महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,851

महात्मा जोतिबा फुले

Views: 3602
6 Min Read

महात्मा जोतिबा फुले –

साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा जोतिबा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत. त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. जोतिबा केवळ नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या १३ वर्षी जोतिबांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अतिशय तल्लख बुद्धीमुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. जोतिबा करारी वृत्तीचे होते. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

दीनदलितांच्या व्यथावेदनांच्या नीराकरणाचा मार्ग म्हणून विद्येकडे पाहिले. अविद्येची काजळी दूर झाल्याशिवाय, विद्येचा प्रकाश प्राप्त झाल्याशिवाय जनसामान्याचा उद्धार नाही अशी ज्योतिबा यांची खात्री झाली.

विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा जोतिबांनी निश्चय केला. इ.स. १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या भिडे वाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा जोतिबांनी स्थापन केली. या शाळेतील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपविली. यानंतर जोतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

शेतकऱ्यांचे आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारीविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी जोतिबांनी लिहिलेले ग्रंथ आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे.

२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. संत तुकारामाच्या अभंगांचा जोतिबांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जनतेने त्यांना मुंबईतील एका सभेत इ.स. १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतिबा फुले हे ‘महात्मा फुले’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

विद्या नसेल  तर बुद्धीचे भरणपोषण होणार नाही. बुद्धी  अविकसित राहिली तर योग्य काय आणि अयोग्य काय हे कळणार नाही. ते न कळल्यामुळे माणूस कृतिशील होणार नाही.कृतिशीलते अभावी येणाऱ्या नाकर्तेपणामुळे निर्वाहाची  दिशा सापडणार नाही .शेवटी माणसे खचतील, पिचतील , कंगाल होतील. जोतिबांचे लिहिणे धारदार होते. उगाच पसारा माजवणे हे त्यांच्या वृत्तीच नव्हते .रानफुलांचा औषधी गुणधर्म घेऊन प्रकट होणारे साहित्य ‘ज्योती’ चे  तेज आणि तप्तता घेउनच अवतीर्ण होत होते. आपल्या कार्य प्रचारासाठी ज्योतिबांनी आमरण लेखणी झिजवली. 1873 मध्ये ‘गुलामगिरी’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले .’शेतकऱ्यांचा आसूड’ 1883 मध्ये त्यांनी समाजाच्या हाती दिला.

जोतिबा चाळीस वर्षे चंदनासारखे झिजले. त्यांनी प्रवास केला. व्याख्याने दिली. लेख लिहिले .स्वातंत्र्य, समता ,लोकशाही, विज्ञान , इहवाद या आधुनिक जीवनमूल्यांची रुजवण जोतीबांनी केली. सर्वधर्मसमभावाची वार्ता करणाऱ्या आधुनिकांना जोतीबांनी फार मागे टाकले .

अस्पृश्य ,अदर्शनीय नि अनभिगम्य समजल्या जाणाऱ्या अतिशूद्रांच्या  मुलींसाठी शाळा काढणारे पहिले भारतीय ,  आधुनिक भारतातील स्त्रीशिक्षणाचे जनक , भारतीय स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्य यांचा उद्गाता, शेतकरी व कामगार ह्यांची दुःखे  आणि दारिद्र निवारण्यासाठी  चळवळ उभारणारे पहिले पुढारी ,जातिभेद संस्थेवर कडाडून हल्ला चढवून मानवी समानतेची घोषणा  करणारा पहिला लोकनेता, सामान्य जनतेच्या दुःखाला आणि दैन्याला वाचा फोडणारा पहिला महात्मा आणि सत्यमेव जयते ह्या दिव्य तत्वाने  भारून गेलेला खरा सत्यशोधक.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतिबांना आपले गुरु मानले. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी’ सामाजिक क्रांतिकारक’ म्हणून त्यांचे जयगान केले. महाराष्ट्रातील अठरापगड प्रजेने  समारंभपूर्वक ज्योतिबांचे माहात्म महाराष्ट्राच्या मुंबईत ऊदघोषित केले.

जोतिबा समाजासाठी  चंदनासारखे झिजले. त्यांनी प्रवास केला. व्याख्याने दिली. लेख लिहिले .स्वातंत्र्य, समता ,लोकशाही, विज्ञान , इहवाद या आधुनिक जीवनमूल्यांची रुजवणे जोतीबांनी केली. सर्वधर्मसमभावाची वार्ता करणाऱ्या आधुनिकांना जोतीबांनी फार मागे टाकले .

अस्पृश्य ,अदर्शनीय नि अनभिगम्य समजल्या जाणाऱ्या अतिशूद्रांच्या  मुलींसाठी शाळा काढणारे पहिले भारतीय ,  आधुनिक भारतातील स्त्रीशिक्षणाचे जनक , भारतीय स्त्रियांचे हक्क व स्वातंत्र्य यांचा उद्गाता, शेतकरी व कामगार ह्यांची दुःखे  आणि दारिद्र निवारण्यासाठी  चळवळ उभारणारे पहिले पुढारी ,जातिभेद संस्थेवर कडाडून हल्ला चढवून मानवी समानतेची घोषणा  करणारा पहिला लोकनेता, सामान्य जनतेच्या दुःखाला आणि दैन्याला वाचा फोडणारा पहिला महात्मा आणि सत्यमेव जयते ह्या दिव्य तत्वाने  भारून गेलेला खरा सत्यशोधक.

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment