मल्लिकार्जुन मंदिर, कर्जत, अहमदनगर –
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत हे एक तालुक्याचे ठिकाण. महाभारत काळा पासून तर अगदी मध्ययुगीन काळखंडापर्यंत अनेक आख्यायिका आपल्याला गावाबाबत ऐकायला मिळतात. गावात इतिहासाच्या पाऊलखुणा जागोजागी आढळतात. गावात ‘नकटीचे देऊळ‘ नावाने ओळखले जाणारे पुरातन शिवमंदिर असून, या मंदिराच्या जवळच मल्लिकार्जुन हे आणखी एक पुरातन महादेव मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे गावचे वैभव असून पुरातत्व विभागाने या मंदिरांना राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
गावाच्या पूर्वेला नकटीचे देऊळ या पुरातन शिवमंदिरा पासून अगदी काही अंतरावर विरुद्ध बाजुला मल्लिकार्जुन हे आणखी एक पुरातन शिवमंदिर आहे. मंदिर दक्षिणाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. मंदिरा समोर एक भग्न नंदी आहे. मंदिर अगदी साधे असून मंदिरात किंवा मंदिरावर कुठलेही शिल्पांकन दिसून येत नाही. सभामंडप चार स्तंभावर तोललेला आहे. सभामंडपात शिव पार्वती आलिंगन शिल्पं दिसून येते तर गर्भगृहात शिवलिंग स्थापित आहे.
एक चित्र पाहून मात्र मन अस्वस्थ झाले, इतकी सुंदर वास्तू या परिसरात आहे, मात्र स्थानिकांच्या दुर्लक्षित पणामुळे व शासनाच्या हलगर्जी पणामुळे आज या वास्तूची अतिशय वाईट अवस्था आहे. सध्या जुगार अन दारू पिणाऱ्यांसाठी ही जागा सोयीची झालेली आहे. मंदिर परिसरात गवत, कचरा व घाणीचे साम्राज्य आहे. स्थानिकांनी याकडे लक्ष देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपणे गरजेचे आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीने आपल्याकडे सुपूर्त केलेला हा वारसा आपलाच असून तो जपण्याची व पुढील पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे.
©️ रोहन गाडेकर