महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,84,909

माणिकडोह, जुन्नर येथील दुर्लक्षीत लेण्या

By Discover Maharashtra Views: 157 3 Min Read

माणिकडोह (जुन्नर) येथील दुर्लक्षीत लेण्या –

जुन्नर शहराच्या पश्चिमेला ७ कि.मी अंतरावर डोंगराळ भागात वसलेले छोटेसे गाव म्हणजे माणिकडोह होय. पुर्वी जुन्नर नाणेघाट या व्यापारी मार्गावर हे गाव वसलेले होते. परंतु बदलत्या काळात या मार्गावर माणिकडोह धरण बांधण्यात आले व या मार्गावरील इतिहासाच्या पाऊलखुणा या धरणात बुडवून गेल्या तर काही दुर्लक्षित होत गेल्या. आज पण येथील स्थानिक लोक माणिकडोह गावचा इतिहास मोठ्या गमतीशीरपणे सांगतात की श्री. शिवछत्रपतींच्या दुसर्‍या सुरतेच्या लुटीतील लुटलेले मानिकरत्न कुकडी नदीच्या डोहात बुडावले गेले ते येथेच व याच डोहात माणिकरत्न लपून ठेवले त्यामुळे या डोहाचे नाव माणिकडोह पडले व पुढे गावास पण याच नावाने संबोधले गेले. येथे येथेच कुकडी माईच्या पात्रातील खडकात जवळपास पाऊण कि.मी एक नैसर्गिक नहर तयार झालेली पहायला मिळते की जो एक भौगोलिक चमत्कार मानला जातो. ही नहर जवळपास ४० ते ५० फुट खोल असून याच नहरीच्या सुरूवातीला एक ऐतिहासिक बांधलेला यशवंत घाट आज ऐतिहासिक वारसेची साक्ष देत उभा आहे. गावातील विविध ठिकाणी असलेली दगडी शिल्प आपणास गावचा पुरातन इतिहासाची ओळख करून देतात.

गावाच्या दक्षिणेस जवळच अर्ध्या कि.मी अंतरावर पुर्व, पश्चिम डोंगररांग पसरलेली पहायला मिळते. ही डोंगर रांग पुर्वेकडे तुळजाभवानी लेणी समुहापाशी संपते. तर पश्चिमेस गेलेल्या रांगेत लेणींचादरा म्हणुन नाव असलेल्या ठिकाणी आपणास एक अतिशय दुर्लक्षीत असलेला लेणी समूह निदर्शनास पडतो. ज्या ठिकाणी सध्या खडी क्रेशर जे माणिकडोह धरणाच्या भिंतीच्या रेषेत दक्षिणेस दिसून येते त्याच ठिकाणी डोंगराच्या मधभागी वाटीच्या आकारातील कातळात या लेणी कोरलेली दिसून येतात. ही लेणी कोरण्या आधी येथे प्रथमतः पाण्याची दोन टाकी खोदण्यात आल्याचे लक्षात येते. येथील डोंगररांगावर त्याकाळी येथे सहज कंदमुळे उपलब्ध होत असे परंतु पाण्यासाठी मात्र माणिकडोह गावाकडे धाव घ्यावी लागत असेल कारण मानवाच्या दोन मुख्य गरजा म्हणजे अन्न आणि पाणी होय. त्यामुळेच प्रथम येथे टाकी कोरली गेली असावित.
येथील कातळाचा अभ्यास करता या लेणी कोरताना कच्च्या स्वरूपात आढळुन येतात व त्या त्या ठिकाणी काम अर्धवट सोडलेल्या खुणा आढळतात.
या लेणीमधून समोरील दृश्य मनाला भुरळ घालणारे असून, माणिकडोह धरण, किल्ले हडसर, हटकेश्वर डोंगररांग व यामधील येणारा सपाट भुभाग न्याहाळता येतो. त्यामुळे येथे लेणी कोरण्या पाठीमागचा उद्देश देखरेख संरक्षण म्हणून असावा असे वाटते.

येथील सुंदरतेला चार चांद पावसाळ्यात लागलेले दिसतात. दोन्ही बाजूने कड्यावरून घरंगळत येणारे दोन धबधबे लेणी संपताच एकमेकांना अलिंगण देऊन या लेणी समूहाला आपल्या मिठित घेतल्याचे सुंदर दृष्य पाहून मन भारावून जाते.कधी माणिकडोह धरण दर्शन तेजूर गावाकडून घेण्याची इच्छा झालीच तर या लेण्यांना पाहून नेत्रसुख नक्कीच घ्या.
कधी वेळ मिळालाच तर या अपरिचित लेण्यांना व गावास एकदा जरूर भेट द्या व ऐतिहासिक ठेवा पाहण्याचे भाग्यवंत व्हा. पावसाळ्यात तर अक्षरशः येथे स्वर्गच अवतरलाय की काय एवढं विलोभनीय दृश्य आपणास पहावयास मिळते व अक्षरशः हा परीसर पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

लेख /छायाचित्र श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)

Leave a comment