महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,985

मल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख

Views: 1363
4 Min Read

मल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख –

शिलाहार राजा हरिपालदेव याच्यानंतर सत्तेवर आलेल्या मल्लिकार्जुन याचे चिपळूण (शके १०७८) आणि वसई (शके १०८३) असे दोन शिलालेख उपलब्ध आहेत. हे दोन्ही शिलालेख गद्धेगाळ स्वरूपात आहेत.

मल्लिकार्जुन याचा शिलालेख असलेली गद्धेगाळ वसई येथे मिळालेली आहे. या शिलालेखाची पहिली नोंद बॉम्बे गॅझेटियरमध्ये (खंड १ – भाग २, पान क्र २०) करण्यात आलेली आहे. त्यानंतर डॉ. सांकलिया आणि एस. सी. उपाध्याय यांनी एपिग्राफिया इंडिकामध्ये (खंड २३, पान क्र २७४) ठस्याशिवाय या शिलालेखाचे संपादन केले. वा. वि. मिराशी यांनी १९७७ साली शिलाहारांवर लिहिलेल्या पुस्तकात या शिलालेखाचा ठसा दिलेला आहे. सद्यस्थितीत हा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आहे.

शिळा ४६.९९ सेंमी रुंद आणि १०३.९७ सेंमी उंच आहे. शीर्षभागात चंद्रसूर्य आहेत. चंद्रसूर्याच्या खाली असलेल्या चौकोनात दोन व्यक्ती आणि एक मोठे व एक लहान अशी दोन शिवलिंग दाखवली आहेत. मोठे शिवलिंग उंच साळुंखेवर स्थापन केले आहे. या दोन्ही व्यक्ती स्त्रिया असाव्यात असे त्यांच्या केसरचनेवरून वाटते. या दोन्ही स्त्रियांनी/व्यक्तींनी आपले हात शिवलिंगावर ठेवले आहेत.

लेखाची भाषा संस्कृत असून नागरी लिपीत कोरलेला आहे. लेख कोरणाऱ्या व्यक्तीने हा लेख अत्यंत निष्काळजीपणे कोरला आहे. तसेच लेख कोरताना दान दिलेल्या तिथीचा वार बुधवारऐवजी सोमवार कोरला आहे. कोरणाऱ्या व्यक्तीकडून ही चूक का झाली हे कळत नाही.

शिलालेखाचा ठसा

वाचन

सिद्ध | स्वस्ति | सकु संवत १०८३ (वृ)षसयसरान्तर्गत
पुष्ये मासि व दि १५ सोमदिने || सूर्ज पर्व्वणि
अद्येह समधिगताशेषपंचमहासब्द महासामंता
धिपतितगरपुरपरमेश्वर | श्रीसीलाहारनरेंद्र
इत्यादिसम(स्त)रा(जा)वलीविराजितश्रीमल्लिकार्जुनदेव
राज्ये | महासांधिविग्रहिकप्रभाकरनायको श्री
करणे प्रथमस्थपाटिमहाप्रधानश्रीअणतपैप्रभा द्विती
यस्थपाटिअमुक | सत्यपालतु काले प्रवर्तमाने सती
राजगुरुश्रीवे(द)सिव | भोप(क)व्यमसिव | विवेक (मूलो)
गुणपलवौघ: || संपतिसाप: स च कीर्तिपु(ष्प) स्त्रे(य:)फले
ज(या)चककल्प(वृक्ष:) श्रीभोपकव्यमसिवो विभाति || ताभ्यां च पु
रु(ष)भ्यां स जीर्नोधारो | कारित महदुगिव झासुत: | लाष
णवङ्गकेन (कृ)त: …. प्रसादेन | ता(भ्यं) गुरुकुले
(वा)पी च …. कटष(डी)विषयंत:पाती | पटालकस | लो
नवाटको | लाषण उवाझाय दत: | तथा धमादा(य:) तप: सौखा
(य) संप(प्र)दत | जश्च वुरुष: | एतत्पाल्यते वाप: तपि स धणं ल
(भ)ते ….न केनापि प्रति: विजानीथ | यस्तु परिपथी (भ)वत
तस्य माता गदभेन

भाषांतर

सिद्धी असो. वृष संवत्सर शके १०८३, सोमवार पौष वद्य अमावस्या या दिवशी सूर्यग्रहणानिमित्त, पंचमहाशब्द, महासामंताधिपती, तगरपूरपरमेश्वर इ. राजबिरुदे लावणाऱ्या शिलाहार राजा मल्लिकार्जुन याच्या कार्यकाळात, तसेच महासंधिविग्रहिक प्रभाकरनायक, मुख्य खजीनदार महाप्रधान अनंतपैप्रभू आणि दुय्यम खजिनदार अमुक, राजगुरु वेदशिव आणि भोपक व्योमशिव हे मंत्रिमंडळात कार्यरत असताना…यानंतर यानंतर भोपक व्योमशिव स्तुती केलेली आहे. हा भोपक याचना करणाऱ्यांसाठी कल्पवृक्ष आहे, त्या कल्पवृक्षाची पाने म्हणजे त्याचे सद्गुण, फांद्या म्हणजे संपत्ती, प्रसिद्धी म्हणजे फुले आणि अध्यात्मिकता म्हणजे झाडाला लागलेली फुले आणि तो कोणताही भेदभाव पाळत नाही अशा स्वरूपात भोपक व्योमशिव याची स्तुति केलेली आहे. या दोघांनी शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धाराचे काम महदुगिव झा याचा मुलगा लशण वंगक याने पूर्ण केले. तसेच या दोघांनी आपल्या गुरूच्या निवासस्थानाजवळ विहीर खणली. त्याचबरोबर लशण उपाध्याय याला कटषडी विषयातील पटालकस विभागातील लोणवाटक हे गाव दान करण्यात आले.

हे दान जो सांभाळून ठेवेल त्याला ऐश्वर्य प्राप्त होईल. कोणीही ह्या दानाला विरोध करू नये. या दानात जो अडथळा आणेल त्याच्या आईला गाढव……..

लेखात तगर, लोणवाटक, कटषडी व पटालकस या चार स्थानांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी लोणवाटक म्हणजे भिवंडी तालुक्यातील लोणाड हे गाव असावे. कटषडी व पटालकस या दोन गावांच्या बाबतीत ठोस माहिती उपलब्ध नाही आणि तगर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे सर्वमान्य आहे.

भोपक व्योमशिव, अनंतपैप्रभू व अमुक यांचे इतर शिलालेखातील उल्लेख

अपरादित्य दुसरा याच्या लोणाड (शके ११०६) व परळ (शके ११०८) या दोन शिलालेखात भोपक व्योमशिव याचा राजगुरु म्हणून उल्लेख आलेला आहे. तसेच मल्लिकार्जुनाच्या वसई शिलालेखाशिवाय महाप्रधान अनंतपैप्रभू व अमुक यांचा उल्लेख अपरादित्य दुसरा याच्या काळातील परळ शिलालेखात (शके ११०८) पण करण्यात आलेला आहे.

संदर्भ – Corpus Inscriptionum Indicarum, Volume VI, Inscriptions of the Shilaharas, 1977 (Editor: V. V. Mirashi)

© Pankaj Vijay Samel and ||महाराष्ट्र देशा||

Leave a Comment