महाबाहु संभाजी भाग १ –
वेरूळच्या भोसले कुळाने महाराष्ट्रावर, भारतावर आणि हिंदूधर्मावर कधीही न फेडता येणारे उपकार केलेले आहेत. आपल्या पराक्रमाच्या शर्थीने ह्या घराण्यातील पराक्रमी कुलदिपकांनी हिंदुस्थानाची स्वतःची ओळख जीवंत ठेवलेली आहे. ‘शिवाजी महाराज झाले नसते तर, काशीला अवकळा आली असती, मथुरेची मशीद झाली असती, आणि सर्वांची सुंता झाली असती आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानाची सीमा तुमच्या-आमच्या घरांपर्यंत आली असती’ हे अनुक्रमे कविराज भूषण आणि स्व. यशवंतराव चव्हाणांचे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व सांगण्यास पुरेसे आहेत. याशिवाय ‘गोब्राह्मणप्रतिपालक मालोजी’, ‘हैंदवधर्मजिर्णोद्धारक शहाजी’ आणि ‘म्लेंच्छक्षयदीक्षित शिवाजी’ हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पूर्वजांना वापलेले विशेषणं त्यांचे कार्य, त्यांचे महत्व आणि त्यांनी केलेल्या उपकरांची जाणीव करून देतात.(महाबाहु संभाजी)
पराक्रमी राष्ट्रपुरुषांच्या ह्या वंशात असा एक वीर आहे, ज्याच्या इतिहास त्याच्याविषयीच्या ज्ञात माहितीच्या अभावी असेल किंवा इतर कोणत्या कारणांमुळे असेल, महाराष्ट्रीय जनतेसमोर आला नाही किंवा जास्त प्रमाणात पोहचला नाही. त्याच वीराच्या पराक्रमाच्या इतिहासाचा मागोवा ह्या लेखात घेण्याचे योजिले आहे. हा वीर म्हणजे शहाजीचा जेष्ठ पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जेष्ठ बंधु संभाजी होय.
ह्या संभाजीचा जन्म कधी झाला, याबद्दल मतांतरे आहेत. ठोस साधनांच्या अभावी त्यात एकवाक्यता नाही. जिजाबाई व शहाजीराजे ह्या दांपत्यास एकूण ६ पुत्र व १ कन्या झाली. पुत्रांपैकी शंभु म्हणजेच आपल्या लेखाचा नायक संभाजी आणि शिवाजी हे दोघेच जगले, अशी माहिती शिवभारत ह्या समकालीन साधनात येते. संभाजी हे नाव शहाजीराजांचा चुलत भाऊ म्हणजेच विठोजीराजांच्या पुत्राचेही होते. निजामशाही दरबार संपल्यानंतर एकदा एक हत्ती बेभान झाला. त्याला आवरण्यात जाधव व भोसले या दोघी सरदारांमध्ये भांडण जुंपले. हि घटना खंडागळे हत्ती प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यात विठोजीपुत्र संभाजी मारला गेला. हे प्रकरण १६२३ साली घडले. हा विठोजीपुत्र संभाजी १९ फेब्रुवारी १६२३ पर्यंत जीवंत होता. २७ फेब्रुवारी १६२३ रोजी विठोजीच्या मुलांमध्ये वाटणी झाल्याचा कागद आहे. ह्या विठोजीस एकूण ८ पुत्र. त्यापैकी ६ मुलांमध्ये वाटणी झाल्याचा एक कागद आणि मालोजी नावाच्या एका मुलाचा दुसरा कागद उपलब्ध आहे. ह्यात संभाजीचा उल्लेख नाही. यावरून १९ फेब्रुवारी १६२३ ते २७ फेब्रुवारी १६२३ ह्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला असावा. तत्कालीन रूढीनुसार, आपल्या सख्ख्या चुलत भावाची स्मृति म्हणून शहाजीने आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले असण्याची शक्यता आहे. शिवादिग्विजय बखरीच्या आधारे रियासतकार सरदेसाई शहाजीपुत्र संभाजीचा जन्म १६१९ चा मानतात. वा. सी.बेंद्रे संभाजीचा जन्म १६२०-२१ सालीचा मानतात. पण विठोजीपुत्र संभाजी १६२३ पर्यंत जीवंत असून तो असतांना पुन्हा त्याचे नाव देणे, हे शक्य वाटत नाही. म्हणून वरील दोन्ही साल चुकीचे वाटतात. देवीसिंह चौहान यांनी संभाजीचा जन्म १६२३ चा मानलेला आहे. संभाजीचे १६२९ साली लग्न झाले. जर संभाजीचा जन्म १६२३ चा मानला तर लग्नासमयी त्याचे वय फक्त ६ वर्षांचे येते. त्याचे वय ६ वर्षांचे असल्यास त्याच्या वधूचे वय निदान ५ वर्षांचे मानावे लागेल. त्याकाळी लहान वयात लग्न व्हायची. पण शिवाजी राजांचे पहिले लग्न आणि त्याचा मुलगा राजारामाचे लग्न १०व्या वर्षी लग्न झाले. यांच्या वधू त्यावेळी ७ ते ९ वर्षांच्या असाव्या. म्हणून शहाजीपुत्र संभाजीचे वयाच्या ६ व्या वर्षी लग्न योग्य वाटत नाही. संभाजीच्या जन्मकालाची निश्चिती साधनांच्या अभावी करता येत नाही.
१६२४ साली निजामशाही आणि आदिलशाही यांच्यात भातवडी येथे लढाई होऊन त्यात शहाजीने पराक्रम दाखवला आणि शरीफजी मृत्यूमुखी पडला. यावेळी उभयता बंधु निजामशहाकडून लढले. १९ डिसेंबर १६२५ रोजीच्या मजहरात ‘साहाजी भोसला येदीलशाही’ असा उल्लेख येतो. त्यावरून डिसेंबर १६२५च्या पूर्वी शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीत गेला. शहाजी आदिलशाहीत जुलै १६२५ च्या आधी गेला असावा. आदिलशहाने त्यास ‘सरलष्कर’ हा खिताब दिला. त्याने स्वतःस सरलष्कर म्हटल्याचा जुना उल्लेख जुलै १६२५ चा येतो. त्यावरून तो आदिलशाहीत जुलै १६२५ च्या सुमारास गेला असावा. शहाजी आदिलशाहीत सुमारे १६२८ पर्यंत होता. कारण शके १५४९ च्या फाल्गुन शु.१५ (८-३-१६२८) रोजी त्याने स्वतःस सरलष्कर म्हटलेले आहे. त्यानंतरच्या शके १६५०च्या श्रावणातील कागदावर(२५-७-१६२८) त्यास सरलष्कर हा किताब नाही. त्यानंतर शहाजी निजामशाहीत आला.
‘नंतर काही दिवसांनी तो (संभाजीच्या लग्नाचा) समारंभ आटोपल्यावर व्याह्याच्या संमतीने आपल्या गरोदर पत्नीस स्वजनांसह त्याच किल्ल्यावर ठेवून शहाजी राजा दर्याखानास जिंकण्यास निघाला’, असा उल्लेख शिवभारतात येतो. दर्याखानाची स्वारी १६२८ची आहे. त्याच वेळी जिजाबाई गरोदर होती. त्यामुळे संभाजीच्या लग्नाचे वर्ष १६२९-३० चे असावे. संभाजीचे लग्न विश्वासराजाच्या कुळांतील सिद्धपालाचा मुलगा विजयराज याच्या कन्येशी- जयंतीबाईशी- झाले. हा विजयराज निजामशाही सरदार असून तो शिवनेरी किल्ल्यावर राहत असे. शहाजीचा कनिष्ठ बंधु शरीफजीचा विवाह विश्वासराजाच्या मुलीशी झाला होता, ती मुलगी ह्याच कुळातील असावी. तोच ऋणानुबंध लक्षात घेऊन शहाजीने आपल्या मुलाचे लग्न जयंतीबाईशी केले असावे आणि त्याच ऋणानुबंधामुळे अत्यंत विश्वासाने जिजाबाईस आणि इतरांस शिवनेरीवर ठेवले असावे.
पुढे २५ जुलै १६२९ साली लखुजीराव जाधव आणि त्याच्या ३ मुलांचा निजामशाही दरबारात खून झाला. त्यामुळे इतर जाधव मंडळींनी निजामशाही सोडून मोगलांची नोकरी पत्करली. शहाजीनेही तोच मार्ग अनुसरत नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखानामार्फत मुघलांची नोकरी पत्करली. त्यास व त्याच्या भावांस बादशहाने मनसबी दिल्या. त्यात शहाजीस ५ हजार जात/ ५ हजार स्वार आणि त्याचा पुत्र संभाजीस २ हजार स्वार/ २ हजार जात अश्या मनसबी मिळाल्या. शहाजीला एक मानाचा पोशाख, एक हत्ती, घोडा, खंजीर, झेंडा, नगारा व दोन लाख रुपये तर संभाजीस एक मानाचा पोशाख व घोडा अश्या भेटी आजमखानाने दिल्या. पुढे बादशहाने शहाजीची जहागीर फत्तेखानास दिली. याची त्याला चीड येऊन त्याने मोगलांविरुद्ध बंड पुकारलं. ह्या बंडास आदिलशहाचाही पाठिंबा असावा. म्हणून २३ जुलै १६३२ रोजीचं मुहम्मद आदिलशहाने गदगच्या देसायांना पाठवलेले एक फर्मान आहे. त्यात मीर अली रजा याच्याकडे असलेला गदग परगण्यातील सर्व गावाचा मोकासा संभाजीच्या नावे केलेला आहे. कदाचित हि शहाजीला आर्थिक मदत असावी. मुघलांनी पुढे दौलताबादचा किल्ला जिंकल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर १६३३ मध्ये १० वर्षाच्या मूर्तजा नावाच्या निजामशहाच्या वंशास पेमगिरी किल्ल्यावर गादीवर बसविले.
पुढे शहाजीने शिवाजीराजे, जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांसह पुण्यास पाठविले. त्यावेळी दादोजीने पुण्यात शिवाजीराजांसाठी लाल महाल बांधला. त्याच प्रमाणे संभाजीसाठीही एक वाडा बांधला. वेदमूर्ति खंडभट शालिग्राम यांच्या वाड्यापर्यंत उत्तराभिमुख जोते असलेला हा वाडा होता.
शहाजीच्या एवढ्या हालचालीत आणि धामधुमीच्या राजकारणात संभाजीच्या सक्रिय सहभागाचे उल्लेख आढळत नाही. शहाजी मुघलांकडे जातो, त्यावेळी संभाजीसही मनसब मिळते, याचा उल्लेख वर आलेला आहे. याव्यतिरिक्त संभाजीच्या नावाचा उल्लेख या शहाजीच्या हालचालींमध्ये फारसा आढळत नाही. याचा एक अर्थ असा असावा की यावेळीपर्यंत संभाजीचे वय राजकारणात किंवा लढायांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे नसावे. पण साधनांच्या अभावामुळे कोणताही तर्क किंवा कोणताही निर्णय करता येत नाही.
© अनिकेत वाणी