महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,793

महाराणी सोयराबाई

By Discover Maharashtra Views: 3166 7 Min Read

महाराणी सोयराबाई –

हिंदवी स्वराज्याच्या महाराणी सोयराबाई ह्या मोहिते घराण्यातील होत्या. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाई यांचे सख्खे भाऊ . मोहिते व भोसले या घराण्यात सोयरिक हि शहाजीराजे यांच्यापासून चालत आली होती. संभाजी मोहिते यांची बहिण तुकाबाई हि शाजीराजांची पत्नी होती. संभाजी मोहिते यांना ३ पुत्र व २ कन्या होत्या. सोयराबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी झाला. तर अण्णूबाई यांचा विवाह व्यंकोजीराजे यांच्याशी झाला. सोयराबाई यांच्या जन्माविषयी नोंद उपलब्ध नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांचा विवाह १६५० च्या दरम्यान झाला असावा .

२४ फेब्रुवारी १६७० रोजी महाराणी सोयराबाई यांना पुत्रप्राप्ती झाली. सभासद बखरीतील नोंदीनुसार “ मोहित्यांची कन्या सोईराबाई गरोदर होती . तीस पुत्र जाहला. तो पालथा उपजला . “ महाराणी सोयराबाई यांना दीपाबाई नावाची मुलगी होती. तिचा जन्म १६६५ च्या दरम्यान झाला असावा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी सोयराबाई यांना पट्टराणीचा मान मिळाला. जेष्ठ शुकल ६ , शनिवार दि. ३० मे १६७४ :- शिवाजी महाराजांचे पुन्हा समंत्रक लग्नविधी झाले. शिवाजी महाराजांचा राणी सोयराबाई यांच्याशी समंत्रक विवाह लावण्यात आला. सोयराबाई हिंदवी स्वराज्याच्या महाराणी झाल्या.

गृहकलह :- परमानंद काव्यातील नोंदिनुसार महाराणी सोयराबाई यांनी शिवाजी महाराजांच्याकडे संभाजीराजे यांच्याविषयी आपला राग व्यक्त केला. संभाजीराजे समर्थ असून आपला मुलगा राजाराम मात्र दुर्बल आहे. तसेच संभाजी राजांपासून राजारामास धोका असल्याचे व शंभूराजे आपणास मान देत नसल्याची तक्रार केली. राज्यविभाजानाचा प्रस्ताव शिवाजी महाराजांसमोर ठेवला. छत्रपती संभाजीराजे आपल्या दानपत्रात लिहितात “ सावत्र आईच्या रागामुळे वडिलांनी मला वाईट वागणूक दिली तरी मी दशरथपुत्र रामाप्राणे वागलो.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील विषप्रयोगाचे आरोप :- छत्रपती शिवाजी महाराजांवर विषप्रयोग केला व त्यात त्यांचे निधन झाले असे आरोप महाराणी सोयराबाई यांच्यावर झालेले दिसतात.

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक २२८६ :- २३ ऑक्टोंबर १६८० डाक रजिस्ट्रारमधील डच्यांच्या पत्रातील नोंद “ गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे कि “ शिवाजीराजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून विषप्रयोग झाला असावा ( ? ) . त्याचा कनिष्ठ पुत्र गादीवर बसावयाचे घाटत होते त्याला तुरुंगवास प्राप्त झाला आहे. आता शिवाजीचा जेष्ठ पुत्र राज्य करीत आहे.

डच्यांच्या पत्रातील नोंद हि जवळजवळ साडे सहा महिन्यानंतर ऐकीव माहितीवर असून ते शिवाजी महाराजांवर विषप्रयोग झाला असावा अशी शंका प्रदर्शित करत आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र ( चिटणीस बखर ) :- संभाजीराजांनी राजारामसाहेबास नजर बंद केले सोयराबाई साहेब याजपासी जाऊन बाईसाहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारले. “ तुम्ही राजलोभास्तव महाराजास विषप्रयोग करून मारिले असा आरोप शब्द लावून कोनाडा भिंतीस करून त्यात सोयराबाईसाहेबांस चीणोन दुध मात्र घालीत जावे सांगून “ आता पुत्रास घेऊन राज्य करावे “ असे बोलिले . त्यानंतर तीन दिवस तशीच होती . तिसरे दिवशी प्राण गेला कळल्यावर दहन केले.

चिटणीस बखरीचा लेखनकर्ता मल्हारराव चिटणीस शिवाजी महाराजांच्या चरित्रात शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक रित्या आजाराने झाला असे सांगतो परंतु संभाजी महाराजांच्या चरित्रात शिवाजी महाराजांचा मृत्यू सोयराबाई यांनी विष देवून घडवून आणला असा आरोप संभाजी महाराजांनी केला असे सांगतो . उत्तरकालीन चिटणीस बखर लेखनकाळ १८१०. बखर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जवळजवळ १३० वर्षांनी लिहिली गेलेली बखरीतील परस्पर विरोधी विधाने व सोयराबाई यांना संभाजी महाराजांनी चिणून मारले अशी रचलेली भाकड कथा या आधारे हि बखर विश्वसनीय नाही. सोयराबाई यांना संभाजी महाराजांनी भिंतीत चिणून मारलेले नाही कारण सोयराबाई ह्या शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर किमान सव्वा वर्ष हयात होत्या ऑक्टोबर १६८१ मध्ये सोयराबाई मृत्यू पावल्या.

शिवदिग्विजय बखर ( लेखनकाळ १८१८ ) बखरीत येणारे वर्णन “ अशी ऐश्वर्यलक्ष्मी विराजमान , त्याठाई बाईसाहेबांचे बुद्धीस अविचार बुद्धी उत्पन्न जाहली आणि विषप्रलये करून महाराजास व्यथीत केले.

बखर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जवळजवळ १३८ वर्षांनी लिहिली गेलेली बखरकाराने या बखरीत विषप्रयोगाचा उल्लेख प्रदीर्घ आणि तपशीलवार अतिरंजीत असा कादंबरीच्या थाटात केलेला आहे. जदुनाथ सरकार म्हणतात “ हि बखर कादंबरीमय अवांतर गप्पा असलेली आहे.

स्वराज्यात राजकारण :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अष्टप्रधान मंडळात दोन गट पडले. सोयराबाई व राजाराम महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये मंत्रिमंडळ विभागले गेले. शिवाजी महाराजांच्या निधनानातर आपला पुत्र राजाराम यास गादी मिळावी म्हणून सोयराबाई यांनी अण्णाजी दत्तो व मोरोपंत पिंगळे यांच्या साह्याने . जेधे शकावलीतील नोंदीनुसार अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर “ वैशाख शुद्ध ३ तृतीयेस राजारामास अनाजीपंत सुरनीस यांनी मंचकी बसविले.” संभाजी महाराज यावेळी पन्हाळगडावर होते . संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी अण्णाजीदत्तो व पंतप्रधान मोरोपंत पेशवे पन्हाळ्यास रवाना झाले. या कामी स्वराज्याचे सेनापती व सोयराबाई यांचे सख्खे भाऊ हंबीरराव मोहिते यांची मदत मिळवी या उद्देशाने त्यांनी सेनापती हंबीरराव मोहिते यांना आपल्या बाजूस वळविण्याचा प्रयत्न केला परंतु सेनापती हंबीरराव मोहिते यांनी संभाजी महाराजांना पाठिबा दिला.

अकबराशी संधान :- सोयराबाई , अण्णाजी दत्तो , हिरोजी फर्जंद यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबराशी संधान बांधले व संभाजीराजांना गादीवरून काढण्याचा व राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट रचला. त्यांनी अकबरास पत्र पाठवून त्याच्या मदितीची अपेक्षा केली . त्या बदल्यात अकबरास स्वराज्यातील हिस्सा देण्याचे मान्य केले. परंतु अकबराचा मंत्री दुर्गादास याने अकबरास संभाजी महराजांकडे ते पत्र सोपवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अकबराने संभाजी महाराजांस सदर घटना कळवली. सदर कट उघडकीस आल्यावर संभाजी महाराजांनी कटात सामील लोकांस कैद करून कडक शिक्षा केली व हत्तीच्या पायी दिले.

सोयराबाईचा मृत्यू ( कमल गोखले : -शिवपुत्र संभाजी ) :- मुंबईकर इंग्रज २७-१०-१६८१ च्या प्रत्रात लिहितात “ राजारामाची आई मेली . कोणी म्हणतात कि संभाजीच्या सांगण्यावरून तिला विष घालून मारली ” . येथे विषप्रयोगामुळे मृत्यू किंवा विषप्राशनाने आत्महत्या या दोनही गोष्टी संभवनीय वाटतात . सोयराबाईने गळ्याला फास लावून घेऊन प्राण दिला असे मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीत लिहिले आहे.

डॉ. जयसिंगराव पवार लिहितात “ येसूबाई ज्या उद्दात व निस्वार्थी तत्वाने वागली , त्या तत्वाचा अवलंब सोयराबाईने केला असता , तर रायगडावरील गृहकलहास जागाच न्हवती , पण सोयराबाईने येसुबाईची भूमिका न स्वीकारता रामायणातील कैकयीची भूमिका स्वीकारली , हेच खरे हिंदवी स्वराज्याचे , शिवाजी महाराजांचे दुर्देव होते.

श्री. नागेश सावंत.

चिटणीस बखर, शिवकालीन पत्रसार संग्रह , परमानंदकाव्यम , शिवदिग्विजय बखर , चिटणीस बखर
कमल गोखले : -शिवपुत्र संभाजी ,
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : -सदाशिव शिवदे
शिवछत्रपती एक मागोवा : – डॉ. जयसिंगराव पवार
छायाचित्र साभार गुगल

Leave a Comment