महाराणी ताराबाई –
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर दीडच महिन्यात (२१ एप्रिल १७००) सातारचा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर पुढच्या दीडच महिन्यात (९ जून १७००) परळीचा किल्लाही मराठ्यांच्या हातून मोगलांच्या हाती गेला. यानंतर औरंगजेबाची कल्पना अशी की, राजाराम महाराजांच्या ‘असाहाय्य स्त्रिया आणि अज्ञान मुले’ यांना शरण आणायला कितीसा वेळ लागणार? परंतु त्याच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्राच्या सुदैवाने त्यावेळी दक्षिणेच्या राजकीय नभोमंडळात एक अत्यंत दीप्तिमान तारा उदय पावत होता. या ताऱ्याच्या प्रकाशाने पुढे अल्पावकाशातच महाराष्ट्राचे मरगळलेले राजकारण पुन्हा उजळून निघाले. विभागून पडलेल्या शक्ती संघटित होत गेल्या. वीरवृत्तींना संजीवनी मिळाली. आणि निराशेच्या राखेतून नव्या पराक्रमाचे स्पुरण फुलू लागले. हा तेजस्वी तारा म्हणजे महाराणी ताराबाई.
महाराणी ताराबाई यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते आणि कार्यशक्ती दांडगी होती. त्यांचा जन्म १६७५ साली मोहित्यांच्या घराण्यात झाला. छत्रपती शिवरायांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या. माहेरचे नाव सीताबाई, पण राजाराम महाराजांची विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव ताराऊसाहेब (ताराबाई) असे ठेवण्यात आले. राजाराममहाराज रायगडावर संभाजीमहाराजांच्या नजरकैदेत होते, त्याच काळात छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचे लग्न हंबीरराव मोहित्यांच्या या कन्येशी करून दिले. विवाहाच्या वेळी त्यांचे वय आठ वर्षाचे आणि राजाराम महाराजांचे तेरा वर्षांचे होते.
छत्रपती राजाराम महाराजांच्या हयातीतच त्या राजकारणात भाग घेत असत, असे तत्कालीन माहितीवरून दिसते. मोघलांच्या फौजेबरोबर असलेल्या पर्शियन इतिहासकार खाफीखान याने ही गोष्ट मुद्दाम नमूद करून ठेवली आहे. इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांनीही म्हटले आहे, “ताराबाईने पतीच्या हयातीतच आपला पौरुषी कार्योत्सव आणि बुद्धिमत्ता निदर्शनास आणून दिली होती. याच काळात तिने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेण्यास आरंभ केला होता.”
‘भारतवर्ष’’त वरील विधानाला पूरक असे उल्लेख आढळतात. त्यात म्हटले आहे, तेथे राजाराम तंजावरा लढत असता ताराबाईने महाराष्ट्रातील एखाद्या प्रसिद्ध राणीप्रमाणे अंमल चालविला. नवरा जिवंत असतानाही हिने रामचंद्रपंतासारख्या (सारख्यावर) जरब बसविली. शिवाजीची खरी सून.”
छत्रपतींच्या या शूर सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीने इ.स.१७०० ते १७०७ पर्यंत सात वर्षे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत दक्षिणेतच मुक्काम करावा लागला आणि अपयश पदरी घेऊन येथे देह ठेवावा लागला.
संदर्भ : स.मा.गर्गे, करवीर रियासत.
चित्र : M.V.Dhurandhar, 1927.
Sanket Pagar