महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,211

छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे

By Discover Maharashtra Views: 1558 8 Min Read

|| छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे ||

ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी ‘महाराजांनी शिरी छत्र धरले राजे चक्रवर्ती सम्राट झाले मराठा राजा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य नाही जाहली…’ राजाभिषेकानंतर ३ दिवसात म्हणजे …, ‘ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस’ श्री शिवछत्रपति महाराजांनी ३ जाहीरनामे प्रसिद्द केले. तर चौथा जाहिरनामा राजाभिषेकानंतर १५ दिवसात म्हणजे ‘ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस’ घोषीत झाला. हे सर्व जाहीरनामे ‘कानून जाबता’ म्हणुन ओळखले जातात…(छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे)

थोडक्यात राजाभिषेकानंतर दोन आठवडयामध्ये राज्यव्यवहार पद्धती कशी असेल ते छत्रपति शिवरायांनी पूर्णपणे स्पष्ट केले होते… अर्थात आधी सुद्धा हीच राज्यव्यवहार पद्धत अमलात असली पाहिजे.. राजाभिषेक हे जाहीर करायला एक निमित्त ठरले असावे..

|| जाहीर झालेले ४ “कानून जाबते” खालीलप्रमाणे ||

१) जाबता चिटणीसी लिहीण्याचा – एकूण कलमे १२

२) जाबता लष्कर सरनौबत – एकूण कलमे ८

३) जाबता कारखानीशी आणि सबनीशी लिहीण्याचा – एकूण कलमे २२ (कारखानीशी १४ आणि सबनीशी ८ कलमे)

४) प्रधानमंडळ – एकूण कलमे २०

आपण ‘प्रधानमंडळ’ ह्या जाबत्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

“छत्रपति शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ” व त्यांची कार्ये व जबाबदाऱ्या थोडक्यात खालीलप्रमाणे होते ||

१) मोरोपंत पिंगळे (पंतप्रधान / पेशवा) : सर्व राजकार्य, राजपत्रावर शिक्का, ताब्यात असलेल्या प्रदेशचे रक्षण व व्यवस्था, युद्ध.

२) रामचंद्र निळकंठ (अमात्य / मुजुमदार) : जमाखर्च, दप्तरदार व फडणीस यांवर देखरेख, खात्याशी संबंधित असलेल्या कागदांवर शिक्का, युद्ध.

३) अण्णाजी दत्तो (सचिव / सुरनीस) : राजकार्यविषयक सर्व जबाबदारी, युद्ध.

४) रामचंद्र त्रिंबक (सुमंत / डबीर) : परराज्यविषयक कार्याचा विचार, युद्ध.

५) हंबीरराव मोहिते (सेनापती / सरनौबत) : सैन्यविषयक जबाबदारी, युद्ध.

६) दत्ताजी त्रिंबक (मंत्री / वाकनीस) : अंतर्गत राजकारणाचा विचार, हेर खाते, युद्ध.

७) रघुनाथराव (पंडितराव) : धर्मा-धर्म विचार.

८) रावजी निराजी (न्यायाधीश) : तंटे, न्याय-निवाडा.

|| कानून जाबता ||

“प्रधान मंडळ”

क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपति राजाभिषेक शके १, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ वद्य त्रयोदशी, भोमवासर

१. मुख्य प्रधान यांणी सर्व राजकार्य करावे; राजपत्रावरी शिक्का करावा; सेना घेउन युद्धप्रसंग स्वारी करावी, तालुका ताबिनात स्वाधीन होइल त्यास रक्षून बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावें व सर्व सरदार, सेना यांजबरोबर जावें आणि सर्वसंमत चालावें.

येणेप्रमाणे कलम १.

२. अमात्य यांणी सर्व राज्यांतील जमाखर्च चौकशी करून दप्तरदार, फडणीस यांचे स्वाधीन असावें; लिहिनें चौकशीनें आकारावें; फडणीशी, चिटणीशी पत्रांवर चिन्ह संमत करावे युद्धप्रसंग करावें.. तालुका जतन करून आज्ञेतं चालावें…

येणेप्रमाणे कलम १.

३. सचिव यांणी राजपत्र शोध करून अधिक-उणे मजकूर शुद्ध करावी. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होइल तो रक्षून आज्ञेतं वर्तावें. राजपत्रावर चिन्ह संमत करावें.

येणेप्रमाणे कलम १.

४. मंत्री यांणी सर्व मंत्रविचार राजकारण यांतील सावधतेनें आमंत्रण, निमंत्रण, वाकनिशी यांचे स्वाधीन. तालुका जतन करून युद्धादि प्रसंग करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.

येणेप्रमाणे कलम १.

५. सेनापती यांणी सैन्य रक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होइल तो रक्षून हिशोब रुजू करून आज्ञेतं वर्तावें व फौजेचे लोकांचे बोलणे बोलावें. सर्व फौजेचे सरदार यांणी त्याजबरोबर चालावें.

येणेप्रमाणे कलम १.

६. पंडितराव यांणी सर्व धर्माधिकार, धर्म, अधर्म पाहून विचिक्षा करावीं. शिश्टांचे सत्कार करावे. आचार, व्यवहार, प्रायश्चितपत्र होतील त्यावर संमत चिन्ह करावें. दान-प्रसंग, शांती अनुष्ठान तत्काळी करावें.

येणेप्रमाणे कलम १.

७. न्यायाधीश यांणी सर्व राज्यातील न्याय-अन्याय मनास आणून बहुत धर्में करून न्याय करावें. न्यायाची निवडपत्रे यांजवर संमत चिन्ह करावें.

येणेप्रमाणे कलम १.

८. सुमंत यांणी परराज्यातील विचार करावा. ज्यांचे वकील येतील त्यांचे सत्कार करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.

येणेप्रमाणे कलम १.

९. चिटणीस यांणी सर्व राज्यातील राजपत्रे ल्याहावीं. राजकारण-पत्रें, उत्तरें ल्याहावीं. सनदी , दान पत्रें वगैरे महालीं, हुकुमी यांचा जाबता, फडणीशी, चिटणीशी अलाहिदा त्याप्रमाणें ल्याहावें. हातरोखा, नाजुक पत्रें, यांजवर मोर्तब अथवा ख़ास दस्तक. मात्र वरकड़चा दाखला, चिन्ह नाहीं, चिटणीसांनीच करावें.

येणेप्रमाणे कलम १.

१०. फौजेचे सबनीस, बक्शी यांणी सर्व फौजेची हाजरी चौकसी करावी. यादी करून समजावावें. रोज्मरा वाटणें, सत्कार करावा. युद्धादि प्रसंग करावा.

येणेप्रमाणे कलम १.

११. सेनाधुरंधर यांणी बिनी करावी. आघाडीस जावें, उतरावें. फडफर्मास जमा करावीं. लुट करणें मना करणें. चोकसी-ताकीद यांजकडे, पुढे असोन सेना रक्षण करावी.

येणेप्रमाणे कलम १.

१२. किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें.

येणेप्रमाणे कलम १.

१३. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिलें. त्यांणी सेवा व्यापार चालवावा. हुजुर रहावें.

येणेप्रमाणे कलम १.

१४. सुभे, मामले, तालुकादार यांस ज्याच्याकडे जें नेमलें त्यांणी जाबतेप्रमाणें चालवावे. हुजुरचे दरखदार, चिटणीस, फडणीस, मुजुमदार यांचे इतल्याने चालून हिशोब गुजरावें.

येणेप्रमाणे कलम १.

१५. बारा महालांचे अधिकारी यांणी आपलाले काम दुरुस्त राखुनु हिसेब आकारून दप्तरांत गुजरावें.

येणेप्रमाणे कलम १.

१६. दरुणी महालांचे काम दिवाण नेमून दिल्हे यांणी सर्व पाहून करावें. चिटणीस, फडणीस यांणी आपलाले दरखाचे कागदपत्रल्याहावें. त्यावर निशान, चिन्ह दिवाणानी करून वाडयास समजाउन मोर्तब साक्ष करावें.

येणेप्रमाणे कलम १.

१७. पोतनीस यांणी पोत जमाखर्च लिहिणे करावें. नजर पेश कशी जमा करावी. पोतदार यांनी पारख करावी.

येणेप्रमाणे कलम १.

१८. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जावयास दखरदार सर्व हुजुरचे जावे. त्याचे दाखल्यानी व्यवहार करावा. स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिल्हे त्यांणी सेवा-व्यापार चालवावा. हुजुर रहावें.

येणेप्रमाणे कलम १.

१९. आबदारखाना चिटणीस याजकडे सराफखानासुधा अधिकार सांगितला. मजालसी, अत्तर-गुलाब, व हार-तुरे व फळफळावळ खुशवाई खरी जमाखर्च यांणी करून हिशेब दप्तरी गुजरावा.

येणेप्रमाणे कलम १.

२०. पागा जुमलेदार यांणी कैद करून दिल्ही त्याप्रमाणें चालून सेनापती व प्रधान यांच्या समागमें कामकाजें करावीं.

येणेप्रमाणे कलम १.

येकूण कलमें वीस मोर्तब….

आपण बघू शकतो की पहिली ८ कलमे अष्टप्रधान यांच्या कामाबद्दल निगडित आहेत. ८ पैकी ६ प्रधानांना युद्ध – युद्धादि प्रसंगाला गरजेनुसार जाणे हे त्याच्या पदाच्या जबाबदारीमध्ये समाविष्ट होते. त्यातून फ़क्त पंडितराव आणि न्यायाधीश यांना वगळण्यात आले होते. ९ वे कलम पूर्णपणे ‘चिटणीशी’बद्दल आहे…

चिटणीस म्हणजे आजचा ‘कैबिनेट सेक्रेटरी’..

हे महत्वाचे पद राजाभिषेकानंतर ‘बाळाजी आवजी’ यांच्याकडे सोपवले गेले होते. फौजेचे इतर अधिकारी आणि बारा महालाचे अधिकारी यांनी करावयाची कामे सुद्धा पूर्णपणे स्पष्ट केली गेली होती हे सुद्धा इतर कलमांवरुन समजते…

यात १२ वे कलम सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. ‘हुजुरात’ म्हणजे खुद्द छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत येणारया खात्याचे उल्लेख ह्यात केले गेले आहेत. किले-कोट, ठाणे आणि जंजिरे याबद्दल अगदी सक्तीचे सुक्ष्म नियम त्यांनी बनवले होते. ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता…. त्यांची राज्यपद्धती अशी होती की संपूर्ण राज्यकारभार अष्टप्रधान मंडळावर सोपवून तो चोख चालेल याची पूर्ण काळजी घेतली गेली होती…

राज्यकारभारात प्रत्यक्ष ढवळा-ढवळ न करता राज्य कारभाराविषयी दैनंदिन माहिती मिळत जावी यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील माणसे जागोजागी स्वतंत्रपणे नेमली होती… जेणेकरून प्रत्येक खात्यावर त्या खात्याच्या प्रमुखा बरोबरच त्यांचेसुद्धा अप्रत्यक्ष आणि पूर्ण नियंत्रण राहील…

माहिती- सह्याद्री प्रतिष्ठान अँप्लिकेशन

फोटोग्राफर- अतुल अनंत मोरे

Leave a Comment