महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,607

मानिनी | कोरवलीच्या सुरसुंदरी

Views: 1318
2 Min Read

मानिनी –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.१७ –

जे मंदिर खास सुरसुंदरी करताच निर्माण केले गेले अशा कोरवलीच्याया शिवमंदिराच्या मंडोवरावर आणखी एक  नयनरम्य शिल्प कोरलेले आहे. हि सुरसुंदरी मानिनी म्हणून ओळखली जाणारी देवांगणा आहे. या सुरसुंदरीचे अंकन कसे करावे याचे बारकावे भारतीय शिल्पसंहिता या ग्रंथामध्ये दिलेले आहे.

कोरवलीची ही सुरसुंदरी फार वेगळी वैशिष्ट्यपूर्ण मनमोहक हालचालीची एक स्वर्गीय अप्सरा आहे. नाजूक व सडसडीत बांधण्याची असलेली ही देवांगणा तारुण्यसुलभ भावना आणि शरीर सौष्ठवाचे उत्तम उदाहरण आहे, तिची शरिरवैशिष्ट्यपूर्ण केशरचना तिने आपल्या मस्तकी जो मुकुट धारण केलेला आहे तो केशर रचनेचा एक प्रकार म्हणावा लागेल. किंचित डावीकडे आपली कर्दळीच्या गाभ्याप्रमाणे मान झुकवली असून नृत्य करण्यासाठी तिने उचललेला उजवा पाय आणि हातांची मोहक हालचाल एकदमच पहाणाऱ्यास आकर्षित करते.

मुकुटा खालील तिचा भालप्रदेश थोडासाच बाहेर डोकावत आहे. मात्र महिरपी सारख्या तिच्या भुवया त्याखाली असणारे तिचे अर्धोन्मीलित नेत्र तिच्या मुख्य सौंदर्याची जाणीव करून देत आहेत, मान झुकवल्यामुळे  तिच्या कर्णभूषणांची होणारी लयबद्ध हालचाल कौशल्याने दाखवलेली आहे. कंठहार, उपग्रीवा आणि स्तनसूत्र ही गळ्यातील आभूषणे तिला विलक्षण शोभतात. यामुळे तिच्या दोन्ही बाहूंची शोभा वाढलेली आहे.कटीसूत्र, उरूद्दाम आणि मुक्तदाम या जोडीलाच पादवलय आणि पादजालक हे अलंकार तिने घातलेले असून तिची मनगटावरील आभूषणे ही रेखीव आणि ठसठशीत आहेत. दोन्ही हातात पुष्पहार धारण करून त्याच्यासह मोहक नृत्य करणारी ही देवांगणा विलक्षण प्रभावी व आकर्षक अशी आहे. ती किती भार हरपून नृत्य करत आहे हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होते.

पुष्पहारांच्या दोन्ही टोके तिने आपल्या करांगुली मधून हळुवारपणे पकडलेली आहेत. एकूणच हे शिल्प अत्यंत उठावदार आणि लयबद्ध आहे. कोरवलीच्या सुरसुंदरीच्या मांदियाळी मध्ये ही स्वर्गीय अप्सरा आगळीवेगळी भासते. ती तिच्या मुकुटा मुळे, कारण या मानिनी प्रमाणे कोणत्याही सुरसुंदरी च्या मस्तकावर कलाकारांनी मुकुट दाखवलेला नाही. उलट वेगवेगळ्या केशरचना दाखवण्यात यशस्वी तो झालेला आहे. पण मानीनीच्या मस्तकावर मात्र त्याने कलात्मक मुकुट दाखविला आहे. देखणी आणि प्रभावी ठरलेली ही कोरवलीची देवांगणा वर्षानुवर्षे मनमोहक हालचाली करीत या मंदिराच्या भिंतीवर उभी आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a Comment