राजगड मुरुंब डोंगरी ,
तीन माच्या तीन द्वारी…
दोन तपे कारोभारी ,
जयावरी राहिले..
राजगड हा शिवरायांच्या अफाट महत्वकांक्षेची उंची दर्शवतो.
राजगड नेहमी सांगत आला आहे , ‘लढलो जरि, ना पडलो मी.
खरेतर राजगडाचे सुंदर ते रूप कायम तरुण,खुललेले, मनाला लुभावणारे असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे, उन्हाळा असो, हिवाळा असो की पावसाळा, नेहमी मनात भरणारे. पण प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे दर्शवणारे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. पण त्यातूनही पावसाळा सुरू होताना सह्याद्रीच्या हिरवाईत बुडालेला हा गड सोनकीच्या फुलांनी जणू नव्या नवरीप्रमाणे या सह्याद्रीसह सजतो, नटतो, बहरतो, हिरवे गालिचे पांघरतो. कास पठरासारखी रंगेबिरंगी फुले इथेही पाहायला भेटतात. ऊन-पाऊस, ढग-धुके आणि हिरवाई-रानफुलांच्या सहवासात या राजगडाचा प्रत्येक दृश्य, बुरुज, माची ही बदलून जाते. गडावरील असंख्य वास्तूंचे रूप खुलते. एकदा तरी या गडावर यावे आणि त्याचे होऊन जावे.
राजगड हा अतिशय उंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे. त्याचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगरदऱ्यांतून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे कुणीही फिरकू शकत नाही..’ स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाबरोबरच्या साकी मुस्तैदखान याने शिवरायांच्या राजगडाबद्दल ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथात केलेले हे वर्णन! स्वकीयांनी केलेल्या कौतुकापेक्षा शत्रूने व्यक्त केलेले हे भयच राजगडची खरी ओळख करून देते. हीच ओळख ठेवून गुंजवणीच्या गुंजण मावळ खोऱ्यात उतरावे आणि या गडाचे सुंदर, बेलाग, रांगडे रूप डोळय़ांत सामावून घ्यावे!
राजगड हा किल्ला स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटनांचा एकमेव साक्षीदार आहे. स्वराज्याने नुकतेच बाळसे धरायला सुरुवात केलेली अन १६४६ ला राजांनी तोरणा जिंकून घेतला. तेथील माचीचे बांधकाम करताना धनाने भरलेले हंडे सापडले अन शिवरायांनी मोरोपंतांना समोरचा मुरुंबदेवाचा डोंगर दाखवला अन तिथे राजधानी वसवायची असे प्रयोजन बोलून दाखवले. मोरोपंत पिंगळे यांनी शिवरायांच्या मनासारखा अत्यंत उत्कृष्ट अस गरुडाचे घरटं तयार केलं. ज्यावर शत्रू हल्ला करण्याचा विचार देखील करू शकत नव्हता. एक उंच पर्वत, ज्याला बलदंड अशा तीन भुजा आणि मधोमध एक पुन्हा कातळ पर्वत! ‘मुरुंबदेव’चा हा भूगोलच नैसर्गिकदृष्टय़ा अभेद्यपण दर्शवणारा. आणि मग डोंगराच्या तीन सोंडांवर पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन अभेद्य माच्या तयार केल्या जणू घडवल्या. या माच्यांच्या मधोमध असलेल्या एका कातळ पर्वतावर अभेद्य असा बालेकिल्ला दिमाखात उभा राहिला आणि पाहता पाहता १६४८ ला स्वराज्याची राजधानी थाटली. किल्ले राजगड!
इसवी सन १६४८ ते १६७३ तब्बल पंचवीस वर्षे महाराजांनी इथे वास्तव्य केले. इथला दगड ना दगड राजांच्या ओळखीचा होता. प्रत्येक दगड, चिरा, बुरुज, माची ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली. शिवरायांच्या सहवासाचे सर्वाधिक भाग्य माँसाहेब जिजाऊंच्या नंतर राजगडालाच मिळाले असेल.
अनेकदा वाटते, महाराजांचे हे वास्तव्य राजगडाच्या अभेद्यपणातून होते, की त्याच्यावरील प्रेमातून! त्यांच्या या वास्तव्यात या गडाने छत्रपती राजारामांचा जन्म अनुभवला, तसाच महाराणी सईबाईंचा मृत्यूही सोसला. अफझलखानाचे स्वराज्यावरील संकटाची चिंता राजगडाने पाहिली तसेच अफझलखानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून प्रतापगडी आणि आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी बैराग्याच्या वेशात पहिले पाऊलही राजगडावरच टाकले. तसेच तानाजींनी कोंढाणा घेतला तो विजयी संकेत सुद्धा सगळ्यात आधी या राजगडानेच महाराजांच्या नजरेतून पाहिला. अशा कितीतरी घटना राजगडाने याची देही याची डोळा पाहिल्या. सुरतेच्या लुटीनंतर मिळालेले वैभव असो की पुरंदरच्या तहानंतर स्वराज्याला आलेली ओहोटी असो. स्वराज्याचे पहिले पाऊल ते हिंदवी सत्तेचा तो अखंड विस्तार, असे कित्येक सुवर्णक्षण राजगडाने पाहिले. घरातील एखाद्या थोरल्याच्या नात्याने, शिवरायांवर सतत आशीर्वादाचा, मायेचा हात ठेवत, जणू शिवरायांचा थोरला भाऊच. संकटसमयी नेहमी सोबत करणारा, प्रत्येक सुखदुःखात सोबत करणारा कुटुंबातील एक सदस्यच. राजगड सोडून रायगडी जाताना सुद्धा राजे कितीतरी कष्टी झाले असतील. अत्यंत अवघड मनाने त्यांनी गड उतरला असेल.
खर तर आयुष्यात एक स्वप्न होते की स्वराज्याच्या दोन्ही राजधान्या आयुष्यात एकदा तरी पाहायच्या. आणि ठामपणे ठरवून २०१६ च्या धनत्रयोदशी चा मुहूर्त साधून निघालो.
माझ्या गावापासून अंतर जवळपास १०० किलोमीटर, सकाळी ७ वाजता घरातून निघालो. जेजुरीहून सासवड, कापूरहोळ करत नसरापूर ला पोचलो. नसरापूरहुन आत एक रस्ता वळतो गावाकडे, त्या रस्त्याने आपण सरळ गेलं की राजगड, तोरणा किल्ला, मढे घाटाकडे जाऊ शकतो. पहिल्यांदाच गेलो असल्याने तिथल्या गावांची नावे खूपच वेगळी भासायची. अडवली, असकवली, आंदरूड, करांजवणे, विंझर अशी बरीच गावे मध्ये जाताना लागली. मार्गासनी च्या पुढे जाऊन राजगडला जाणारा रस्ता वळतो तिथून साखर येथे पोचलो.
साखर मधून आत गेलो की आपण गुंजवणे दरवाजा किंवा चोर दरवाजा मार्गे गडावर जाऊ शकतो. तुलनेने जास्त वेळाची चढाई असल्याने इकडून जाताना भटक्यांची बरीच दमछाक होते. पण इकडून जाताना गडाच्या बालेकिल्ल्याचे अन सुवेळा माचीचे एकदम विहंगमय असे दृश्य आपणांस दिसते. तर भुतोंडे म्हणजेच सेनापती येसाजी कंक यांच्या गावातून गेलो असता आपण अळू दरवाजा तुन गडावर जाऊ शकतो.
नवखे लोक सहसा साखर मधून राजगड चा बोर्ड वाचून आत वळतात व गुंजवणे हुन गडाकडे जातात. पण मी गुगल मॅप वर बघत सरळ वाजेघर हुन पाली कडे गेलो अन पायथ्याला पोचलो. वरती बघितलं तर उत्तुंग असा बालेकिल्ला खुणावू लागला तसेच पंख पसरून झेप घेण्यास सज्ज असलेली संजीवनी माची साद घालू लागली. बघता क्षणी मनाला वाटलं आजचा दिवस नक्कीच आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. हिरवंगार घनदाट जंगल, अन किर्रर्रर्र असा आवाज मनाला एकदम भुलवून टाकत होता.
पायथ्यापासून चढाई चालू केली तर त्या घनदाट झाडीतून एक छोटीशी पाऊलवाट जी पावसाने वाहून त्यात वरपर्यंत घळ पडली आहे. तिथून वरती निघालो अन वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी, वेगवेगळे कीटक वगैरेंची माहिती देणारे विविध फलक दिसले. चालत चालत बरेच वरती आलो अन गडाच्या बांधलेल्या पायऱ्या चालू झाल्या.
पायऱ्यांची रचना
राजगडावरील पाली दरवाजातून जाताना अगोदर ज्या पायऱ्या लागतात त्या जवळपास एक ते दीड फूट उंच आहेत. त्याला सुद्धा एक कारण आहे. जर चुकून शत्रू आलाच तर त्या उंच पायऱ्या चढताना शत्रूची दमछाक होईल अन त्याच्यात लढायचे त्राण राहणार नाही असे प्रयोजन त्यामागे असावे. त्या पायऱ्या चढत कड्याला वळसा घालत पाली दरवाजापाशी पोहचलो.
पाली दरवाजा
पाली दरवाजा हा राजगडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच गडाचा राजमार्ग. पाली दरवाजाने कितीतरी वेळा शिवरायांचा पदस्पर्श अनुभवला. राजे हाच मार्ग वापरायचे. कितीतरी वेळा शिवरायांनी येथून ये जा केली असेल. किती नशीबवान असेल हा दरवाजा. येथे खालचा आणि वरचा असे २ मुख्य दरवाजे आहेत. वरच्या दरवाज्याच्या बुरुजावरुन खालचा दरवाजा आणि त्यापुढचा मार्ग पूर्णपणे टप्यात येइल अशी दुर्गरचना येथे आहे. हा राजमार्ग असल्याने ३ मि. म्हणजेच पालखी येइल इतका रुंद आहे. येथे आपल्याला पहारेकर्यांच्या देवड्या आढळतात अन दुसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर कातळात कोरलेला एक शिलालेख आढळतो. तसेच जागोजागी गंज्या आहेत.
तिथून वरती गेलो की आपण पोचतो राजगडच्या पद्मावती माचीवर.
पद्मावती माची ही विस्ताराने खुप प्रशस्त असून बऱ्यापैकी सपाट आहे त्यामुळे शिवकाळात इथे बऱ्यापैकी राबता असायचा. राजांचा राहता वाडा, कचेरी, अंबरखाना, हवालदार-किल्लेदाराचे वाडे, शिबंदीची घरे, रत्नशाळा, ध्वजस्तंभ, सदर, पद्मावती-रामेश्वराचे मंदिर, सईबाईंची समाधी, पद्मावती तलाव व अन्य तळी, धान्याची- दारूगोळय़ाची कोठारे, चोरदिंडी, गुंजवणे दरवाजा, बिबट्याची गुहा, या साऱ्यांमधून ही माची बराच इतिहास सांगते-दाखवते. याच माचीवरून तोरण्याचे मनमोहक असे रुप दिसते.
पद्मावती तलाव बघून कोणालाच त्यात डुंबण्याचा मोह आवरणार नाही परंतु ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते त्यामुळे आपल्या मोहाला आवर घालवाच लागतो. पद्मावती मंदिरात माथा टेकवून बाहेर आले की महाराणी सईबाई यांची समाधी दिसते. शेजारी रामेश्वर मंदिर, पाण्याच्या विहिरी आढळतात त्यातील पाणी हे आर ओ फिल्टरपेक्षा भारी आहे. तिथेच आम्ही घरून आणलेली भाकरी, भाजी अन दिवाळीचा लाडू चिवडा खाऊन भूक भागवली.
यातील प्रत्येक वास्तूच नाहीतर सगळा राजगडच खरेतर शिवरायांचा पदस्पर्श-सहवास अनुभवलेला, प्रत्येक क्षण अनुभवलेला ,त्यामुळे इथला दगड ना दगड देवघरातील एखादा टाक वाटावा, जणू काही दैवी मुर्ती असा अन कायम मस्तकी घेऊन पुजावा इतका पावन आहे.
तिथून आम्ही तडक निघालो बालेकिल्ल्याकडे.
अभेद्य दुर्गम असा बालेकिल्ला हेही राजगडाचे वैभव! सात-आठशे फूट उंच, चहूबाजूंनी तुटलेले कडे अशा या बालेकिल्ल्याबद्दल पं. महादेवशास्त्री जोशी लिहितात- ‘साडेचार हजार फूट उंचीला भिडणारा हा उभा खडक जणू आभाळाला गवसणी घालणारा ‘उभा दगड’ आहे. कितीही पाऊस पडुद्या, पण तिथे तण सुद्धा उगवत नाही, मग झाडे-झुडपे कुठली! तो पावसात भिजतो, वाऱ्यावर सुकतो आणि उन्हात तापतो, जणू युगायुगांचा उभा शिवरायांची नेहमी पूजा करणारा एक निस्सीम योगीच.’
पद्मावती माचीवरून निघणारी अवघड आणि बिकट अशी निमुळती वाट आपल्याला बालेकिल्ल्याकडे घेऊन जाते. बरीचशी तंगडतोड केल्यानंतर आपण पायऱ्यांच्या मार्फत महादरवाजापाशी येऊन पोचतो अन तिथेच आपला सगळा शीण दूर होतो. दरवाजाचे हे शिल्प म्हणजे उभ्या कातळातील एक सुरेख कोंदण!
भल्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी इथे यावे आणि या कोंदणातून पूर्वेकडचा दिसणारा नैसर्गिक साधनांनी सजलेला नटलेला, बहरलेला हा देखावा आयुष्यभराची एक आठवण म्हणून मनी साठवावा. समोर सुवेळाचा सुंदर तो आविष्कार, उजवीकडचे भाटघर धरणाचा फुगवटा, नुकतीच उठू पाहणारी छोटी खेडी, सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ती टुमदार घरे, धुक्यात उलगडत जाणाऱ्या सहय़ाद्रीच्या रांगा हे सगळंच स्वर्गाचीच अनुभूती देत.
महादरवाजातून वरती येताच जननी देवीचे मंदिर लागते. तिथून डाव्या हाताने वरती गेले की शेवटच्या घटका मोजत असलेली ती तटबंदी आणि त्यातून दिसणारी ती संजीवनी माची स्वर्गसुख देऊन जाते.
वर येताच आजूबाजूला पाहिले की सिंहगड, पुरंदर-वज्रगड, रोहिडा, रायरेश्वर-रोहिडा पठार, त्यामागचा कमळगड, पाचगणी-महाबळेश्वर, प्रतापगड-मकरंदगड, मागे हळूच खुणावणारा गगनाला भिडणारा तो स्थितप्रज्ञ लिंगाणा, त्यामागचा रायगड आणि शेजारचा राजगडाचा भाऊ तोरणा असे बरेच मोठे ‘स्वराज्य’ दिसू लागते.
खुद्द बालेकिल्ल्यावर जननी, ब्रह्मर्षीचे मंदिर, राजांचा राहता वाडा, अंबरखाना, दारूगोळ्यांचे कोठार, विविध प्रकारची पाण्याची तळी, एका तळ्यात हिरवं पाणी, एकात निव्वळ पाणी तर एकात गढूळ पाणी अशी अद्भुत रचना आणि अन्य घरांचे अवशेष दिसतात. इथून मागे दिसणारा सूर्यास्त पाहणे म्हणजे सह्याद्रीने केलेली विविध रंगांची उधळण. स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर असा सूर्यास्त आपण बलेकिल्ल्यावरून पाहु शकतो. हा सारा परिसर आणि हे अवशेष पाहिले, की शिवकाळाची गुंगी चढते. साडेतीनशे वर्षांपूर्वी घडलेले सगळे रणकंदन डोळ्यासमोर उभे राहते अन राजगडाचा मुका दगड,पडका बुरुज, ढासळलेली तटबंदी आपल्याशी गुज करू पाहते, जणू अवघा राजगड आपल्याला साद घालतो आपला सखा बनून, आपला मित्र बनून.
तिथून उतरून मधूनच बालेकिल्ल्याच्या कुशीतून सुवेळा माचीकडे एक अरुंद पायवाट जाते. ज्याने सहसा कोणी जात नाही.
सुवेळा ही गडाची ही धाकटी माची. तुलनेने लहान असणारी, पूर्वेकडे तोंड केलेली, माचीवर पोहोचण्यापूर्वीच एका डुब्यावर तानाजी मालुसरे, येसाजी कंक आणि शिळीमकर या सरदारांच्या घरांचे अवशेष जणू त्यांची कैफियत आपल्यापुढे मांडतात. यांच्यापुढे मजबूत अन झुंजार असा काळेश्वरी बुरूज लागतो. तो पाहात लगतच्या एका दिंडीदरवाजाने सुवेळावर उतरायचे. इथे तटातच एका घुमटीतील गडगणेश आपल्याला दिसतो. त्याला नमन करून मनाला अपार शांती मिळते.
सुवेळाच्या मधोमध एक कातळ उभा ठाकला आहे. समोरून त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा भासतो. याला हत्तीप्रस्तर असेही म्हटले जाते. या हत्तीच्या पोटात एक निसर्गनिर्मित असे आरपार पडलेले छिद्र आहे. या भौगोलिक आविष्कारास कोणी ‘नेढे’ म्हणतात, तर कोणी ‘वाघाचा डोळा’! नाव काही असले तरी पण याची नजर एखाद्या गरुडाप्रमाणे दहा-पंधरा किलोमीटरच्या परिसरात सर्वत्र फिरत असते. हे नेढे, यातून आपल्याला आसपासचा बराच परिसर न्याहाळता येतो.
या नेढ्यातुन आपल्याला पद्मावती माचीच्या पोटातील बिबट्याची गुहा पाहायला मिळते त्याचा उल्लेख गो नी दांडेकर यांच्या गडपुरुष कादंबरीत आपल्याला ऐकायला मिळतो. या माचीवरील दुहेरी तटबंदी आपल्याला थक्क करते.
तिथून माघारी फिरून बालेकिल्ल्याच्या मागच्या अंगाने एक अत्यंत निमुळती अशी अरुंद पाऊलवाट आहे, ती खूप अवघड आहे तिथून मी संजीवनी माचीकडे पोचलो.
संजीवनी माची
तीन टप्प्यांत उभारलेली संजीवनी माची तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब पसरलेली आहे.
राजगडची संजीवनी माची म्हणजेच शिवरायांच्या दुर्गबांधनिचा सर्वोच्च आविष्कार ही दुहेरी वक्ररेषांकित नाळयुक्त तटबंदी असणारी माची सुडौल तर आहेच, पण खुद्द गडाची अभेद्यता लाख पटीने वाढवते…
तटावर तोफगोळे किंवा सुरुंगाने भगदाड पडले तर त्या तटाच्या आत आणखी बांधकाम आणि दोन तटांमध्ये बोळासारख्या उंच जागेतून येणारे शत्रुसैंया वेचून मरता येइल अशी ही अभिनव संरक्षण व्यवस्था. काय दूरदृष्टी असेल महाराजांची. राजगडची संजीवनी माची हा त्यामानाने सुगम तेथून गडावर प्रवेश करणे अशक्य व्हावे म्हणून योजलेला हां जालीम उपाय. अशी रचना अन्य किल्ल्यावर पहायला मिळत नाही वयाच्या केवळ १७ व्या वर्षी एवढी तल्लख विचार करणारे म्हणजे अदभुत स्थापत्यशात्रातील एक उत्तम अभियंता.
या दरम्यानच्या तटात तब्बल १९ बुरुज तसेच चिलखती बुरुज येतात. राजगडाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गडाला असलेली दुहेरी तटबंदी. व मध्ये चिलखती बुरुजात उतरण्यासाठी ठेवलेले भुयारी मार्ग. माचीच्या आतील मोकळय़ा जागेत घरांचे काही अवशेष दिसतात. आणि माचीवरील सदरचे अवशेष देखील पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी टाक्या खोदत पाण्याचीही जागोजागी सोय केलेली आहे. यातील पाणी इतके थंडगार असते की त्याचा एक घोट जरी घेतला तरी सगळा शीण गायब होतो. वर-खाली, सापासारखी भासत धावणारी दुहेरी तटबंदीची ही माची दूरवरून एखादी सळसळती नागीणच वाटते. स्थापत्यशास्त्र विशारदाचे हेच गूढ घेऊन या माचीवर उतरावे, दुहेरी तटबंदीतून इतिहासाचा मग घेत फिरावे. बुरुजांमध्ये उतरणारे छोटेशे दिंडी दरवाजे आणि त्यावरील स्लॅब आपल्याला आजही थक्क करतात. तोफेच्या कमानी, माऱ्याच्या जंग्या आणि वन्यप्राण्यांची शिल्पे हे सारे आपल्याकडे रोखून पाहात असतात. संजीवनीचे हे साजरे, नववधुसारखे नटलेले अन सजलेले रूप डोळ्यात किती साठवू अन किती नको असे होते. कोण शौर्य, कोण पराक्रम अन काय वैभव पाहिलं असेल या माच्यानी शिवकाळात.
पहिले प्रेम म्हणजे काय त्याची प्रचिती मला यावेळी आली. एकदा जावं अन जातच राहावं.
खरेच इथून उतरताना पाय निघत नव्हता, गड सोडूच वाटत नव्हता. अस वाटायचं की इथेच राहावं इथल्या बेलाग बालेकिल्ल्याला मिठी मारून या संजीवनी-सुवेळाच्या कुशीत कायमच राहावं. त्या शिवरायांच्या अथक शौर्याच्या साक्षीदाराशी गप्पा मारत, गुज करत, एकटेच त्याच्याबरोबर बोलत इथेच बसावं अस वाटलं.
पण प्रत्येक गोष्टीला अंत असतोच, त्यामुळे नाईलाजाने निघावे लागले. पण त्यानंतर 3 वर्षात 8 वेळा जाणे झाले. पण असे कधीच वाटले नाही की यापुढे राजगडी नको जायला. झोपेत जरी कोणी म्हटलं ना राजगडला जायचय, कायम एका पायावर तयार. प्रेमाला भेटायला कोण नको म्हणेल ना.
कितीही वेळा जा, राजगड प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं दाखवतो. शेवटी काय राजगड कधीही नाराज करत नाही.
माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील