महिषासूरमर्दिनी दूर्गा | आमची ओळख आम्हाला द्या –
पाटेश्वर मंदिर समूहातील आवारामध्ये नंदीमंडपाच्या बाजूला दोन मंदिर आहेत. त्यापैकी एक ब्रह्मदेवाचे आहे. त्याच्या बाजूला अठरा हात असलेल्या देवीची मूर्ती आहे. ह्यास लोक अष्टदशाभुजा लक्ष्मी असे संबोधतात .पाटेश्वर येथील महिषासूरमर्दिनी दूर्गा ही मूर्ती खूप सुंदर असून ह्या मूर्ती लक्ष्मी कसे संबोधायचे! मूर्ती शास्त्राच्या दृष्टीकोनातून ही मूर्ती महिषासुरमर्दिनीची आहे. ही मूर्ती प्रतिलाढसनात आहे. तिला अठरा हात आहेत.
प्रदक्षणा क्रमाने तिच्या डाव्या हातात अनुक्रमे भाला, गदा, घंटा, सुदर्शन, मुसळ ,मुदगल ,वरमुद्रा असा व उजव्या बाजूचा आयुधक्रम अभयमुद्रा, स्रुव, शंख, कमळ, डमरू, बाण, अंकुश, पात्र असा आहे. देवीच्या पाया सिंह असून देवीने आपला पाय सिंहावर स्थिरावलेला आहे. मूर्तीच्या पायात जाड तोडे असून पैंजण पाद वलयही दिसतात. उत्तरियावर मेखला असून ती सामान्य प्रकाराने सजविलेली आहे. कटीवस्त्राचा सोगा पायांमधून सिंहाच्या डोक्याजवळ मागे आलेला आहे. गळ्यात कंठाहार आहे. कानात चक्राकार कुंडले आहेत.
मूर्तीला एकूण अठरा हात दाखवल्यामुळे त्यांची ठेवण एका पट्टी सारखी आहे. समोर चार व मागे चार असे एका बाजूस आठ व दुसर्या बाजूस आठ असे सोळा हात आहेत. देवीच्या हातात कंकणे, डोक्यावर करंडक मुकुट आहे. देवीच्या कपाळाच्या मधोमध तिसरा डोळा आहे, देवीच्या मूर्तीची प्रभावळ अत्यंत साधी आहे. पायाकडे खालच्या बाजूस दास-दासी किंवा सेविका आहेत. एका हातात चामर व दुसऱ्या हातात पात्र धरून त्या उभ्या आहेत.
मूर्तीच्या एकंदरीत वर्णनावरून ती मूर्ती लक्ष्मीची नसून महिषासुरमर्दिनीची आहे. महाराष्ट्रात अष्ट दशभुजा असणारी मूर्ती साडेतीन शक्तीपीठांपैकी नाशिक येथे सप्तश्रृंगी म्हणुन ओळखली जाते.अशाच १८ हाताची हि देवी लक्ष्मी नसून महिषासूर मर्दिनी आहे.
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर