महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,50,826

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ३

By Discover Maharashtra Views: 3316 3 Min Read

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ३…

विशाळगड आणि मलकापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी (पूर्वार्ध)

इतिहासात पन्हाळगडाप्रमाणेच विशाळगड किल्ल्यालाही खूप महत्त्व होते. हा किल्ला कधी बांधला याची निश्चित तारीख उपलब्ध नसली तरीही शिलाहार राजा भोज दुसरा याने कोल्हापूरला इ.स. ११८७ मध्ये शिलाहार घराण्याची राजधानी स्थापन केल्यापासून किल्ल्याचा इतिहास उपलब्ध आहे. इसवी सन ११९१-९२ मध्ये राजा भोज यांनी पन्हाळगडावर आपले राजसिंहासन प्रस्थापित करून महाराष्ट्रातील प्रसिद्ध 15 किल्ले बांधले. हे किल्ले म्हणजे पन्हाळा, विशाळगड, बावडा, भुदरगड, सामानगड, पावनगड, वसंतगड, सातारा, चंदन, वंदन, नांदगिरी, वैराटगड, आणि पांडवगड इत्यादी होय. शिलाहार घराण्याचा अस्त झाल्यानंतर हा प्रदेश यादव घराण्यात समाविष्ट झाला. तेराव्या शतकाच्या प्रारंभी हा परिसर देवगिरीच्या यादव राज्याचा महत्त्वाचा भाग बनला. हे राज्य समाप्त झाल्यानंतर विशाळगड बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेला.

इ.स.१४७० मध्ये बहामनी सुलतानाचा वजीर महमूद गवान याने नऊ महिन्यांच्या वेढ्यानंतर विशाळगड जिंकून घेतला होता. सन १४८९ साली बहामनी घराण्याचा ऱ्हास झाल्यानंतर विशाळगड विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात गेला. सन १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी खेळणा, रांगणा, पावनगड व वसंतगड हे किल्ले लढाई करून ताब्यात घेतले आणि खेळणा किल्लालाच पुढे ‘विशाळगड’ हे नाव दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचे महत्त्व ओळखून परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यास हा किल्ला इनामादाखल दिलेला होतो. इ.स. १७०१ मध्ये पन्हाळा जिंकल्यानंतर औरंगजेब यांने विशाळगडाकडे मोर्चा वळवला. सलग पाच महिने परशुराम त्रिंबक यांनी हा किल्ला मोठ्या निकराने लढविला. परंतु गडावर टिकाव धरता येईल इतके धान्य आणि दारुगोळा नसल्याने काही अटी घालून विशाळगड औरंगजेबाला स्वाधीन करण्यात आला.

पुढे मराठ्यांनी हा किल्ला परत मिळवला आणि महाराणी ताराबाई यांनी परशुराम त्रिंबक यांना प्रतिनिधीपदावर नेमणूक केली. विशाळगड प्रतिनिधी घराण्याचा हाच पहिला पुरुष होय. २७ मे १७१८ रोजी परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांचे निधन झाले. त्यांचे वृंदावन माहुली याठिकाणी आहे. परशुरामपंतांना कृष्णाजी, त्रिंबकराव, श्रीपाद उर्फ श्रीनिवास, सदाशिव आणि जगजीवन उर्फ दादोबा असे पाच पुत्र होते. त्यापैकी कृष्णाजी व त्यांचे वंशज विशाळगड राज्याचे आणि श्रीपाद उर्फ श्रीनिवास व त्यांचे वंशज औंध (सातारा) राज्याचे शेवटपर्यंत पिढीजात प्रतिनिधी होते.

 

क्रमशः

माहिती साभार  – Kunal Shitturkar

छायाचित्र सौजन्य : Uddhav Thackeray Aerial Photography

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग १…

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २…

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ३…

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ४

Leave a Comment