महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,631

मंगळवेढा किल्ला | Mangalwedha Fort

By Discover Maharashtra Views: 5226 11 Min Read

मंगळवेढा किल्ला | Mangalwedha Fort

भीमा नदीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा संतभूमी म्हणून ओळखली जाते. संत चोखामेळा, संत दामाजी आणि कान्हापोत्रा यांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव पावन झालेले आहे. सोलापूर-सांगली रस्त्यावर सोलापूर पासून ५० कि.मी.अंतरावर मंगळवेढा हे ठिकाण आहे. विजापूरजवळ असल्याने हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात महत्वाचे होते. आदिलशहाची राजधानी विजापूर व निजामशाहीची राजधानी नगर या दोन्ही शाह्यांच्या आपापसातील लढाईत मध्यभागी असलेले मंगळवेढा सतत बेचिराख झाले. मंगळवेढा गावात मंगळवेढा किल्ला (Mangalwedha Fort) किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले असुन कोरीव स्तंभ, भग्न मूर्ती, शिलालेख यांचे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले पाहण्यास मिळतात. किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी आता असलेल्या दरवाजासमोर काही अंतरावर एक सफेद रंगाची जुम्मा मशीद दिसुन येते.

मंगळवेढे गावापासून जवळच माचणूर याठिकाणी इ.स. १६९५ ते १७०२ औरंगजेबाचा मुक्काम असताना औरंगजेब मंगळवेढे येथील या जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असे. कै.रा.ग.करंदीकर यांच्या १९६०मध्ये छापलेल्या श्री.संत दामाजी महाराज यांचे चरित्र या पुस्तकात मंगळवेढा किल्ल्याचे वर्णन खालीलप्रमाणे आले आहे. औरंगजेबचा मुक्काम मंगळवेढ्यापासून नऊ मैलावर माचनुर येथे असता त्याच काळात मंगळवेढा कसब्याभोवती इ.स.१६९४ साली गावकूस Mangalwedha Fort बांधले गेले. त्याची एकंदर लांबी ६९३६ फूट व रूंदी ८ फूट होती. त्याच्या पुर्वेस बोराळे,नेऋत्येस सांगोला,व उत्तरेस कासेगाव अशा तीन वेशी होत्या. या वेशीमध्ये १२ फूट उंच व १४ फूट व्यासाचे चौदा बुरुज होते. १५ व्या शतकात मंगळवेढ्यात अनेत जैन मंदिर होती. ती मंदिरं उद्ध्वस्त करून त्याच्या अवशेषांचा वापर करून बिदरच्या मुसलमानी राज्यकर्त्यांनी सात बुरुजांचा आतील भुईकोट किल्ला इ.स. १४९३साली बांधला. त्याची लांबी उत्तर दक्षिण अंगास १२४५ फूट, पूर्व अंगास १२०० फूट व पश्चिम अंगास ९२० फूट आहे. तट १३ फूट रुंदीचा व ३५ फूट उंचीचा होता. त्यात असलेल्या सात बुरुजांची नावे अनुक्रमे मर्दान, करड, चौफाळा, जगभावी, गच्ची,कैकाड आणि बोराळ अशी होती.

यातील सर्वात मोठया मर्दान बुरुजाची उंची ५७ फूट व व्यास ५० फूट होता व तो लक्ष्मीनारायण देवळासमोर होता. किल्ल्याभॊवती खंदक ८२ फूट रुंद होता. पुर्वेस मुख्य वेस असून ती १४ फूट उंच व १२ फूट रूंद होती. इ.स. १७०० नंतर मोगल अंमल संपून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. छत्रपती शाहू महाराज यांनी राजे पांढरे यांना प्रमूख नेमले. इ.स. १७०८ ते १७४२ पर्यंत त्यांचा अंमल असताना त्यानी सध्या उभी असलेली चौबुर्जी इ.स. १७२० ते १७३० पर्यंत बांधली. ही चौबुर्जी मुख्य किल्ल्यातील आतील बालेकिल्ला आहे. तो चौकोनी असून प्रत्येक बाजूची लांबी २३० फूट आहे. भिंत १८ फूट उंच असून ८ फूट रूंद आहे. त्यास रणमंडळ रहाट, भूत व बडेखान असे चार बुरुज असून ते २५ फूट उंच व ३० फूट व्यासाचे आहेत. तटाचे रणमंडळ बुरुजावर तास वाजवित असत म्हणून त्या बुरुजास तास बुरुज असे म्हणू लागले.

सध्या करंदीकर वकील राहतात त्यांच्या घराजवळील हा रणमंडळ बुरुज होय. वरील वर्णन पहाता किल्ल्याला एकुण तिहेरी तटबंदी असल्याचे दिसुन येते. आता आपल्याला पहायला मिळणारी वास्तू म्हणजे मुख्य किल्ल्याच्या अंतर्गत असणारी किल्लेवजा गढी असुन त्याला चार मातीचे बुरुज आहेत. किल्ल्याचे क्षेत्रफळ एक एकर असुन सध्या किल्ल्यात तलाठी कचेरी, पोलीस चौकी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे.किल्ल्यात असणाऱ्या कार्यालयामुळे किल्ल्याचे दोन भाग पडले असुन किल्ला पहाण्यासाठी दोन वेगवेगळ्या वाटांनी आत जावे लागते. आपण आत शिरतो तो किल्ल्याचा दरवाजा अलीकडच्या काळात बांधलेला असुन किल्ल्याचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे जो दगडांनी चिणून बंद केला आहे. तटबंदी व बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजूने दोन ठिकाणी पायऱ्या आहेत. किल्ल्याचा तट आजही मजबूत असुन त्याचे दुमजली बुरुज मात्र ढासळत चालले आहेत. यातील पुर्व बाजुंच्या बुरुजाचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना कधीकाळी पाकळ्यांचा आकार असल्याचे दिसुन येते. किल्ल्याच्या भोवती असणारा खंदक पुर्णपणे नष्ट झालेला आहे. Mangalwedha Fort किल्ल्याच्या आत मोकळ्या जागेत काही जैन देवतांच्या मूर्ती आणि एक विश्वेश्वराचा मुखवटा नजरेस पडतो तसेच तटबंदीच्या एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती,सप्तमातृका व गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. किल्ल्यात असणाऱ्या कार्यालयांमुळे आत मुक्तपणे फिरता येत नाही.

मंगळवेढे शहरातील सर्वात प्राचीन वास्तू म्हणजे किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले काशीविश्वेश्वराचे मंदीर. कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी असता त्यांनी या मंदिराची निर्मिती आठव्या शतकात केली. होती. ते स्वत:ला ब्रम्हाचे वंशज मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ बांधले असावे. मंदिरातील शिलालेखात १५७२ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. यादवोत्तर काळात मोडकळीस आलेले हे मंदीर पुढे विजापूरच्या गादीवर अली अदिलशाह असताना हिप्परगीचे श्री. बाहयानी धनाजी कुलकर्णी यांनी इ.स.१५७२ साली मंदीराचा जिर्णोध्दार केला. याची हकीकत रंगशिळेच्या डावीकडील खांबावर पाच भागात कोरली आहे. मुळ लेख ६० ओळीचा असून शालीवाहन १० वे शतकात या मंदीराचे जिर्णोध्दार, भारद्वाज गोत्रातील धनाजी हिप्परगी यांनी केला असा शिलालेखात उल्लेख आहे. मंदीरावर देव देवतांचे शिल्पे कोरलेली आहेत. मंदीराजवळील विहीर त्याचवेळी बांधली असावी. काही पायऱ्या उतरल्यावर विहीरीत दिसणारी ब्रम्हदेवाची मुर्ती हि पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मूर्तीनंतर भारतातील दुसरी ब्रम्हदेवाची मूर्ती आहे. हि मूर्ती सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद काळ्या पाषाणात कोरलेली आहे. याशिवाय तीर्थकर, महिषासूरमर्दिनी यांच्या जीर्ण झालेल्या मूर्ती तेथे आढळतात.

ब्रह्मदेवाच्या मुर्तीशेजारी एक भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग मंगळवेढ्याच्या पश्चिमेस कृष्ण तलावाच्या मध्यभागी असलेल्या गोपाळ कृष्णाच्या मंदीरापर्यंत आहे असे सांगितले जाते. गावातील कॉलेजजवळ प्राचीन मंदिराचे कोरीव दगड,खांब, वीरगळ पाहायला मिळतात. संपुर्ण मंगळवेढा फिरण्यास दोन ते अडीच तास लागतात. मंगळवेढा गावाची ऐतिहासिक परंपरा फार मोठी आहे. मंगळवेढा प्राचीनकाळी मंगलवेष्टक, महामंडलेश्वर अशा नावांनी प्रसिद्ध होते. पूर्वीच्या शिलालेखावरून मंगळवेढ्याचा इतिहास इ.स. ४-५ व्या शतकापर्यंत जातो. एक हजार वर्षांपूर्वी हे गांव राजधानी असून त्यावर कल्याणीचे चालुक्य घराण्यातील सम्राटांचा अंमल होता. इ.स. १०६० ते ११२१ पर्यंत या गांवी राष्ट्रकुटांचे उत्तराधिकारी कलचुरी घराण्याचे राज्य होते व मंगळवेढा राजधानी होती. वीरशैव पंथाचे संस्थापक श्री बसवेश्वर हे कलचुरी राज्याचे मुख्य प्रधान होते. म्हसवड, तेर, अक्कलकोट येथील शिलालेखांतून कलचुरी राजसत्तेत महामंडलेश्वर राजधानी असल्याचे उल्लेख आहेत.

देवगिरीचे यादव वंशातील राजा भिल्लम याने मंगळवेढे येथील कलचुरी घराण्याचा शेवटचा राजा बिल्हण याचा इ.स.११९१ मध्ये पराभव केला.देवगीरीच्या यादव घराण्याचा बहामनी सुलतानाने पराभव केल्यावर मंगळवेढे बहामनी राज्यात सामील झाले. बहामनी राज्याचे वेळीच इ.स. १४५८ मध्ये दामाजीपंत मंगळवेढ्यात महसूल अधिकारी असताना प्रचंड दुष्काळ पडला अशा वेळी दामाजीपंतांनी सरकारी धान्य कोठारं जनतेसाठी खुली केली. त्याकरीता बादशहाने त्यांना कैद केले असता दुसऱ्या दिवशी साक्षात पांडुरंग विठु महाराचे रुप घेऊन दरबारी गेले आणि दान दिलेल्या धान्याइतकी रक्कम अदा करून दामाजीपंतांची सुटका केली. नंतर मोगल सरदार बहादूर जिलाणी याने मंगळवेढे व आसपासचा मुलूख जिंकल्याने इ.स. १४६५ ते १४७५ पर्यंत मंगळवेढे दिल्लीचे मुघल अंमलाखाली होते. इ.स. १४९३ मध्ये मंगळवेढे येथे भुईकोट किल्ला बांधला गेला व हे एक प्रमुख व मजबूत लष्करी ठाणे म्हणून प्रसिध्द झाले. ता. ५/११/१४९४ रोजी बिदरचा बादशहा महबूबशा यांने स्वारी करून बहादूर जिलाणीचा पराभव केला व त्यास ठार मारून मंगळवेढे आपल्या ताब्यात घेतले.

अकबराचा सरदार मीर जयाउद्दीन मुस्ताफाखान मंगळवेढ्यास इ.स. १६०३ मध्ये रहात होता. इ.स.१६६५ साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत आदिलशाही विरुध्द मोहिम काढली. फलटण, नाथवडा असा आदिलशाही मुलूख जिंकून मुघल सैन्याबरोबर शिवाजीराजे १९ डिसेंबरला मंगळवेढा किल्ल्याजवळ पोहोचले. त्यावेळी विजापूरचा सरदार सर्जाखान व नेताजी पालकर यांची या किल्ल्याकरिता लढाई झाली व नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला. २० डिसेंबर १६६५ रोजी मिर्झाराजे शिवाजीराजे यांनी मंगळवेढा किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली आणि तळावर परतले. मिर्झाराजेंनी मुघलांतर्फे सरफराज खान यास किल्लेदार म्हणून नेमले. हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झाराजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली होती. २४ डिसेंबर १६६५ रोजी शिवाजीराजे यांची फौज विजापुरी फौजांवर चालून गेली. उभय सैन्यात युध्द झाले पण ते निर्णायकी नव्हते.

विजापुरी सेनापती सर्जाखान याने थेट मंगळवेढा किल्ल्यावर हल्ला करून किल्लेदार सरफराज खान याच्यासह त्याच्या पुत्रास व जावयास ठार मारले. या मोहिमेचा शेवट होण्यापूर्वीच शिवाजीराजांनी ११ जानेवारी १६६६रोजी मिर्झाराजांच्या परवानगीने पन्हाळ्याकडे कूच केले. यावरून १९ डिसेंबर १६६५ ते ११ जानेवारी १६६६ या काळात शिवाजीराजे मंगळवेढा परीसरात होते. इ.स.१६६६ साली मंगळवेढे किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. इ.स. १६८६ साली मोगलांनी आदिलशाही नष्ट केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ते मराठयांच्या ताब्यात आले. छत्रपती शाहू महाराज यांनी नेमलेल्या राजे पांढरे यांचा इ.स.१७०८ ते १७४२पर्यंत मंगळवेढ्यावर अंमल होता. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाल्यावर मंगळवेढा किल्ल्याचे महत्व कमी झाले. इ.स.१७४२ ते १७५० पर्यंत येथे पंतप्रतिनिधीचा अंमल असून यमाजी शिवदेव हे येथे सरदार होते. नंतर गोविंद हरी पटवर्धन यांच्या सरंजामांत हा किल्ला इ.स. १७५१ साली दिला गेला.

पटवर्धनाचे मिरज व मंगळवेढे हे दोन महत्त्वाचे किल्ले होते. इ.स.१७६३ मध्ये निजाम पंढरपूर लुटण्यास आला असता मंगळवेढे येथील पटवर्धनांनी निजामास परत जाण्यास भाग पाडले. इ.स. १८०८ पर्यंत मंगळवेढे हे पटवर्धन घराण्याकडे होते. इ.स. १८०८ मध्ये पटवर्धन घराण्याच्या वाटण्या होऊन मंगळवेढे तालूका चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर पटवर्धन यांचे वाटणीस गेला. १८१८ मध्ये मंगळवेढयाहून तीस मैलावर असलेल्या अष्टी गावी मराठा व इंग्रज यांची शेवटची लढाई होऊन यात पेशव्याचे सेनापती बापू गोखले हे धारातिर्थी पडले व मराठा साम्राज्य लयास गेले. चिंतामणराव आप्पासाहेब नंतर श्रीमंत धुंडीराज तात्यासाहेब हे सांगली संस्थानाचे अधिपती झाले. त्यांचे कारकार्दीत सांगली संस्थानाचा कारभार काही वर्षे ब्रिटीश सरकारखाली होता. इ.स. १८७६ पर्यंत हा किल्ला मजबूत व शिल्लक होता. सांगली संस्थानात ब्रिटीश मुखत्यारी आली असता कॅप्टन वेस्ट यांनी किल्ल्याचे दरवाजे तर मेजर वॉलर याने तट पाडला. तटाची माती व दगड लोकांनी नेली व खंदकही बुजवला गेला. काही बुरुज पडले काही बुरुज मुद्दाम पाडले गेले.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment