महानुभाव पंथ आणि खान्देश –
भडगाव येथे स्वामींनी काकोसास साक्षात् श्रीकृष्णाची द्वारका दाखवण्याची व श्रीकृष्ण रूपात दर्शन देण्याची लीळा केली. तेथून ते पाचोरा शेंदुर्णीमार्गे चांगदेवास आले. तापी-पूर्णा संगमी पाण्यात शिरून प्रत्यक्ष देवतांचे दर्शन करवले. तेथून पुढे हरताळ्यावरून सावळदेवासि गमन केले. तिथून घाट चढून जाळीसी आसनस्थ झाले. तेच आजचे अजिंठय़ाच्या पायथ्याशी वसलेले जाळीचा देव वा जयदेववाडी हे सुप्रसिद्ध तीर्थस्थान होय.(महानुभाव पंथ आणि खान्देश)
‘लीळाचरित्र’ ग्रंथातल्या काही लीळा खानदेशातील आहेत. या लीळांमधून खानदेश आणि या प्रदेशातील विविध भावमुद्रांचे नेमके रूप आढळते. ‘लीळाचरित्र’ गं्रथाच्या पूर्वाध्र्दातल्या लीळा क्रमांक 389, 410, 417 किंवा लीळा क्रमांक 420 महत्त्वाच्या आहेत. यातून जातीपातीरहित अशा एका मानवतावादी परंपरेला उभे करण्यासाठी स्वामी श्रीचक्रधरांनी घेतलेल्या कष्टांचे सम्यक् दर्शन घडते. श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणार्पयत मानवाला उन्नतीच्या वाटेवर नेण्यासाठी अपार कष्ट वेचले. या लीळा आणि या परिसरातील महानुभाव पंथियांसाठी मोलाची अशी तीर्थक्षेत्रे हाही एक महत्त्वाचा भाग आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव, वाघळी, कनाशी, पाचोरा, सायगव्हाण, शेंदुर्णी, चांगदेव, हरताळे ही स्थाने मोलाची आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील एकमुखी श्री दत्तात्रेयाची मूर्ती आणि यात्रा तसेच खरदा येथील मंदिर विशिष्ट म्हणावे लागेल.
श्रीचक्रधरप्रभूंच्या संन्निधानात चार प्रकारचा परिवार होता. दर्शनीये, वेधवंत, बोधवंत आणि अनुसरले. दर्शनीये म्हणजे ज्यांनी श्रद्धापूर्वक एकदा किंवा वारंवार सर्वज्ञांचे दर्शन घेतले, नमस्कार केला वा करत होते अशा व्यक्ती. वेधवंत म्हणजे सर्वज्ञांविषयी आवड असणा:या व्यक्ती.
बोधवंत म्हणजे सर्वज्ञ आणि सर्वज्ञांनी सांगितलेले परमेश्वरांचे अवतार हेच परमेश्वर होत अशी ज्यांची दृढ प्रतीती होती अशा व्यक्ती तर अनुसरले म्हणजे सर्व संग परित्याग करून ज्या देवाच्या सान्निध्यात रहात असत आणि त्यांच्या आ™ोचे पूर्ण पालन करत असत अशा व्यक्ती होत. भडगावचे श्रीविष्णू देव हे दर्शनीये होते.
थाळनेर येथील आऊसा हे नाव महानुभाव परंपरेत अतिशय तेजस्वी आहे. आऊसाने अनुसरले हा मान मिळवला होता. थाळनेरच्या दीक्षितांची ही कन्या आणि उपासनींची सून. तिचे आई-वडील गरीब होते. ते वारले. नवराही निवर्तला. तिच्या मनाला औदासिन्याने घेरले.
अशा विपन्न मन:स्थितीत तिने घरदार सोडले. तिच्या सोबत डांगरेश नावाचा एक कुत्रा होता.आपल्या दु:ख दारिद्रय़ावर मात करण्यासाठी आपल्यापाशी परीस असावा असे तिला वाटे. यासाठी तिने विंध्यवासिनी देवीपाशी धरणे धरले होते. विंध्यवासिनी देवीने आऊसेला स्वप्नदृष्टांत दिला की गंगातीराला जा. तिथ तुला परीस लाभेल. ती लगेचच तिथे आली. जोगेश्वरी येथे श्री चक्रधर स्वामी मुक्कामी होते. स्वामींच्या दर्शनाने आऊसा वेगळ्या विश्वात प्रविष्ट झाली.
खानदेशातील विविध महानुभाव आचार्यानी मोठय़ा प्रमाणात लेखन केले आहे. मठमंदिरातील हस्तलिखित पोथी अजूनही संशोधकांची वाट बघत आहेत. या पोथींची सूची जरी प्रकाशित झाली तरी पुढील संशोधकांना वाट दिसणार आहे. या परिसराने आपल्या प्र™ोने व प्रतिभेने महानुभाव विचार परंपरेला समृद्ध केले आहे.
महानुभाव पंथाच्या मूर्धन्यस्थानी आहे ग्रंथराज लीळाचरित्र. या ग्रंथाच्या संपादनासाठी पुढील महानुभाव संत महंतांपाशी वा इतरत्र विविध सांकेतिक लिप्यांमध्ये लिहिलेल्या पोथी आढळल्यात.
नरेंद्र मुनि अंकुळनेरकर जाधववाडी यांनी 1993 मध्ये संपादित केलेल्या ग्रंथासाठी पुढील पोथी खानदेशात उपलब्ध झाल्यात, या नावांची कृतज्ञ नोंद नरेंद्र मुनि अंकुळनेरकर यांनी घेतली आहे. या यादीत पुढील नावांचा समावेश करता येईल. जळगाव जिल्ह्यातील सर्वश्री विद्याधर दादा पंजाबी (वाघोदे), रेवेराज बुवा (बामणोद), प्राचार्य दि.वि.शास्त्री संस्कृत विद्यालय (फैजपूर), साध्वी बेबीबाई लांडगे (कनाशी), दिवाकर बाबा (वाघोदे), धुळे जिल्ह्यातील महंत बीडकर बाबा (फेस), लीलाचंद बाबूलाल पाटील (भरवाडे), नंदुरबार जिल्ह्यातील गोपीराज बुवा बीडकर (सारंगखेडा), कृष्णराज बुवा भोजने (हिंगणी), कृष्णराज बुवा (कहाटूळ), साध्वी कस्तुराबाई बीडकर (फेस) यांचा समावेश आहे.
महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी पूर्वीच्या खानदेशातील गोदातटावरील अनेक गावी भेटी दिल्या आहेत. यात नाशिक, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, चरणचारी, आसन स्थान, अडगाव, मौजे सुकेणे, निफाड, मादने आदी स्थाने महत्त्वाची आहेत.
स्वामी श्रीचक्रधर कन्नड, सायगव्हाण, वाघळीमार्गे कनाशीवरून भडगावला आले. तिथे शिमगा केला. कनाशीस अनेक भक्तगण आले होते.
-प्रा.डॉ.विश्वास पाटील