महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,924

माचनुर किल्ला | Manchor Fort

Views: 3838
4 Min Read

माचनुर किल्ला | Manchor Fort

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच माचनुर किल्ला (Manchor Fort) आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ इ.स.१६९४ ते १७०१ या काळात येथे होता. स्वत: औरंगजेब त्या काळात तेथे राहत असे. दक्षिणेतील राज्ये संपविण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यांनी त्रासला होता. मराठयांच्या अचानकपणे कोसळणाऱ्या टोळधाडीपासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने मूळ ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास हा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. या गावाचे नाव माचणूर पडण्याबाबत एक लोककथा सांगितली जाते.

औरंगजेबाने हा भुभाग जिंकल्यावर सिध्देश्वराचे मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने भयानक हल्ला चढविला व मंदिर उध्वस्त होण्यापासून वाचले. यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने शंकराचा अपमान करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले पण पिंडीपुढे नैवेद्य ठेवल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली. मांसाचा नूर पालटला त्यामुळे या ठिकाणाला मासनूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे मासनूरचे अपभ्रंशाने माचणूर झाले. या प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. गावातुन किल्ल्याकडे जाताना किल्ल्याचा बुरुज व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात.

माचणूर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळाची रचना दिसुन येते. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. गडाचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या दिसतात. उजव्या बाजुला तटाशेजारी पाण्यासाठी खोदलेला तलाव असुन त्यात खूप मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने नीट पहाता येत नाही. माचणूर किल्ला साडेतीन एकरात पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजघडीला बारा बुरूज दिसुन येतात. नदीच्या बाजूची किल्ल्याची तटबंदी पूरांमुळे पुर्ण कोसळली असुन या तटबंदीतील बुरुज नष्ट झालेले आहेत. उर्वरित तटबंदी १५-२० फुट उंच असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. काही ठिकाणी सिमेंटचा वापर करून पुरातत्त्व खात्याने तटबंदी दुरुस्त केल्याचे दिसते.

तटबंदीवर चढण्यासाठी सहा ठिकाणी पायऱ्या असुन किल्ल्याला आपण शिरलेल्या प्रवेशद्वाराशिवाय अजुन दोन प्रवेशद्वारे दिसुन येतात. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला एक पडकी मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदी शेजारी डाव्या बाजुला तटबंदीला लागुन एक कबर दिसते. या कबरीशेजारील भिंतीवर एक पर्शियन शिलालेख दिसतो. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. येथील कोसळलेल्या तटबंदीचे अवशेष व खाली उतरणाऱ्या काही पायऱ्या पहाता या भागात देखील नदीच्या दिशेने उतरणारा दरवाजा असावा. माचनूर किल्ल्याला दोन बाजुनी नदीच्या पात्राने वेढले आहे. भीमा नदी या किल्ल्याला वळसा मारूनच पुढे जाते. दोन बाजूंना नैसर्गिक संरक्षण असल्याने या किल्ल्याचे स्थान भौगोलिकदृष्ट्या उत्तम आहे. उर्वरीत किल्ल्यात रान माजले असुन गावकऱ्यांनी किल्ल्यात एकही अवशेष व त्याचा दगडदेखील शिल्लक ठेवला नाही.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment