महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,706

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ४…

By Discover Maharashtra Views: 3469 3 Min Read

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ४…

विशाळगड आणि मलकापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी (उत्तरार्ध)

सन १७३१ मध्ये झालेल्या वारणेच्या तहानंतर कोल्हापूरच्या संभाजी राजांनी जनार्धन पंतप्रतिनिधी यांच्या नावे नवीन सनद देऊन विशाळगड किल्ल्याचे इनाम चालू ठेवले. सन १८४४ पर्यंत या घराण्याचे विशाळगडावर मुख्यालय होते. तथापि १८४४ मध्ये बंडखोरांनी विशाळगड ताब्यात घेतल्यावर इंग्रज फौजांनी प्रचंड भडीमार करून किल्ला परत मिळवला आणि त्यावरील तटबंदी नष्ट केली. या किल्ल्याचा पुन्हा उठावाकरिता उपयोग करणे अशक्य व्हावे यादृष्टीने ब्रिटिशांनी गडाची नासधूस केली. तेव्हापासून प्रतिनिधींचे मुख्यालय मलकापूर येथे स्थलांतरीत करण्यात आले.

सन १८५३ च्या सुमारास जनार्दन पंतप्रतिनिधी यांनी राजधानीचे ठिकाण विशाळगड वरून हलवून मलकापूर नगरी नव्याने निर्माण केली. प्रतिनिधींनी शाळी व कडवी नदीच्या जुन्या संगमावर सरकारी वाडा बांधला आणि याच वाड्यातून प्रतिनिधी जहागिरीचा कारभार करू लागले. याच सरकारी वाड्यात ०३ ऑक्टोंबर १८८४ रोजी मलकापूर नगरपालिकेची स्थापना केली. सन १९४०च्या दरम्यान नगरपालिका स्वतंत्र जागेत आली. सन १९४७च्या पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील संस्थाने व जहागिरीचा कारभार इंग्रज सरकारच्या वतीने इंग्रज अधिकारी पोलिटिकल एजंट या नावाने बघत असे. जहागीरदार यांचे अधिकार स्वातंत्र्यानंतर संपून सरकारकडून त्यांना तनखा मिळू लागला. त्यावेळी मलकापूर गावची लोकसंख्या २६०० ते २८०० च्या दरम्यान असल्याने जहागीरदारांनी स्थापन केलेली नगरपालिका बरखास्त करण्याचा प्रस्ताव शासनापुढे होता. परंतु त्यावेळचे मलकापूरचे पंतप्रतिनिधी आबासाहेब यांनी देशाच्या राष्ट्रपतीकडे नगरपालिका बरखास्त करू नये अशी विनंती केली. मलकापूर नगरपालिका संस्थानकालीन असल्याने ती बरखास्त न करता कायम कार्यरत राहावी अशी त्यांची मागणी होती. जहागीरदार यांची विनंती मान्य करून त्यावेळच्या राष्ट्रपतींनी खास वटहुकूम काढून नगरपालिका कार्यरत ठेवली. ही घटना देशाच्या इतिहासात अभूतपूर्व म्हणावे लागेल.अशाप्रकारे देशात खास बाब म्हणून राहिलेली मलकापूर गावची नगरपालिका ही एकमेव नगरपालिका आहे.

 

कै. श्रीमंत आबासाहेब पंतप्रतिनिधी (इ.स. १८७०- इ.स.१९४५)

श्रीमंत आबासाहेब पंतप्रतिनिधी हे विशाळगड जहागिरीचे अकरावे प्रतिनिधी होते. आबासाहेबांचे सहाय्यक म्हणून आनंद देशमुख हे मलकापूर मधून काम पाहत होते. सन १९४५ साली आबासाहेबांचे निधन झाले. ही नगरपालिका कै. आबासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या पुण्याईमुळेच अस्तित्वात आहे. त्यांची समाधी मलकापूर गावच्या पूर्वेला शाळी नदीकाठी भग्नावस्थेत आजही उभी आहे. या समाधीच्या बाजूला मुरलीधर देव, आबा विश्वेश्वर(महादेव मंदिर), दत्त मंदिर, राम मंदिर आणि कार्तिक स्वामी इत्यादि देवतांची मंदिरे आहेत. ह्या सदर देवालयांचा जीर्णोद्धार श्रीमंतराज श्री आबाजीराव कृष्णाजी पंडित प्रतिनिधी साहेब विशाळगड यांच्या आज्ञेवरून कृष्णाजी बाबाजी गंभीर यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कापशी अन्न छत्र संस्थेतून करण्यात आलेला आहे.

समाप्त – मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ४…

माहिती साभार  – Kunal Shitturkar

 भाग १…

 भाग २…

भाग ३…

 भाग ४…

Leave a Comment