या मराठा योध्यामुळे राक्षसभुवन च्या युद्धाला मिळाली कलाटणी!
साधारण २६० वर्षांपूर्वी एका भालाफेकी मुळे एका युद्धाला कलाटणी मिळाली होती आणि त्या युद्धाच्या विजयामुळेच दक्षिणकडे मराठ्यांची जरब बसली होती.या मराठा योध्यामुळे राक्षसभुवन च्या युद्धाला मिळाली कलाटणी!(महादजी शितोळे)
राक्षसभुवन ची लढाई:
पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांच्या साम्राज्याची वाताहत झाली होती, त्यामुळे उत्तरेत जाट-राजपूत आता मराठ्यांना जुमानत नव्हते, तर दक्षिणेत निजाम आणि हैदर अली या संधीचा फायदा घ्यायला टपले होते, निजामाचा वजीर विठ्ठल सुंदर होता, साडेतीन शहाण्यापैकी एक, युद्धात तरबेज आणि जबरदस्त कारस्थानी.
पानिपतच्या हाणीमुळे झालेले मराठा साम्राज्याचे झालेलं नुकसान आणि राघोबादादा पेशवे यांच्यावर नाराज असलेले सरदार याचा फायदा उचलायचे त्याने ठरवले, भवानराव पंतप्रतिनिधी, पटवर्धन, जानोजी भोसले नागपूरकर हे नाराज असलेले मातब्बर सरदार विठ्ठल सुंदर ने आपल्या बाजूला वळवले आणि निजामास भरीस घालून पुण्यावर चाल करायला लावले, निजामाने पुणे लुटले, त्यावेळी माधवराव पेशवे, राघोबादादा, मल्हारराव होळकर निजामाचा आणि जानोजी भोसले यांच्या प्रांतात छापेमारी करत होते, निजाम पुणे लुटून माघारी वळला.
मराठ्यांच्या हे लक्षात आले की निजामाला पुण्यातील रस्ते दाखवायला आपलेच लोकं होते, पेशव्यांनी आश्वासने देऊन या लोकांना माघारी आणायचे प्रयत्न चालू केले, त्यात यश पण आले, छोट्या मोठ्या लढाया चालूच होत्या, पण मराठ्यांचा जरब बसेल अशी लढाई झाली नव्हती, ही वेळ आली राक्षसभुवन ला, मराठ्यांनी निजामाला माघारी जाऊ न देता धडा शिकवायचे ठरवले होते, पण राक्षसभुवन ला निजामाचे अर्धे सैन्य निजामासह नदीपार करून गेले होते, तर विठ्ठल सुंदर अर्ध्या सैन्यासह अलीकडच्या काठावर होता.
युद्धाला सुरवात झाली, राघोबादादांच्या तुकडीने एका बाजूने आणि मल्हारराव होळकरांच्या तुकडीने दुसऱ्या बाजूने हल्ला चढवला, राघोबादादांना घेरले गेले, पण माधवराव पेशव्यांनी आपली तुकडी पाठवून राघोबादादांच्या तुकडीला बाहेर काढले, युद्धाचा निकाल लागत नव्हता, स्वतः विठ्ठल सुंदर हत्तीवर बसून लढत होता, जोपर्यंत विठ्ठल सुंदर मैदानावर आहे, तोपर्यंत निजामाचे सैन्य मागे हटणार नाही हे सर्वांच्या लक्षात आलेच होते, त्यावेळीच एक घोडेस्वार माधवराव पेशव्यांच्या जवळ आला, म्हणाला मी विठ्ठल सुंदर ला मारतो, जगलो तर बक्षीस द्या, माधवरावांनी त्याच्याकडे पाहून स्मित केले,
घोडेस्वाराने घोडा गर्दीत घातला, हातातला भाला उंचावला, चाललेल्या लढाईत लक्ष न देता, त्याने फक्त डोळ्यासमोर विठ्ठल सुंदर ला ठेवले, आणि टप्प्यात आल्यावर त्याने विठ्ठल सुंदरच्या दिशेने असा भाला फेकला की, नेम अचूक विठ्ठल सुंदर जाग्यावर गतप्राण झाला. विठ्ठल सुंदर निजामाचा वजीर मेल्यावर निजामाच्या सैन्यात पळापळ चालू झाली, आणि युद्धाचा निकाल लागला.
या युध्दामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला, मनोबल वाढले, नंतर मराठयांनी निजामाला वेढ्यात पकडून तह करून घेतला, बराच प्रांत त्याच्याकडून घेण्यात आला, हे युद्ध एकट्याने लढले असे नाही, तिथे खुप जण लढतच होते, पण विठ्ठल सुंदर सारखा साडेतीन शहाण्यांपैकी एक तिथं मारला गेला, ही मराठ्यांची खुप मोठी जित होती, त्यामुळे पानिपत मध्ये जरी नुकसान झाले असले तरी अजूनही मराठे लढू शकतात, ही जरब निजामावर बसली, आणि साहजिकच सैन्याचे मनोबल पण वाढले. त्यामुळे पुढे विस्तार पण झाला. विठ्ठल सुंदर ला मारल्यानंतर तो घोडेस्वार माधवराव पेशव्यांच्या समोर मुजरा करून उभा राहिला,
पेशव्यांनी त्याला त्याच जागेवर मांजरी गावची जहागिरी आणि सरदारकी दिली. तो योद्धा म्हणजे, ‘महादजी शितोळे’
सह्याद्रीच्या पाऊलखुणा | sahyadrichya paulkhuna