माढा किल्ला | Madha Fort
पुणे-सोलापूर रस्त्यावर टेंभूर्णीपासुन ३५ कि.मी.अंतरावर तर कुर्डूवाडीपासून १२ कि.मी. अंतरावर माढा हे सोलापूरच्या माढा तालुक्याचे गाव आहे. येथील ग्रामदैवत माढेश्वरी देवीच्या नावावर या गावाचे नाव माढा असे पडले. माढा गावात आजही सुस्थितीत असा छोटेखानी देखणा माढा किल्ला (Madha Fort) भुईकोट आहे. माढा किल्ल्याचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमी आहे. या किल्ल्याची निर्मिती रावरंभाजी निंबाळकर यांनी १७१० साली केली. किल्ला आजही रावरंभा निंबाळकर यांचे नववे वंशज यशवंत आनंदराव निंबाळकर यांच्या ताब्यात असुन किल्ल्याच्या आतील वास्तुंची पुर्णपणे पडझड झाली आहे. माढेश्वरी मंदिरावरून किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम वेशीवर मारुतीचे मंदिर लागते. मंदिराच्या पुढिल बाजुस एक भलीमोठी दगडी बांधणीची मोटेची विहीर आहे. या विहिरीच्या शेजारून जाणाऱ्या वाटेने किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाता येते.
किल्ल्याच्या दरवाजासमोरील मोकळ्या पटांगणात स्वच्छ भारत योजनेला हरताळ फासल्याने नाकाला रुमाल लावत जपुन पावले टाकत किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जावे लागते. समाधानाची एकच गोष्ट कि गावकरी यासाठी किल्ल्याच्या आतील भागाचा वापर करत नाहीत. दरवाजातून प्रवेश केल्यावर आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन समोरच एका चौसोपी वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या चौकात दगडी कारंजे असल्याच्या खुणा दिसुन येतात. दरवाजाच्या वरील भागात कधीकाळी नगारखाना अथवा मंडप असल्याचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या दरवाजा शेजारील तटबंदी सोडल्यास पुर्ण किल्ल्याची तटबंदी सुस्थितीत असुन तटबंदीवरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. किल्ल्याच्या चारही टोकाला चार मोठे बुरूज असुन त्यावर तोफ ठेवण्याचा उंचवटा दिसुन येतो. या उंचवट्या खाली तोफगोळे ठेवण्यासाठी कोनाडे बनवले आहेत.
तटबंदीवर जाण्यासाठी प्रत्येक बाजुस एक अशी चार ठिकाणी पायऱ्यांची सोय आहे. किल्ल्याच्या आतील भागातील वास्तू मोठया प्रमाणात पडझड झाल्याने मातीखाली गाडल्या गेल्या आहेत. गडाच्या संपुर्ण तटबंदीत एकुण सहा खोल्या बांधलेल्या असुन पश्चिमेकडील तटबंदीत तीन ओवऱ्या व उत्तरेकडील तटबंदीत दारूगोळ्याचे कोठार आहे. शिवाय कोटाच्या मध्यभागी एक ५०-६० फुट खोल व ५-६ फुट रुंद अशी एक दगडी बांधीव विहीर असुन या विहिरीचे पाणी संपुर्ण किल्ल्यात सायफन पद्धतीने म्हणजेच हवेच्या दाबाने फिरवलेले दिसुन येते. डावीकडच्या तटावर अलीकडेच स्थापन केलेली एक शंकराची पिंड दिसते. दरवाजाच्या आतील बाजुस उजवीकडे एक भुयार आहे पण त्याचा आतील भाग ढासळल्याने आत शिरता येत नाही. हे भुयार माढेश्वरी मंदिरात उघडते असे सांगितले जाते. पूर्वी या किल्ल्यापासून ते माढेश्वरी मंदिरापर्यंत भुयारी रस्ता होता व त्याचा वापर किल्ल्यावरील स्त्रियांना देवळात येण्यासाठी होत असे असे सांगितले जाते. मंदिराच्या बाजूने ते भुयार बंद केलेले असुन तेथील एका ओवरीत बंद केलेल्या दरवाजाच्या बांधकामाच्या खुणा दाखवल्या जातात. किल्ल्याच्या पुर्वेकडील तटबंदीबाहेर एक खुप मोठी चौकोनी बारव असुन तिच्या आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या बारवच्या मागील बाजुस असणाऱ्या तटबंदीत एक लहान दरवाजा दिसुन येतो पण तो सध्या दगड लावुन बंद करण्यात आला आहे. हा भाग भोवताली छोटीशी तटबंदी घालुन बंदीस्त करण्यात आला आहे. हे सर्व व संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो.
शिवाजी महाराजांचे जावई महादजी निंबाळकर यांच्या दासीपुत्राचा मुलगा रंभाजी निंबाळकर यांना १७०७ मध्ये माढ्याची जहागिरी मिळाली. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार रावरंभा निंबाळकर यांची राजगादी इथे होती व नंतरच्या काळात ती करमाळा येथे नेण्यात आली. माढा किल्ला (Madha Fort) हा १७१० साली रंभाजी निंबाळकर यांनी बांधला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रंभाजी निंबाळकर आणि चंद्रसेन जाधव यांनी मुघलांची चाकरी पत्करली. १७०७ साली झालेल्या पुरंदरच्या लढाईत रंभाजीने मुघलांकडून लढताना बाळाजी विश्वनाथ आणि हैबतराव निंबाळकर याचा पराभव केला आणि निजाम-उल-मुल्कने त्यांना राव अशी पदवी दिली. १७व्या शतकात काहीकाळ रावरंभा निंबाळकरांकडे पुणे सुभ्याची जहागिरी होती असे सांगितले जाते. खर्डा येथील १७९५ च्या मराठे आणि निजाम यांच्यातील लढाईत रावरंभा निंबाळकर यांनी पराक्रम करून निजामाला वाचवले.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.