महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,77,073

माणकेश्वर शिवमंदिर, झोडगे

Views: 1419
2 Min Read

माणकेश्वर शिवमंदिर, झोडगे –

आडवाटांवर चालायची सवय लागली, की खेडोपाडी अनेक कोरीव मंदिरे भेटतात. त्यावरील शिल्पकाम, स्थापत्य थक्क करून सोडते. असेच एक सुंदर मंदिर उभे आहे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या झोडगे या गावी. मालेगावपासून ३० कि.मी. अंतरावर असलेल्या झोडगे या गावी असलेले माणकेश्वर महादेवाचे मंदिर अतिशय सुंदर असूनसुद्धा दुर्लक्षित राहिले आहे. मंदिरासमोर याच मंदिराची छोटी प्रतिकृती पडक्या अवस्थेत उभी आहे. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या डोंगराला झटुंब्याचा डोंगर असे म्हणतात. या डोंगरावर झोटिंगबाबा नावाच्या नाथपंथीय साधूचे वास्तव्य होते. या डोंगरावरचा झोटिंगबाबा हा घोडय़ावर बसलेला असून तो गावाचे रक्षण करतो अशी गावकऱ्यांची गाढ श्रद्धा आहे.(माणकेश्वर शिवमंदिर, झोडगे)

माणकेश्वर मंदिराची रचना ही बरीचशी सिन्नर इथल्या गोंदेश्वर मंदिरासारखीच आहे. मंदिर स्थापत्य शास्त्रानुसार हे भूमीज शैलीतील मंदिर आहे. मंदिर यादवकालीन असून साधारणपणे १२ व्या शतकातील असावे. अतिशय देखणे असलेले हे मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. मंदिर पाश्चिमाभिमुख आहे त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण थेट गाभाऱ्यात प्रवेश करतात. मंदिराच्या समोरच एक चौथरा असून त्यावर नंदीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. मुखमंडप, स्तंभविरहित सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या या मंदिराची डागडुजी केलेली जाणवते. मंदिराच्या बाह्यांगावर शिवाच्या विविध मूर्ती पहायला मिळतात. बाहय भागावरील अंधकासुरवध शिवमूर्ती, विविध वादक, सुरसुंदरी, भैरव यांचे केलेले अंकन, तसेच शिखरावर असलेले कीर्तीमुख हे मुद्दाम पाहण्याजोगे आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात. येथील काही स्थानिक तरूणांकडून दरवर्षी दीपावली पाडव्याला “दीपोत्सव” साजरा केला जातो. त्या वेळेस मंदिर शेकडो दिव्यांनी उजळून निघते. मालेगाव-धुळे परिसरात असेलेले हे शिल्पवैभव खास वेळ काढून पाहावे असे आहे.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment