मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २…
मलकापूरची व्युत्पत्ती-
मलकापूर हे कोल्हापूर राज्याच्या पंतप्रतिनिधींचे राहण्याचे मुख्य ठिकाण होते. मलकापूर हे गाव जनार्दन पंतप्रतिनिधी यांनी वसविले. १८४४ मध्ये प्रतिनिधी घराण्याचे प्रमुख ठाणे विशाळगडहून मलकापूरला हलवल्यानंतर मलकापूरचे महत्त्व वाढले. पंतप्रतिनिधी हे मलकापूर वाड्यातूनच जहागिरीचा कारभार करू लागले. त्यावेळी मलकापूर हे “मंगलपूर” या नावाने प्रचलित होते. मलकापूर भूमीवर शिवछत्रपतींचे तसेच वीर संभाजी राजे यांचे काही काळ येणे-जाणे होते. ते साधारण सतराव्या शतकातील आहे. एके काळी संभाजी राजांनी मलकापूर येथे मुक्काम करून संगमेश्वर मुक्कामी गेले होते असा उल्लेख इतिहासात आढळतो. ‘मलकापूर हे गाव “मलिक काफुर” या मोगली सरदारांनी जिंकल्यामुळे याचा अपभ्रंश होऊन मलकापूर हे नाव प्रचलित झाले’ अशी आख्यायिका सांगितली जाते.
मलकापूरचे भौगोलिक स्थान-
मलकापूर हे गाव कोल्हापूरच्या वायव्य दिशेस ४५ किलोमीटरवर शाळी आणि कडवी नदीच्या तीरावर वसलेले आहे. येथे विश्वेश्वर आणि भीमाशंकराचे देऊळ आहे. मलकापूरच्या पश्चिमेला असलेला महादेव डोंगर सह्याद्रीच्या पूर्व बाजूच्या उतारावरचा छोटासा डोंगर आहे. मंगलपूर गावची फार पूर्वीपासून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा असल्यामुळे डोंगरावरच ध्यानधारणेसाठी शिवशंभू महाराजांचे मंदिर स्थापन केले होते आणि त्यावरून या डोंगराला महादेव खडी हे नाव प्रचलित झाले. ह्याच डोंगराच्याच मध्यावर श्री गजानन महाराजांचे नवीन मंदिर बांधलेले आहे.
मलकापूर नगरपालिकेचे क्षेत्र ८६.६८ हेक्टर इतके आहे. मलकापूर शहर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आहे. हवामान व पर्जन्याच्या दृष्टिकोनातून मलकापूर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगात असल्यामुळे पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो. हिवाळ्यात थंडी तर उन्हाळ्यात उष्णता असते. नैसर्गिक रचनेमुळे येथील जमीन भिन्न भिन्न स्वरूपात आढळते. जमीन मुरमाड आणि गाळापासून तयार झालेले आहे. विशेष म्हणजे येथील तांबडी जमीन चांगली पाणी निचऱ्याची व उथळ स्वरूपाची असून ही जमीन चुनखडीयुक्त आहे. ह्या जमिनीत फॉस्फरिक गुणधर्म आढळतो. दोन्ही बाजूने नद्या आणि एका बाजूला डोंगर अशा भौगोलिक परिस्थितीत वसलेले माझे गाव वर्षा ऋतुत खूप नयनरम्य दिसते. सद्या नगरपालिकेने महादेव खडीवर उत्कृष्ट प्रतीचे उद्यान उभारले असून तेथून सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवणे ही एक पर्वणीच असते. खडीवरून खाली पाहिले असता इतिहासाची साक्ष देणारे माझे गाव गुण्यागोविंदाने नांदत असलेले पाहून एक विलक्षण आनंद मिळतो.
क्रमशः मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २
माहिती साभार – Kunal Shitturkar
छायाचित्र सौजन्य – Roopesh Warange
मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग १…
मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २…
मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ३…
मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ४…