माणिकदुर्ग
चिपळूण तालुक्यातील मांडकी गावात असलेला माणिकदुर्ग उर्फ मांडकीदुर्ग किल्ला मुंबई-गोवा महामार्गापासून ८ कि.मी.अंतरावर तर सावर्डे रेल्वे स्टेशन पासून ५ कि.मी. अंतरावर आहे. विजयनगरचे साम्राज्य लयाला गेल्यावर कोकणपट्टीचा हा भाग आदिलशहाच्या ताब्यात आला व त्याने या भागातील काही किल्ल्यांचे अस्तित्वच नष्ट केले व हे किल्ले विस्मृतीत गेले. पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा किल्ला लोकांसमोर आला. आजही स्थानिक लोकांना व या भागातील लोकांना हा किल्ला माहित नाही त्यामुळे पुरेशी माहिती घेऊनच किल्ल्यावर जाण्याचे नियोजन करावे.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या महादगे वाडीत हा किल्ला दुर्गेचा डोंगर म्हणुन ओळखला जातो त्यामुळे त्यांना किल्ल्याबद्दल विचारणा करताना दुर्गेचा डोंगर म्हणूनच विचारणा करावी. सावर्डे फाट्यावरून राज्य महामार्ग क्रमांक १०५ आबलोली मार्गे तवसाळ येथे जातो. या रस्त्यावर सावर्डे फाट्यापासून ४ कि.मी. अंतरावर एक लहानसा रस्ता डावीकडे मांडकी गावाकडे जाताना दिसतो. या रस्त्यावर २.५ कि.मी.अंतरावर महादगेवाडी हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. किल्ल्याचे नाव मांडकीदुर्ग असले तरी मांडकी गाव हे अलीकडे मुख्य रस्त्यावर आहे. महादगे वाडीच्या मागे उत्तरेला तीन डोंगरांची रांग दिसुन येते यातील मधल्या डोंगरावर माणिकदुर्ग वसला आहे. स्वतःचे चारचाकी वाहन असल्यास गावातच ठेवावे कारण पुढील रस्ता कच्चा असुन वाहन वळविण्यासाठी जागा नाही. गावातून गडाच्या दिशेने निघाल्यावर एक कच्चा रस्ता या डोंगराकडे जातो. या रस्त्याने पुढे गेल्यावर रस्ता संपल्यावर दोन वाटा लागतात. त्यातील डावीकडील वाट एका ओढ्यात उतरते तर उजवीकडील वाट डोंगरधारेवर चढत जाते.
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा पहिला चढाचा टप्पा उजाड आहे. हा टप्पा पार केला की वाट दाट झाडीत शिरते. किल्ल्यावर जाताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे किल्ला आपल्या उजव्या बाजुला असुन उजवीकडची वळणे घ्यावीत. पुढे वाट दोन डोंगरामधील खिंडीत येते. येथेच माणिकदुर्गाचे एक टोक आहे. या टोकावरून उजव्या बाजूची वाट पकडून अर्ध्या तासात आपण गडाच्या वरील भागात येतो. महादगे वाडीतून येथवर येण्यासाठी १ तास लागतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासुन १७३४ फुट असुन साधारण त्रिकोणी आकाराचा हा गड चार एकर परिसरावर पसरला आहे. गडाच्या या भागातुन डाव्या बाजूची वाट पकडून सुकाई देवी मंदिराकडे जाता येते. सुकाई देवीचे मंदिर गडाच्या दुसऱ्या टोकावर एका चौथऱ्यावर असुन मंदिराखालील भाग एखाद्या बुरुजाप्रमाणे वाटतो. येथुन डोंगराची एक सोंड खाली उतरत जाताना दिसते. मंदिराचा आकार खुपच लहान असुन नव्याने बांधकाम केलेल्या या मंदिरात सुकाई देवीची मुर्ती आहे.
सुकाई देवी मंदिराच्या शेजारी एक गोलाकार उंचवटा दिसतो. या उंचवटयाभोवती माणिकदूर्गचे अवशेष विखुरलेले आहेत. या उंचवटयाच्या डाव्या बाजुकडील अवघड वाटेने काही अंतर तिरकस पार केल्यावर या उंचवटयाच्या पोटात उतारावर ५ ओबडधोबड गुहा पहायला मिळतात. यातील तीन गुहा एका सरळ रेषेत असुन पहिली थोडी मोठी तर दुसरी अगदी लहान आणि तिसरी सर्वात मोठी आहे. तिसऱ्या गुहेत लेण्याप्रमाणे एक खांब आहे. उर्वरित दोन गुहा एखाद्या खळग्याप्रमाणे आहेत. या गुहा व टाकी गडाच्या एकाच बाजूस आाहेत. गुहा पाहुन परत सुकाई मंदिराकडे यावे व उजव्या बाजुने समोरील उंचवटयावर चढावे. या उंचवटयावरून सुकाई देवी मंदिराच्या विरूध्द बाजूला उतरले असता डोंगर कड्यावर दोन बुजलेली टाकी व एक लहानशी गुहा पहायला मिळते. यातील एका टाक्यावर कातळात कोरलेले शिवलिंग असुन दुसऱ्या टाक्यावर यक्ष प्रतीमा कोरलेल्या आहेत पण त्यांची ओळखण्यापलीकडे झीज झालेली आहे. या टाक्याकडून सरळ जाणारी वाट आपण आलो त्या मूळ वाटेला जाऊन मिळते. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडावर तटबंदी बुरुज यासारखे कोणतेही अवशेष दिसत नाही.
विजयनगर साम्राज्यात असणारा माणिकदुर्ग किल्ला पवार नावाच्या व्यक्तीच्या ताब्यात होता. प्राचीन काळी पालशेत बंदरात उतरलेला माल घाटमार्गाने कऱ्हाडच्या बाजारपेठेत जात असे. या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी नवतेदूर्ग, कासारदूर्ग, माणिकदूर्ग, भैरवगड या किल्ल्यांची योजना करण्यात आली होती. आदिलशहाने विजयनगरचे साम्राज्य जिंकल्यावर हे किल्ले त्याच्या ताब्यात गेले. हे किल्ले त्याने त्याच काळात पाडून नष्ट केल्याने शिवकाळात त्याचा उल्लेख आढळत नाही. यामुळे आज हे किल्ले इतिहास जमा झाले आहेत.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.