कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर, सोलापूर –
सोलापूर भुईकोट किल्ल्याची पाहणी करत असताना इ.स.१९१७ मध्ये सिमकाँक्स या इंग्रज अधिकारीला किल्ल्याच्या उत्तरेच्या तटबंदीच्या आतील बाजूस दगडी खांबाच्या ओळी झरोक्यातुन नजरेस पडल्या. तत्कालीन गव्हर्नर च्या परवानगी ने पुरातन विभागाने उत्खनन केल्यानंतर तेथे चालुक्य कालीन स्थापत्य शैलीचे कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर हिंदू मंदिराचे अवशेष आढळले. मंदिर बरेचसे उध्दवस्त झालेले होते,गर्भगृह पडलेले कोणतीही मुर्ती नव्हती. इतरत्र अवशेषामध्ये नंदीची व दोन भंगलेल्या सुंदर कोरीव ‘शिवाचे गण’ होते.मंदिरात कोणताही शिलालेख नव्हता.
सिमकाँक्स याने गावातील लोकांसोबत चर्चा केल्यानंतर या मंदिराचे रहस्य उलगडले.लिंगायत रहिवाशी लोकांनी सांगितले की इ.स.१२ व्या शतकात सोलापूर चे थोरसंत आणि शिवयोगी श्री. सिध्दराम यांनी श्री शैलम येथून परतल्यानंतर आपल्या परमप्रिय आराध्यदैवत कपिलसिध्द मल्लिकार्जुन यांच्या मंदिराची स्थापना तत्कालीन ग्राम सोन्नलिगे मध्ये केली. असा उल्लेख विख्यात कन्नड महाकवी ‘राघंवांक’ आपल्या ‘सिध्दराम चरित्र’ या प्रसिद्ध काव्यग्रंथात इ.स.१३व्या शतकात केला आहे. तेव्हाचे राजे ननप्पा आणि राणी चामला देवी यांनी या मंदिरासाठी देणगी दिली. तोरंबा (उस्मानाबाद) शिलालेखानुसार भुपालतिलक जगदेव यानें सोनालीपुर पुरवराधिश्वर कपीलसिध्दास तोरंबा ग्राम दान स्वरूपात दिले आहे.
कलाकुसर, नक्षीकाम ,स्थापत्य, कौशल्य या सर्वांचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर होय.मंदिराची रचना नक्षत्राच्या आकाराची आहे. पुर्ण मंदिर दगडी बांधकामाचे असुन मुखमंडप,सभामंडप, अंतराळ, गर्भगृह असे भाग आहेत. मंदिर उंच जागतीवर असुन त्यावर डायमंडच्या (हिरे) आकाराचे सुंदर नक्षीकाम व व्याल आहेत. मुखमंडपात कक्षासन दोन्ही बाजूला आहेत. स्तंभ अत्यंत कोरीव आहेत भिंतीत कणी,कुमुद, उपान आढळतात. गर्भगृहात छतावर, सभामंडपात फुलांची नक्षी आहे. सभामंडपा खाली गुढसभामंडप वा तळघर आहे. नक्षत्राकृति असलेल्या या मंदिराचा चौरसाकृति ताळखडा सोबत अर्ध स्तंभ आढळतात.
मंदिर पुर्वभिमुख ,देवतांचे पीठासीन पुर्व दिशेला आहे. कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे शिवयोगी सिध्दरामानी स्थापन केलेले भुकैलासातील अध्यात्मपीठ आहे असे मानतात.
Photo – Aashish Chawla
Varsha Mishra
खुप छान माहिती मिळाली आहे आणि अजुन सविस्तर माहिती मिळाली बर होईल