मांढरदेवी मंदिर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मांढरदेव हे तिर्थक्षेत्र सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वाई व भोरपासून सुमारे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे. वाई कडून किंवा भोर कडून या तीर्थक्षेत्राकडे जातांना घाट चढून जावे लागते. काळूबाईचे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४७०० फूट उंचीवर आहे. मांढरदेवी येथील देवी माता पार्वतीचे रूप असुन काळेश्वरी या नावाने ओळखली जाते.
देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच अशा टेकडी वर मांढरदेवी काळुबाई चे मंदिर आहे . मंदिर लहान असुन सभामंडप व गाभारा आहे. कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदीर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा, अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. परिसर निसर्गरम्य असुन वनराई ने नटलेला आहे.
मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान (मुर्ती) असुन मुर्ती चत्रुभुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे.देवी उभी असुन एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपुर्ण मुर्तीस शेंदुर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व चेहर्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो. देवीचे वाहन सिंह आहे.
आख्यायिका – सतयुगात मांढव्य ऋषि गडावर यज्ञ करित होते. (या ऋषिंमुळे गडाला मांढरगड नाव पडले) त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिध्दिस जावे म्हणून मांढव्य ऋषिंनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरवात केली. तेव्हा महादेव प्रसन्न होवुन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरवात केली. तेव्हा पार्वतीने प्रसन्न होवुन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले. आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातुन या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते. तेव्हा देवीने रात्री चा वध करण्याचे ठरविले. पौष पोर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युध्दासाठी आवाहन केले आणि तुंबळ युध्द करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्धकार्य उरकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढुन वर आली आणि ऋषिंमुनी व भक्तजनांकरिता इथेच स्थानापन्न झाली.
देवीने पौष पोर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली. म्हणून आजही पौष पोर्णिमे ला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देव्हारे घेउन गडावर येतात. भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. पौष पोर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवुन हजारो वाद्यानच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. देवीचा छबिना हा यात्रोस्तवाचे मुख्य आकर्षण आहे.
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti