शाहू छत्रपतींना घाबरून मुंबईभोवती बांधले ‘मराठा डीच’
इसवी सन 1715 साली कान्होजी आंग्र्यांना लगाम घालण्यासाठी मुंबई मध्ये गव्हर्नर बुनची नियुक्ती झाली. आंग्रे यांच्या सततच्या लुटीमुळे आणि प्रत्येक युद्धात मिळत असलेल्या विजयामुळे बुन एवढा घाबरला,की त्याने मुंबईच्या सभोवताली तटबंदी बांधण्याचे काम हाती घेतले.यातूनच चर्चगेटची निर्मिती झाली.एवढे केले,तरीही वेळोवेळी इंग्रजांना अपयशाचा स्वीकार करावा लागला.त्यानंतर काही काळाने म्हणजेच इसवी सन 1730-40 च्या दशकांत याहून भयंकर परिस्थिती आली.
1739 साली मराठ्यांनी वसईवर विजय मिळवला आणि पोर्तुगिजांच्या वसाहतीमधील महत्त्वाचा किल्ला ताब्यात घेतला. वसई आणि परिसराचा पाडाव झाल्यावर मराठे मुंबईकडे सरकतील या भितीने इंग्रजांनी आपल्या किल्ल्याचे संरक्षण वाढवण्याची तयारी सुरु केली. त्यांनी किल्ल्याच्या भोवती खंदक खोदायला सुरुवात केली. या खंदकाच्या कामासाठी शहरातील धनाढ्यांनी आर्थिक मदत केली होती. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये केलेले मुंबईतले ते पहिले काम असावे. त्यानंतर किल्ल्यापासून थोडी लांब अशी मोकळी जागा ठेवण्यात आली. ज्याला एस्प्लनेड म्हटलं जातं. मराठे चाल करुन आलेच तर त्यांना थांबवण्यासाठी, मारण्यासाठी या जागेचा वापर करता येईल, ते बंदुकीच्या गोळीच्या टप्प्यात येतील असा विचार करण्यात आला होता.
सध्याच्या दक्षिण मुंबईच्या महात्मा गांधी रस्ता आणि दादाभाई नौरोजी रस्त्याच्यामध्ये हा मराठा डीच खंदक होता
नंतर कोणताही प्रबळ शत्रू न राहिल्याने आणि मुंबई च्या विस्तारासाठी इंग्रजांनी फोर्ट च्या भिंती , चर्चगेट पाडून टाकले आणि मराठा डीच सुद्धा बुजवून टाकला.
मराठ्यांच्या धाकामुळे तत्कालीन सुरत,मुंबई,कोलकाता यांसारखी धनाढ्य व्यापारी शहरे दहशतीखाली असत.कित्येकदा कान्होजी आंग्रे यांनी इंग्रजांची जहाजे लुटली,इंग्रज अधिकारी ओलीस ठेवले,वेळोवेळी त्यांना पराभूत केले.स्वतः शाहू छत्रपती यांनी कान्होजी आंग्रे यांचा त्यांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे सत्कार केला होता.
मराठ्यांच्या आरमाराची हीच काय ती ताकद आणि दहशत..!!
फोटो : मुंबई येथे असलेला मराठा डीच
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची