महालक्ष्मी मंदिर, कांबी –
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेले कांबी हे गाव प्राचीन आणि ऐतिहासिक यादवकालीन महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गोदावरी काठाच्या या परिसराला पुर्वीच्या काळी काम्यक वन म्हणुन ओळखले जायचे असा उल्लेख काशीखंड कथासार या ग्रंथात केलेला आहे. कांबी येथील महालक्ष्मी मंदिर यादवकालीन असून सदर मंदिर ११ ते १२ व्या शतकातील आहे. मंदिर आजही सुस्थितीत आहे. मंदिरात असलेली महालक्ष्मीची मूर्ती विलोभनीय असून आश्चर्य म्हणजे ती गर्भगृहात नसून सभामंडपाच्या छताला कोरलेली आहे.(महालक्ष्मी मंदिर कांबी)
काशी खंडात उल्लेख असलेल्या काम्यक वनात भगवान शंकर रूसुन आले होते व त्यांची तपश्चर्या चालू असताना पार्वतीने भिल्लीनीच्या रूपात शंकरा समोर नृत्य केले त्यावेळी भगवान शंकराने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले, तुम्ही सदैव माझ्या जवळ रहा, असा वर तिने मागितल्यावर दोघे याच वनात शंभर वर्षे राहिले, एकदा वनात असताना पार्वतीला कुणी तरी ञास देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे देवी पार्वती छतावर बसली ती कायमचीच अशी आख्यायिका ग्रामस्थ सांगतात.
कांबी येेेेथील महालक्ष्मी मंंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरामध्ये अनेक ठिकाणी सुबक असे कोरीवकाम केलेले आढळते. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती सभामंडपाच्या छताला कोरलेली आहे. छतावर महालक्ष्मीची मुर्ती हे आश्चर्य वाटते. मुखमंडपात छतावर हनुमानाची जीवन कथा कोरली आहे. अगदी जन्म, श्रीरामाची भेट असा पूर्ण जीवनपट तिथे कोरलेला दिसून येतो.
सभामंडपात एक सर्पशीळा आपल्याला दिसून येते तसेच सभामंडपातील देवकोष्ठकात भैरव व गणेश मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहात एक शिवलिंग आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या शिवलिंगाजवळ नंदी नाही. या मंदिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये खांबावरती एक शिलालेख कोरलेला असुन त्यात या मंदिराच्या निर्माण करणाऱ्या यादव राजाविषयी माहिती आहे. मंदिराच्या बाहेर नवीन बांधलेल्या सभामंडपात काही वीरगळ उभ्या करून ठेवलेल्या दिसून येतात.
नवराञीत परिसरातील भाविक नऊ दिवस मंदिरात राहुन कडक उपवास करतात, या मंदिराकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देऊन परिसर विकासाला चालना द्यावी, तसेच या पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन करावे अशी मागणी कांबी ग्रामस्थान मधून होत आहे.
©️ रोहन गाडेकर