महजर | Majahar –
महजर हा अरबी शब्द आहे. याच मूळ हजर या शब्दात आहे. अनेक व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या समक्ष, त्यांच्या साक्षीने लिहिण्यात आलेल्या माहिती अथवा वृत्तान्त म्हणजे महजर. हेमहजर वेगवेगळ्या कारणांसाठी केले जात. बहुतेक महजरांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींमधील तंट्याचा निवाडा, वतनाच्या वाटणी, दोन गावांमधील शिवेचा वाद यासंबंधीचे सविस्तर विवरण असते.
महजर करताना जो समाज गोळा होतो त्याला गोत म्हणतात. या गोत सभेत सामान्यतः परगण्याचे देशमुख, सरकारी अधिकारी, कुलकर्णी , परगण्यातील काही गावांचे मोकादम ( पाटील ), ज्या गावात महजर होत असे तेथील मोकादम, कुलकर्णी इतर बलुते उपस्थित असत. अशा गोतात उपस्थित राहण्याकरिता जातीचा कोणताच निर्बंध नव्हता. या महजरांचा अभ्यास केल्यास तत्कालीन समाजव्यवस्था, गावगाडा, राजसत्ता, धर्मशास्त्र, न्यायनिवाडे, आर्थिक बाबी, राजकीय बाबी याची माहिती मिळते. महजरांमध्ये सभेला उपस्थित लोकांची नावे आणि निशाण्या असत.
नांगर, सुरी, बंदूक, कट्यार, तलवार, तागडे ( तराजू), अब्दागिरी, खुरपे, पट्टा, चाक, कात्री, किंकर, मुगली, आरसा, विळादोर, डफ काठी अश्या अनेक निशाण्या असत त्या बहुधा त्याव्यक्तीची जात, व्यवसाय किंवा पद दर्शवित. तसेच देशमुखांचे शिक्के, सरकारी अधिकाऱ्यांचे शिक्के असत. महजराला बऱ्याच व्यक्ती असत ही संख्या कधी २० हुन कमी किंवा १०० पेक्षा जास्तही असे.
हे महजर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचे मूक साक्षीदारच आहेत.
आपल्या कुडाळ परगण्याचे अनेक महजर आहेत. या जुन्या कागदपत्रांकडे पाहिलं असता एक वेगळी अनुभूती मिळते आणि भूतकाळात गेल्यासारख वाटतं. हे-महजर म्हणजे तत्कालीन ( मध्ययुगीन) इतिहासाची अस्सल साधने आहेत. आजरोजी ३०० हुन अधिक महजर उपलब्ध आहेत. तसेच अनेक घराण्याच्या वैयक्तिक संग्रहातही बरेच-महजर असतील. त्याचा अभ्यास होणे गरजेचे असून यातून आणखी अज्ञात इतिहासावर प्रकाश पडू शकतो.
लेखन आणि संकलन
श्री श्रीनिवास राजेंद्र शिंदे देशमुख शिक्केकरी
कुडाळकर परगणे कुडाळ प्रांत जावळी जिल्हा सातारा