कर्तृत्ववान स्त्रिया…
शिवपत्नी सईबाई महाराणीसाहेब! शिवरायांच्या सून येसूबाई साहेब आणि रणरागिणी ताराराणी साहेब!!
पुस्तक लेखमाला क्रमांक – ९
थोरले आबासाहेब छत्रपती यांनी स्वराज्य निर्मिले.त्यांनतर त्यांचे पुत्र छत्रपती शंभू राजे आणि छत्रपती राजाराम महाराज यांनीही स्वराज्यनिर्मितीस हातभार लावला. मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. या स्त्रियांनी कधी प्रत्यक्ष तर कधी पडद्यामागे राहून आपली तेजस्वी प्रतिमा राज्यकारभारात उमटवली. शिवछत्रपतींच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये जसा मातोश्री जिजाऊंचा सहभाग होता तसाच पत्नी सईबाईंचा सुद्धा होता.त्याच बरोबर त्यांच्या दोन्ही सुनबाई येसूबाई आणि ताराराणी या ही प्रचंड कर्तबगार स्त्रिया होत्याच.
शिवरायांच्या एकूण ८ पत्नी. त्यातील जैष्ठ पत्नी म्हणजेच महाराणी सईबाई! यांचे माहेर हे फलटण च्या निंबाळकर राजे घराण्यातील. सईबाईंचा विवाह छत्रपती शिवरायांसोबत १६ मे १६४० रोजी पुण्यातील लाल महाल इथे झाला. त्यांना एकूण ४ संतती.३ मुली म्हणजे सखुबाई,राणूबाई , अंबिकाबाई आणि १ मुलगा म्हणजेच छत्रपती शंभु राजे(जन्म स्थळ- किल्ले पुरंदर).
शंभुराजांच्या जन्मानंतर सईबाईंची तब्येत प्रचंड ढासळली. त्याच वेळेस स्वराज्यावर अफझल खान रुपी अजगर स्वराज्य गिळंकृत करावयास चालून आला होता.या अवघड परिस्थितीमध्ये महाराज असतानाच अखंड सौभाग्य अलंकृत सई राणी साहेब यांची प्रकृती जास्तच ढासळली . त्यावेळेस त्यांना किल्ले राजगड येथील पायथ्याच्या शिवापट्टण या गावी शिवरायांनी एक वाडा बांधून दिला होता.त्या तिथेच राहत होत्या.पण अखेर भाद्रपद वद्य चतुर्दशी ५ सप्टेंबर १६५९ ला त्यांनी त्याच वाड्यात शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी शंभूराजे अवघे दोनच वर्षे चे होते.
छत्रपती शिवरायांना एकूण दोन सुनबाई.
थोरल्या सौभाग्यवती येसूबाई ज्या छत्रपती शंभूराजे यांच्या पत्नी आणि धाकट्या रणरागिणी ताराराणी साहेब , छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी !
दोघीही प्रचंड कर्तृत्ववान!यांनीही प्रचंड इतिहास गाजवला होता.मराठयांच्या इतिहासात दोघींचेही प्रचंड शौर्य आणि अजरामर कर्तृत्व!!
येसूबाई या शृंगारपूर च्या शिर्के घराण्यातील तर ताराराणी या तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या! दोन्हीही घरंदाज घराण्यातील.
छत्रपती संभाजी राजांचे हालहाल करून त्यांना मरण आल्यावर येसूबाई आणि त्यांचा मुलगा थोरले शाहू महाराज हे तब्बल २७ वर्षे मुघलांच्या ताब्यात गेले. त्यावेळेस अनेक मराठा सरदार एकत्र येऊन मुघलांविरुद्ध स्वराज्याचा स्वातंत्र्य लढा चालूच ठेवला. छत्रपती राजाराम महाराज यांचा सिंहगड वर मृत्यु झाल्यावर रणरागिणी ताराराणी यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते.त्यांना मोगलमर्दिनी उगाच नाही उल्लेखले जात!!
तर अश्या या तिन्ही महाराणी साहेबांवर लिहावयास गेल्यास एक स्वतंत्र पुस्तक होईल इतका मोठा पराक्रम आणि इतिहास आहे यांचा!
तरीही आपणास यांच्याविषयी असणाऱ्या संदर्भासहित चरित्रांची माहिती व्हावी याच एका उद्दात हेतूने ही पोस्ट लिहितो आहे.
सध्या उपलब्ध असणाऱ्या संधर्भ ग्रंथात डॉ. सदाशिव शिवदे सर यांनी लिहिलेले “शिवपत्नी सईबाई” हे सईबाई साहेब यांच्यावरचे चरित्र अतिशय माहितीपुर्ण आहे.
तसेच महाराणी येसूबाई यांच्यावर डॉ. सदाशिव शिवदे सर यांनी लिहिलेले ” महाराज्ञी येसूबाई” आणि डॉ. सौ. मीना मिराशी यांनी लिहिलेल्या “महाराणी येसूबाई” या चरित्र ग्रंथांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.
महाराणी ताराराणी यांच्यावर सध्या असलेली उपलब्ध चरित्रे म्हणजेच डॉ. सदाशिव शिवदे सर यांनी लिहिलेली “रणरागिणी ताराराणी” आणि “छत्रपती राजाराम ताराराणी” ही दोन्हीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत.
आपणही अभ्यासात्मक ग्रंथ वाचत राहावे आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवीत राहावी याच उद्देशाने ही माहिती आपणासमोर सादर करीत आहे.
बहुत काय लिहिणे? अगत्य असू द्यावे !
जय भवानी ! जय शिवराय !
किरण शेलार