स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे भोसले –
शके १५८५ माघ शुद्ध पंचमी , शनिवार दिनांक २३ जानेवारी १६६४ , शहाजीराजे यांचा मुक्काम कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील चन्नगिरी तालुक्यातील होदिगीरे नावाच्या गावी होता. गावात जंगली श्वापदांचा त्रास होत असल्याची तक्रार कानी आली आणि शिकारीची आवड असलेले शहाजीराजे घोड्यावर स्वार होऊन काही निवडक लोकांसोबत जंगलात शिकारीस गेले. एक जंगली श्वापद दृष्टीक्षेपात येताच त्याचा पाठलाग करताना दुर्दैवाने घोड्याचा पाय एका खळग्यात अडकला आणि शहाजी महाराजांचा तोल जाऊन ते घोड्यावरून खाली फेकले गेले परंतु त्यांचा एक पाय रिकिबीत अडकल्याने घोड्याबरोबर फरफटत गेले. परंतु मार वर्मी लागल्याने स्वराज्य संकल्पक महाराज शहाजीराजे भोसले महाराजांचा करून अंत झाला.
व्यंकोजीराजानी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले व तेथे ९x८ फुटांचे चौकोनी आकाराचे वृंदावन बांधून एका बाजूस स्थंभ उभा केला. त्यावर पुढी अक्षरे खोदवून घेतली “ श्रीशाहाजी राजन्ना समाधी “ . समाधीच्या पूजेसाठी पाण्याची सोय म्हणून विहीर बांधली. त्या विहिरीस “राचीराम” संबोधले जाते. समाधीच्या पूजा अर्चेसाठी व देखभालीसाठी आदिलशहाने ‘यरगट्टनल्ली’ हे गाव इनाम दिले.
शिवाजी महाराज हे सुरतेची लुट करून राजगडी परतले असतानाच त्यांना हि दुख:द बातमी समजली. शिवबांचा अश्रूचा बांध फुटला व “मजसारख्या पुत्राचा पराक्रम महाराज पाहते तरी उत्तम होते . आपण आपला पुरुषार्थ आता कोणास दाखवावा ” असे बोलून आपल्या दुखा:स वाट करून दिली. शिवबांचा पराक्रम ऐकून महाराज संतुष्ट होत असत. वरचेवर समाधान पत्रे , अलंकार व वस्त्रे पाठवीत असत. याउपरी त्यामागे आपणास कोणी आता वडील नाही ! असे म्हणून दु:ख व्यक्त केले
महाराज ह्या दुखा:तून सावरत असतानाच जिजाबाई सती जाण्यास निघाल्या आणि शिवाजी महाराज पुरते ढासळले आईच्या मांडीवर बसून गळ्यास मिठी मारली “ आपला पुरुषार्थ पाहवयास कोणी नाही तु जाऊ नको “ म्हणत विनवणी केली व त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या समाधीवर छत्री अर्पण केली व दानधर्म केला.
शहाजीराजांच्या मृत्यूची वार्ता आदिलशहास कळताच त्याने ३० जानेवारी १६६४ रोजी एक दुखवटा संदेश व्यंकोजीराजाना पाठवला “ या खराब वेळी आमच्या कानावर आले कि फर्जंद महाराज परमेश्वरी हुकुमाने या नश्वर जगाचा त्याग करून त्या शाश्वत जगात निघून गेले. हि खबर ऐकून आम्हास अतिशय दु:ख झाले. त्यांनी ( व्यंकोजीराजानी ) परमेश्वरी हुकुमास राजी राहून मन संतोषित ठेवावे.
नागेश सावंत