मराठ्यांचे घोडदळ
मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवर स्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिगंत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती.
विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या ‘अलिनामा‘ मध्ये म्हणतो,”मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते एवढा वेग होता त्यांचा. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते.” पुढे तो म्हणतो,
“वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजी राजाने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले.”