विहिरीतला महादेव, लोहरा-भोसा –
“घटाघटांचे रुप आगळे!,प्रत्येकाचे दैव वेगळे” हे केवळ मानवापूरतेच मर्यादित असते असे नाही.कांही “निर्माण म्हणजे निर्मिती “बाबत हा सिध्दांत लागू पडतो, काहींना ‘चार चांद लागतात तर काहींच्या नशिबी घोर प्रतारणा. याची नुकतीच प्रचिती घेतली मंदिरांचा धांडोळा घेतांना! मित्रांनो,नुकताच एका निर्जनस्थळी छोटेखानी मंदिरात शिल्पांचा अनमोल खजीना पाहिला, वर्षानुवर्षे चक्क वाळीत पडलेला. …संशोधक-अभ्यासकाचे तर सोडाच कैकवर्षात एकार्धा पर्यटक देखील चुकूनमाकून फिरकलेला नाही तिकडे …कुठल्याही दप्तरी नोंद नसलेला गोदाकाठचा अप्रतिम शिल्पाविष्कार शापीत होवून पडलाय केवळ आणि केवळ गावाच्या पंचक्रोशीत अडकून.(विहिरीतला महादेव, लोहरा-भोसा)
पाषाणातून निर्गुण-निराकार ईश्र्वराचा साक्षात्कार म्हणून कुणीतरी कधीतरी तिथं येतो माथा टेकवायला आणि आपल्या मनोरथांचं, गाठोडं तिथं रिचवून चिंतामुक्त व्हायला….वर्षभरात एखादा हरिनाम सप्ताह घेण्यापूरता मोकळ्या आवाराचा होतो तेवढा वापर… या माझ्या कथनावर तुमचा विश्र्वास बसणार नाही कदाचित…! खात्री करायची असेल तर चला लोहरा या गावाला … !
परभणीपासून ३० किमी.अंतरावर माळ्याच्या उमरी नजिक लोहरा-भोसा हे गांव. या खेड्यापासून दोन कि.मी.अंतरावर शेतात एक मंदिर आहे. आडवाटेने चालत जावं लागतं तिथवर. झाडाझुडपात मंदिराचा थांगपत्ताही लागणार नाही कुणाला…. चालुक्यकालिन शैलीच्या या भग्न शीवालयातील शिल्पागार अंगावर आल्याचा भास होतो प्रथमदर्शनी .. मंदिराच्या जंघाभागावर आखीव रेखीव रतीक्रिडेतले मिथूनशील्प ,अलिंगनमुद्रा नजरेत भरतात. वाद्यवादक मर्दला , शिवपार्वतीच्या भावमुद्रा ,सारिपाटाचा खेळ, युध्दापट ,विरगळ ,शीवतांडवनृत्य,भैरवाचे शिल्प कोरलेले आहे मंदिरात .गावक-यांनी पडायला झालेला छताचा भाग काढून स्लॅब टाकतांना मुर्तींची वाट लावली आहे,बेदरकारपणे.. हे मंदिर त्रीदल पध्दतीचे असले तरी मंदिराचा मुख्य गाभारा तेवढा शिल्लक आहे.उर्वरित दोन्ही उपगर्भगृह ढासळले असून त्याचा प्रदक्षणामार्ग म्हणून वापर होतो .
मुखमंडपात महाकाय दोन नंदी आहेत. सभामंडपातील रंगशिळेवर चार शिल्पांकित खांबावर चौकी असून प्रत्येक खांबाशी भारवाहू दर्शविण्यात आले आहेत. मातृका,आष्टदिक्पाल,चामुण्डा,आदी देवदेवतांचे शिल्प आहेत. गर्भगृहाच्या दारावरील शिल्पांना मोठ्या प्रमाणावर क्षती पोहचली आहे. सात आठ पाय-या उतरून अंधारलेल्या गर्भगृहात उतरून जावे लागते.आत शिवलिंग असून ते वर्षातले सहा -आठ महिने कायम पाण्याखाली असते.गावकरी त्याला विहिरीतला महादेव असेही म्हणतात. अतिशय देखण्या मंदिराची डागडुजी करतांना दगडावर दगड रचताना गणेश शिल्प शिर्षासनात (उलटे)बसले आहेत याचे भान ठेवण्यात आलेले नाही. मंदिराच्या सभोवताली दलदल व झुडपं वाढलेली आहेत. या मंदिरातील शिल्पसौदर्य,स्थापत्य अभ्यासकांसमोर आणणे गरजेचे आहे.
मल्हारीकांत देशमुख, परभणी