुलभ भावनांचे काय? शेवटी स्त्री भावनेची व्यथा अव्यक्त च.
“वात स्वत:स दग्ध करून घेते, तेव्हा च प्रकाश निर्माण होतो. दिपशिखेचे दर्शन सहजतेने होते आणि म्हणून तर वात दुर्लक्षणीय ठरते, मूल्य हीन ठरते,हे सत्य असले तरी वाती शिवाय प्रकाशाचे अस्तित्व तरी शक्य आहे का”.
~Shrimala K. G.