महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,212

मांगी तुंगी | दक्षिणेचे संमेदशिखर

By Discover Maharashtra Views: 2743 4 Min Read

दक्षिणेचे संमेदशिखर – मांगी तुंगी…

जैन स्थापत्य अथवा जैन मूर्ती महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. अगदी वेरुळच्या ठिकाणी सुद्धा सुंदर जैन लेणी पाहायला मिळतात. परंतु उंच डोंगरावर वसलेली आणि अत्यंत सुंदर अशी जैन लेणी पहायची असतील तर नाशिक जिल्ह्यातील सेलबारी रांगांकडे जावे लागे. साल्हेरसालोटा हे देखणे दुर्ग याच सेलबारी-डोलबारी रांगेमध्ये वसले आहेत. आणि त्यांच्याच समोर आहेत हे मांगी तुंगीचे जुळे डोंगर. लांबून पाहताना सुद्धा हे अत्यंत आकर्षक असे दोन सुळके दिसतात. या मांगी तुंगीच्या जुळ्या डोंगरामध्ये जैन लेणी खोदलेली आहेत. मध्ययुगीन जैन स्थापत्याचा हा एक अजोड नमुना म्हणावा लागेल. सटाणा तालुक्याच्या पश्चिम सीमेवर लागून असलेला हा परिसर आहे. नाशिक-सटाणा-ताहराबाद मार्गे हे अंतर होते १२३ कि.मी.

समुद्रसपाटीपासून १३२६ मीटरवर असलेली ही दोन्ही शिखरे एका अरुंद नैसर्गिक धारेने जोडलेली आहेत. दोन्ही शिखरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे अगदी लांबूनसुद्धा ओळखता येतात. पायथ्यापासून इथे जाण्यासाठी अंदाजे ३००० पायऱ्या चढून जावे लागते. कमी उंचीच्या आणि टप्प्याटप्प्यावर विश्रांतीची सोय असलेल्या या पायऱ्या चढणे तुलनेने खूपच सोपे आहे. ज्या भक्तांना हे चालणे जमत नाही त्यांच्यासाठी इथे काही पैसे भरून डोलीची व्यवस्था केली जाते. पायथ्याशी मांगी-तुंगी देवस्थान असून तिथे राहण्याची सोय सुद्धा सुंदर केलेली आहे. इथली लेणी आणि त्यातील जैन शिल्पे इ.स.च्या ९ व्या शतकापासून ते इ.स.च्या १५ व्या शतकापर्यंत कोरली जात होती. मांगी या शिखराच्या दक्षिण बाजूच्या कातळावर जवळजवळ ८० जैन प्रतिमा कोरलेल्या दिसतात. दोन्ही सुळक्यांना जोडणाऱ्या एका अरुंद वाटेने आपण तुंगी या सुळक्याकडे गेलो की तिथे दोन गुहा असून त्या सुळक्यावर ८ प्रतिमा कोरलेल्या आहेत. मांगी सुळक्याच्या खालच्या अंगाला असलेल्या गुहेला स्थानिक भाषेमध्ये श्री शुद्धबुद्धमुनिराज गुहा असे म्हटले जाते.. इथे एक छोटीशी मार्गिका आणि एक लहान सभागृह एवढेच कोरलेले दिसते. या गुहांमध्ये अनेक जैन प्रतिमांची अगदी रेलचेल आढळते. गुहेच्या भिंतींवर तीर्थंकर, सर्वानुभूती-अंबिका या यक्ष-यक्षी, चक्रेश्वरी, ऋषभनाथ आणि सरस्वती या सर्व प्रतिमा अंकित केलेल्या दिसतात.

या गुहा मागे टाकून पुढे गेले की तिथे नव्याने केलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने आपल्याला त्या सुळक्याच्या शिखरावर पोहोचता येते. हा मार्ग काहीसा खडतर आणि खूप चढाईचा आहे परंतु त्यावरून वर गेल्यावर डोळ्याचे पारणे फिटते. मांगी सुळक्यावरील दोन गुहा तर निसर्गनिर्मित असून त्यामध्ये काही डागडुजी केलेली दिसते. या गुहांना सध्या महावीर गुफा, शांतीनाथ गुफा, श्री आदिनाथ गुफा, पार्श्वनाथ गुफा, आणि बलभद्रस्वामी गुफा अशा नावांनी ओळखल्या जातात. गुहेमधील प्रतिमा तसेच गुहेच्या बाहेरील खडकाच्या पृष्ठभागावरील प्रतिमा म्हणजे जैन ऋषी आणि भक्तांच्या रांगाच्या रांगाच दिसतात. खडकाच्या पृष्ठभागावरील प्रतिमा पाहण्यासाठी तिथे उपलब्ध असलेल्या एका अरुंद अशा मार्गाचाच अवलंब करावा लागतो. सध्या या मार्गाच्या बाजूला संरक्षक कठडे बसवलेले आहेत. दोन्ही सुळक्यांवरील जवळजवळ सर्व गुहा आणि त्यांच्या बाह्यांगावर कोरलेल्या प्रतिमा या उत्तराभिमुख अथवा पूर्वाभिमुख कोरलेल्या दिसतात. सह्याद्रीच्या अजस्त्र रांगा आणि मोसम व पांजरा नद्या आणि त्यांच्यामुळे सुपीक झालेली जमीन या डोंगरावरून पाहताना भान हरपून जाते.

मांगी-तुंगी डोंगर हे इ.स.च्या १२ व्या शतकापासून एक महत्वाचे आणि अत्यंत लोकप्रिय असे दिगंबर जैन तीर्थ आहे. या ठिकाणाला सिद्धक्षेत्र असे म्हटले जाते आणि या ठिकाणाबाबतची दंतकथा अशी की या ठिकाणी जवळजवळ ९९ कोटी जैन मुनींना निर्वाण अवस्था प्राप्त झाली. या ठिकाणाचे उल्लेख अनेक मराठी आणि संस्कृत साहित्यामध्ये आलेले आढळतात. भारतातील गिरनार, शत्रुंजय, पावापुरी या जैन तीर्थक्षेत्रांसोबतच या ठिकाणाला सुद्धा अनेक यात्रेकरूंनी भेट दिलेली आहे. पायथ्याशी दोन जैन मंदिरे आणि एक मानस्तंभ पाहायला मिळतो. तसेच मांगी आणि तुंगी या दोन सुळक्यांना जोडणाऱ्या अरुंद भागावर दोन नवीन इमारतींची उभारणी केलेली आढळते. शेजारीच एक छोटे कुंड असून त्याला कृष्ण कुंड असे म्हणतात. प्रचलित दंतकथेनुसार इथेच भगवान श्रीकृष्णाचे दहन त्याचा भाऊ बलरामाने केल्याचे समजले जाते. बिहारमधील प्रसिद्ध आणि पवित्र अशा संमेद शिखरावरून मांगी-तुंगी या स्थानाला दक्षिणेचे संमेद शिखर असे नाव जैन मंडळींनी दिलेले आहे. सटाणा इथे मुक्काम करून यासोबत आजूबाजूचा बराच परिसर आवर्जून बघण्यासारखा आहे.

-आशुतोष बापट

Leave a Comment