मल्लिकार्जुन मंदिर, लोणी भापकर –
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगाव पासून अंदाजे १२ कि.मी जवळ असलेले लोणी भापकर हे पेशव्यांचे सरदार सोनजी गुरखोजी भापकर यांना इनामात मिळालेले गाव. याच गावात उत्तराभिमुख असलेले एक प्राचीन मंदिर म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर. मंदिर स्थापत्य अभ्यासक व तज्ञांच्या मते हे मंदिर १३ व्या शतकाच्या उत्तरार्धातील असावे. मंदिराची रचना व त्यावरील शिल्पे यामुळे हे मंदिर पूर्वी विष्णुदेवतेचे होते हे लक्षात येते. लोणी भापकर हा पूर्वी विजापूरहून पुण्याला येण्याच्या प्रमुख मार्गावरील प्रदेश असल्याने स्वतःच्या नावापुढे ‘बुथशिकन’ (मूर्तीभंजक) म्हणून बिरुदावल्या लावणाऱ्या इस्लामी आक्रमकांच्या नजरेतून हा प्रदेशदेखील सुटला नसावा. म्हणूनच कदाचित मंदिराच्या गर्भगृहात सध्या विष्णुमूर्ती ऐवजी शिवलिंग आहे.
सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना असलेले हे मंदिर. सभामंडपास दोन प्रवेशद्वारे आहेत. एक उत्तरेला आणि आणि एक पूर्वेस. उत्तरेस असलेले द्वार हे “नंदिनी” (पंचद्वारशाखा) या प्रकारातील आहे. द्वारशाखांच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जालवातायने आहेत. या द्वारशाखांवर वेली, फुले, मानव आकृती, सिंह यांच्या नक्षी कोरल्या आहेत. द्वारशाखेचे ललाटबिंब म्हणून गणेशाकृती आहे. नवरंग प्रकारातील या सभामंडपाच्या आतील बाजूस कक्षासाने आहेत. मध्यावर चार स्तंभांच्या मध्ये एक गोलाकृती रंगशीला आहे. सभामंडपाच्या आतील बाजूस मारीचवध, वालीसुग्रीव युद्ध, कालियामर्दन, कामशिल्पे, गोवर्धनधारी कृष्ण, समुद्रमंथन, गोधारी गोपाळ व कृष्णलीला अशी शिल्पे चित्रित केली आहेत. यामध्ये एक दुर्मिळ असे कृष्ण-रुख्मिनी विवाह (किंवा वासुदेव-देवकी विवाह ?) शिल्प देखील कोरलेले आहे. सभामंडपाचे वितान हे समकेंद्री अशा लहान लहान होत जाणाऱ्या नक्षीदार वर्तुळांचे आहे. मंदिराच्या बाह्यांगावर तीन बाजूस रिक्त देवकोष्टके आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकाराचे असून विटांमध्ये बांधलेले आहे. मंदिराच्या समोर एक रेखीव व आत उतरत्या पायऱ्यांची मोठी पुष्करणी आहे. या पुष्करणीच्या पश्चिम बाजूस एक नक्षीदार रिक्त मंडप आहे. पूर्वी त्यात बहुदा यज्ञवराहाचे शिल्प असावे.
जे आता याच मंदिराच्या आवारात पाहायला मिळते. विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. याच अवताराचे हे “यज्ञवराह” शिल्प. महाराष्ट्र अशी वराहशिल्पे फार मोजक्या ठिकाणी आहेत. लोणी भापकर, चाकण, बलसाणे, राजा केळकर संग्रहालय पुणे, राजवाडे संशोधन मंडळ धुळे येथे अशा यज्ञवराहाच्या मूर्ती पाहता येतील. “यज्ञवराह” शिल्पा संदर्भात अधिक माहिती क्रमशः घेऊ.
मल्लिकार्जुन मंदिर, लोणी भापकर, पुणे.
Shailesh Gaikwad