महादजी शिंदे | प्रसिद्ध मराठी वीर
महादजी शिंदे- प्रसिद्ध मराठी वीर. हा राणेजीचा चिमाबाई नांवाच्या रजपूत बाईंच्या पोटीं झालेला मुलगा. याचें चरित्र म्हणजे नाना फडणविसाच्या चरित्रासारखा ३५-४० एक वर्षाचा प्रकारें हिंदुस्थानचाच इतिहास होय. राणेजीच्या पश्चात् बरेच दिवस महादजी हा खुद्द पेशव्यांच्या खाजगी पागेंत होता; तो आपल्या भावांबरोबर लहानपणापासूनच मोहिमांवर जात असे; त्यामुळें त्याला युद्धशास्त्राचें शिक्षण तेव्हांपासून मिळालें होतें, तसेंच नानासाहेब पेशव्यांच्या खाजगी पागेंत असल्यानें त्यांच्या संगतीनें मुत्सद्दीपणांतहि महादजी तरबेज झाला. महादजीनें प्रथम तळेगांव-उंबरीच्या निजामावरील लढाईंत शौर्य गाजवून नांव मिळविलें. यानंतर औरंगाबाद (१७५१), साखरखेडलें (१७५६), पंजाब (१७५९) वगैरे मोहिमांत तो हजर होता. पुढें कांहीं काळ हिंदुस्थानचें आधिपत्य जें त्याच्या हातीं आलें, त्यास कारण असलेला अभ्यास, त्यानें या पहिल्या काळांत नानासाहेब पेशवे व जयाप्पा, दत्ताजी वगैरे बंधूंच्या सहवासानें केला. पानपतावर भाऊसाहेबांबरोबर हा दक्षिणेंतून निघाला होता. पानपतांत शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां हाहि परत फिरला. वाटेंत एका पठाणानें त्याला डाव्या पायावर सांग मारून जन्माचा लंगडा केला असतां, राणाखान नांवाच्या एका मराठे लष्करांतील माणसानें त्याला शेवटपर्यंत निभाऊन आणलें. त्याबद्दल खानास महादजीनें भाऊ मानून व पुष्कळ इनामें देऊन योग्यतेस चढविलें. राघोबादादांच्या घालमेलीच्या कारकीर्दीत महादजी हा, पटवर्धन, प्रतिनिधीप्रमाणें निजामाकडे जाऊन मिळण्याच्या बेतांत होता.
गोहदच्या जाटावर राघोबादादानें स्वारी केली, तींत महादजीनें शिंद्याच्या दौलतीतर्फे मुख्य म्हणून पहिल्यानें भाग घेतला होता. मम्हारराव व मालेराव होळकर मेल्यावर त्यांची दौलत सरकारजमा करावी असा राघोबादादा यांचा मानस होता, परंतु यावेळी महादजीनें होळकरशाहीचा बचाव केला. यामुळें त्याचें वजन माळव्यांत चांगलेंच बसलें. यापुढें उदेपूरच्या गादीच्या तंटयांत त्यानें आपला हात साधून ६० लक्षांची खंडणी (व कांहीं प्रांत) मिळविला. नंतर राघोबाच्या फितव्याचा बंदोबस्त थोरल्या माधवरावांच्या बरोबर राहून केल्यानें, पेशव्यानीं महादजीस सर्व हुजूरपागेचा सेनापति करून जहागीरीहि दिली. पुढें पानपतचें अपयश धुऊन काढण्यास पेशव्यानीं बिनीवाले प कानडे यांनां दिल्लीकडे पाठविलें; त्या मोहिमेंत (१७७१) महादजी होता. या सुमारास त्यानें नजीबखानाचा प्रांत लुटून फस्त केला व शहाअलम बादशहास इंग्रजांच्या हातून सोडवून दिल्लीस त्याची स्थापना केली. बारभाईच्या कारस्थानांत कोणास मिळावें याबद्दल प्रथम महादजीचा निश्र्चय झाला नव्हता; परंतु नाना व बापू यांनीं शेवटीं त्याला मुलूख वगैरे देऊन आपल्या बाजूस घेऊन त्याच्याकडूनच राघोबाचा बंदोबस्त केला. मात्र या वेळेपासून महादजीच्या मनांत नाना फडणविसाबद्दल असूया उत्पन्न झाली. या सुमारासच भाऊसाहेबांच्या तोतयाच्या प्रकरणांत महादजीनें कारभाऱ्यांस मदत केली व कोल्हापुरकरांचा पराभव केला.
पहिल्या इंग्रज-मराठे युध्दांतील महादजीचा कामगिरी मुत्सद्देगिरीची होती. तिचें वर्णन ‘नाना फडणवीस’ या लेखांत सांपडेल. सालबाईच्या तहानंतर महादजीनें ज्या रजपूत राजांनीं त्याचा मुलूख बळकविला होता त्यांचा पराभव करून आपला प्रांत परत घेतला. आतांपर्यंत इंग्रजांशीं झालेल्या लढायांत त्यांच्याकडील कवायती पलटणींचा उपयोग पाहून, महादजीनें फ्रेंचांनां चाकरीस ठेऊन तोफा ओतण्याचे व हत्त्यारें तयार करण्याचे कारखाने काढून कवायती पलटणें तयार केलीं व त्यांच्या बळावर गेल्या १० वर्षांत दिल्लीच्या बादशाहीवरील जें मराठयांचें वर्चस्व नाहीसें झालें होतें तें पुन्हां प्रस्थापित केलें आणि यापुढें १०।१२ वर्षे सर्व उत्तरहिंदुस्थानचीं सूत्रें आपल्या हातीं खेळविलीं. यावेळी दिल्लीच्या बादशाहीला हाताखालीं घालण्याचा उपक्रम शीख, इंग्रज व मराठे हे तिघे करीत होते; परंतु त्यांत अनेक कारणांनीं मराठेच पुढें आले. याच वेळीं महादजीनें पातशहाकडून पेशव्यांस वकील-इ-मुतलकचें पद व स्वतःस त्या पदाची नायबगिरी मिळवून, साऱ्या बादशाहींत गोवधाची मनाई करविली. बादशहास दरमहा ६५ हजारांची नेमणूक करून देऊन महादजीनें सारी पादशाही आपल्या हातांत घेतली (१७८५). यानंतर कांही काळ मोंगली पादशाही लुप्त होऊन साऱ्या हिंदुस्थानभर हिंदुपदपादशाही सुरू झाली.
उत्तरहिंदुस्थानांत महादजी शिंदेनें कडक अम्मल गाजविला, त्यामुळें बादशाहींतील मुसुलमान सरदार व रजपूत राजे यांनीं त्याच्याविरुद्ध बंडाळी माजविली (१७८६-८७). लालसोटच्या लढाईंत तर बादशहाची सर्व फौजच रजपूत राजांनां मिळाली, त्यामुळें महादजीस हार खावी लागली (१७८७); गुलाम कादरनें दिल्ली, अलीगड वगैरे शहरें ताब्यांत घेतल्यानें महादजीला चंबळेअलीकडे यावें लागलें. याप्रमाणें त्याच्या उत्तरेकडील वर्चस्वास धक्का बसला, परंतु त्यानें धीर न सोडतां पुन्हां गेलेले प्रांत परत मिळविण्याचा प्रयत्न चालविला; यावेळीं मात्र महादजीनें आपला ताठा व मत्सर सोडून नाना फडणविसाकडे मनांतील किल्मिष काढून टाकून मदतीची मागणी केली. दिल्ली हातची जाते हें पाहून नानानींहि अल्लीबाहद्दरास त्याच्या मदतीस धाडलें (१७८८). अल्लीबहाद्दर व महादजी यांनीं शीख आणि जाट यांनां मदतीस घेऊन गुलाम कादर वगैरे मुसुलमानमंडळ आणि उदेपूर, जोधपूर, जयपूर येथील राजे वगैरे रजपूतमंडळ यांचा पराभव करून पुन्हां रजपुताना आणि दिल्ली हस्तगत केली (१७८९-१७९०). उदेपूरचा राणा तर पाटीलबोवास सामोरा आला होता. हा मान त्या घराण्यानें खुद्द दिल्लीच्या बादशहासहि कधींच दिला नव्हता. याच सुमारास गुलाम कादरानें शहाअलमचे डोळे काढून व त्याच्या जनान्याची अब्रू घेऊन दिल्लींत प्रळय मांडला होंता; त्यावर महादजीनें गुलामास पकडून त्याला देहांतशासन केलें व पुन्हां शहाअलमास तक्तावर बसवून सर्व पातशाही कारभार आपल्या हातीं घेतला (१७८९).
यानंतर महादजीनें आपली कवायती फौज पुष्कळच वाढविली; त्यांत मराठयांपेक्षां मुसुलमान, रजपूत यूरोपियन यांचाच भरणा जास्त होता. त्यानें आग्रयाच्या किल्ल्यांत यूरोपीय हत्त्यारासारखी हत्यारें तयार करण्याचे कारखाने काढले. वर सांगितल्याप्रमाणें उत्तरहिंदुस्थान आपल्या काबूंत आणल्यावर पाटीलबोवा बारा वर्षांनीं पुण्यास आले (१७९२ जून). यावेळीं नानांच्या मुत्सद्दीपणानें व महादजीच्या शौर्यानें सतलजपासून तुंगभद्रेपर्यंत मराठी साम्राज्य पसरून साऱ्या हिंदुस्थानभर त्याचा दरारा बसला होता.
पुण्यास आल्यावर पावणेदोन वर्षे महादजी शिंदे स्वस्थच होता. त्यानंतर शके १७१५ च्या माघ शुद्ध १३ रोजी (१२ फेब्रु. १७९४) एकाएकीं नवज्वर होऊन पुण्याजवळील वानवडी येथें वयाच्या ६७ व्या वर्षी त्याचा अंत झाला. त्याची छत्री हल्लीं वानवडीस आहे. त्यानें आपला धाकटा भाऊ तुकोजी याचा नातु दौलतराव यास वारस नेमलें होतें. महादजी हा कसल्याहि प्रसंगी न डगमगणारा, शूर, मुत्सद्दी, राष्ट्रहित जाणणारा, परंतु थोडासा स्वार्थी, काटकसरी, कृष्णभक्त, सुदृढ, मध्यम उंचीचा, काळासांवळा, साध्या रहाणीचा, कवि, परधर्मसहिष्णु, शकुनादिकांवर भरंवसा ठेवणारा, त्यावेळच्या मानानें सुशिक्षित व राज्यकारभार उत्तम ठेवणारा होता. सारांश, नानासाहेब पेशव्यांच्या म्हणण्याप्रमाणें अष्टपैलूपणें राज्यकारभार करणारा असा हा पुरुष होता. त्याच्या वेळी उज्जैनी ही शिंदेसरकारची राजधानी असून ग्वाल्हेर येथें लष्कर असे. महादजीचें सैन्य म्हणजे ३० हजार कवायती पायदळ, ५०० तोफा व एक लाख घोडदळ होतें.
(संदर्भग्रंथः- सरंजामे-शिंदे घराण्याचा इतिास; लोकहितवादी-ऐति. गोष्टी; मल्हार रामराव-धाकटे रामराजे व शाहुराजे यांचीं चरित्रें; भाऊसाहेबांची बखर; रघुनाथ यादव-पानिपतची बखर; होळकरांची कैफियत; मराठी साम्राज्याची छोटी बखर; पेशव्यांची बखर; पत्रें-यादी वगैरे; खरे-ऐतिहासिक लेखसंग्रह; ब्राउटन-लेटर्स फॉम ए मराठा कँप; कॉम्प्टन-मिलिटरी ॲडव्हेन्चरर्स ऑफ हिंदुस्थान; इलियट-हिस्टरी ऑफ इंडिया. भा. ७।,८; फ्रॅकलिन-शहाअलम; फॉरेस्ट-सिलेक्शन्स. भा. १, मराठा सेरीज; ग्रँटडफ; कीनफाल ऑफ दि मोंगल एंपायर व माधवराव सिंधिया; मॅकडोनल्ड-नाना फडणवीस; सीक्रेट कमिटीज फिफ्थ रिपोर्ट; रॉय-ग्वालीयर; नातु-महादजी शिंदे यांचें चरित्र.)