महात्मा फुले वाडा, पुणे –
गंज पेठेमध्ये महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि १९ व्या शतकातील एका क्रांतीकारक जोडप्याचा वाडा आहे. जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे ते निवासस्थान. आपण जोतीरावांना महात्मा फुले या नावाने जास्त ओळखतो. इ.स. १८५२ च्या सुमारास बांधण्यात आलेल्या या वाड्याला महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष अधिनियम १९६० अंतर्गत १९७२ साली राज्य संरक्षित वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. पुणे महानगरपालिकेतर्फे प्रथम श्रेणी ऐतिहासिक वास्तू म्हणूनही प्रमाणित केले गेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तु संग्रहालये विभागामार्फत मूळ स्वरुपात महात्मा फुले वाडा जतन केले जात आहे.
गंज पेठ पोलीस चौकीवरून सरळ माशेआळी ओलांडून पुढे गेले की, उजव्या बाजूला जाणारा एक छोटा रस्ता लागतो. त्या रस्ताने पुढे गेल्यावर समोर महात्मा फुले वाडा लागतो. वाड्याला चहूबाजूंनी कुंपण असून समोर प्रशस्त आंगण आहे. अंगणात महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा एका चौथऱ्यावर आहे. त्याच्या मागच्या भिंतींवर त्यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांची मूर्ती चित्रे कोरलेली आहेत.
मुख्य घरासमोर एक तुळशी वृंदावन आहे. त्यात महात्मा फुले यांच्या अस्थी ठेवल्या आहेत. दि. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचे या वाड्यात निधन झाले. “आपल्या शवास दहन करू नये तर मिठात घालून जमिनीत पुरावे” अशी अंतिम इच्छा त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात नमुद करून ठेवली होती. घरामागील या बखळ जागेत त्यांनी शेवटच्या आजारपणात त्यासाठी खड्डाही खोदून घेतला होता. परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी राहत्या परिसरात दफन करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे नाइलाजाने त्यांचे दहन करावे लागले. त्यांना अग्नी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी दिला. दि. ३० नोव्हेंबर १८९० रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या अस्थी आणून या जागेत ठेवल्या.
मुख्य दरवाजातून आत गेल्यावर छोटेसे आंगण आहे त्या समोर पडवी आहे. अंगणात डाव्या हाताला विहीर असुन या विहीरीतून पाणी काढण्यासाठी रहाट आहे. हि विहीर त्यांनी इ.स. १८६८ रोजी पडलेल्या दुष्काळामध्ये अस्पृश्य मागासवर्गीय लोकांना हक्काचे पाणी मिळावे म्हणून खुली केली होती. पडवीच्या उजव्या हाताला असलेली खोली स्वयंपाक घराची आहे. त्यात जोतीबा फुले यांचे जीवन चित्रांद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहे. वाड्याच्या आत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे लावलेली आहे. तसेच त्याच्या सहकार्यांचे फोटो, पुस्तकाचे मुखपृष्ठ, त्यांच्या हस्ताक्षराचा नमुना यांची व्यवस्थित मांडणी केली आहे. बैठकीच्या खोलीत जोतीरावांचे पितळी अक्षरात कोरलेले मृत्यूपत्र आहे.
हा वाडा इ.स. १९२२ मध्ये श्री सावतामाळी फ्री बोर्डींगचे आश्रयदाते श्री. बाळा रखमाजी कोरे झांनी श्री. अर्जुना पाटील बोदा ह्यांचे पासून रु. १५००/- च्या मोबदल्यात खरेदी केल्याची नोंद मिळते. इ.स. १९२२ पासून या ठिकाणी सावतामाळी फ्री बाडिंग चालविले जात होते. पुढे इ.स. १९६९ मध्ये त्याचे महात्मा फुले वसतिगृह असे, नामकरण करण्यात आले.
पत्ता : https://goo.gl/maps/dDr874A5BQ7ACLpGA
आठवणी इतिहासाच्या