महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,620

मराठा घोडदळ | हिंदवी स्वराज्याच्या अपरिचित पाऊलखुणा भाग १

Views: 2749
5 Min Read

हिंदवी स्वराज्याच्या अपरिचित पाऊलखुणा भाग १ –

◆ मराठा घोडदळ ◆

|| सरनौबतस्तु सेनानी: ||

अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यवहारकोशात सरनौबताचे वर्णन आले आहे. सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी. घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे. दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत.(मराठा घोडदळ)

◆हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे पागा व्यवस्था थोडक्यात अशी होत :

सरकारातून घोडा मिळणारा बारगीर ->

२५ बारगिरास १ पखालजी

१ नालबंद व १ हवालदार

५ हवालदारांचा मिळून १ जुमलेदार (पगार ५०० होन सालाना व पालखीचा मान)

१० जुमलेदारांच्यावर १ हजारी (सालाना पगार १००० होन)

५ हजारींच्यावर १ पंचहजारी आणि या पंचहजारींच्या वर असणारा सरनौबत अंदाजे या सैन्य सरनौबतास सालाना ४००० ते ५००० होन इतका पगार होता.

◆ शिवकालात सरनौबत कोण होते आणि कधी होते हे :

सरनौबताचे नाव, नियुक्ती काल व सैन्य प्रकार

★तुकोजी चोर १६४०-१६४१ दरम्यान

★नुरखान बेग १६४३ पायदळ

माणकोजी दहातोंडे १६५४ घोडदळ

येसाजी कंक १६५८ पायदळ

नेतोजी पालकर १६५८ घोडदळ

★कडतोजी प्रतापराव गुजर १६६६ घोडदळ

★हंसाजी हंबीरराव मोहिते १८ एप्रिल १६७४ घोडदळ

तर ही आहे यादी शिवकालातील सरनौबतांची.

◆तुकोजी चोर :

ह्यांना सरनौबत केल्याचा उल्लेख फक्त सभासद बखरीत (पृ.९) आणि एका पत्रामध्ये आहे (राजवाडे खंड १७ लेखांक १०). शिवाजीराजांचे जे मावळातील बालपणीचे मित्र त्यातील हे एक असावे ह्या व्यतिरिक्त ह्याचा उल्लेख सुभानमंगळच्या लढाई संबंधी शिवभारतात येतो. तुकोजी सोबत एक भैरोजी चोर असेही नाव येते. तुकोजी नेमके पायदळाचे सेनापती होते की घोडदळचे हे मात्र माहितीच्या अभावे सांगता येत नाही. श्री शेजवलकर यांच्या अंदाजे तुकोजी यांचा मृत्यू १६५७ च्या जुन्नर लुटीच्या वेळी झाला तोवर तुकोजी हे सरनौबत होते परंतु या विधानास त्यांनी कुठलाही आधार दिलेला नाही.

◆नुरखान बेग :

ह्याचे नाव पुण्यात १६५७ साली झालेल्या एका निवाडपत्रात पायदळाचा सरनौबत म्हणून येते. शहाजीराजांनी शिवाजीराजांसोबत जी माणसे पाठवली त्यात हा असावा. ह्या पत्राच्या आधी किंवा नंतर याचा काहीही सुगावा लागत नाही पण १६५७ नंतर मात्र लगेचच ह्याला सरनौबतीवरून दूर करून त्याजागी येसाजी कंक ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

◆येसाजी कंक :

राजगड नजीकच्या भुतोंडे गावचे सर पाटील असणारे येसाजी कंक म्हणजे शिवाजीराजांचे बाल सवंगडी. ह्या सवंगड्याने आपल्या जीवासर्शी वेळोवेळी अगदी अखेरपर्यंत स्वराज्याची साथ दिली, जवळ जवळ ३० वर्षे येसाजी पायदळाचे सरनौबत होते. अफजल प्रकरण, ७० चा वादळी पराक्रम, भागानगर भेट इत्यादी ठिकाणी ह्यांचे भरपूर उल्लेख आहेत. ह्यांचे पुत्र कृष्णाजी कंक हे शंभूकालात फोंड्याच्या लढाईत गोळा लागून पडले.ह्यांच्या सोबत एक कोंडाजी कंक असेही नाव येते परंतु त्याची अधिक माहिती मिळत नाही.

◆नेतोजी पालकर :

यांचा उल्लेख आजवर इतिहासात नेताजी असा लिहिला गेला पण ते चूक आहे. समकालीन साधानाप्रमाणे नेतोजी हवे. ह्यांना १६५७ च्या सुमारास माणकोजी नंतर पागेची सरनौबाती मिळाली. दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी प्रती शिवाजीचीच उपमा मिळवली. पण स्वराज्याच्या कडक नियमात न बसणाऱ्या हलगर्जीपणामुळे त्यांना शिवाजीराजांनी “समयास कैसे पावला नाहीत ?” असा कौल लावीत दूर केले. हे मग अगोदर आदिलशाहित व तेथून मिर्जा राजाशी संधान बांधून मोगलाईत गेले व परत येवून शिखर शिंगणापूरला शुद्ध झाले परंतु शिवाजीराजांच्या मृत्यू पश्चात शहजादा अकबर प्रकरणानंतर केव्हातरी पुन्हा हे मोगलाईत गेले.

◆कडतोजी प्रतापराव गुजर :

ह्यांच्या नेमणुकीच्या बऱ्याच आख्यायिका आहेत. मिर्झा राजा जयसिंगावर छुपा हल्ला, मोगल सेनापतीची ह्यांनी व शिवाजीराजांनी केलेली एकाच वेळची लुट इत्यादी पण विश्वसनीय पुराव्या आधारे ह्यांना सरनौबाती आणि प्रतापराव किताब १६६६ मध्ये मिळाला तसेच दिग्विजयी पराक्रम करीत त्यांनी तो सार्थ ठरवला. बागलाण, औरंगाबाद स्वारी आणि इतर अनेक पराक्रम यांच्या वाटचे आहे.

१६७४ मध्ये राजाभिशेकाच्या काही काल आधी बहलोल खान सोडल्या प्रकारणी शिवाजी महाराजांनी त्यांना, सला काय निमित्य केलात ? असा करडा सवाल केला आणि बहलोलखानास गर्दीस मेळवून मगच रायगडी आम्हास तोंड दाखवावे असा कडक आदेश दिला आणि हाच राग मनी बाळगून महाशिवरात्रीच्या दिवशी प्रतापराव आपल्या ६ सरदारांना सोबत घेवून बहलोल खानवर तुटून पडले आणि वीरगतीस प्राप्त झाले.

◆हंसाजी हंबीरराव मोहिते :

हंबीरराव माणूस तसा रांगडा परंतु स्थिर बुद्धीचा. शंभूकालात जी मोगली वावटळ उठली त्यात सगळ्यात महत्वाची कामगिरी कुणी केली असेल तर ती हंबीरराव मोहित्यांनी. प्रतापरावांच्या नंतर कुणास सरनौबती द्यावी या विचाराने शिवाजी महाराज चिपळूणला असणाऱ्या आपल्या फौजेचा कौल घेऊन आले आणि त्यांनी हंबीरराव यांना सरनौबत केले. हे शिवाजीराजांच्या अखेरपर्यंत घोडदळचे सरनौबत होते. हंबीरराव मोहिते पुढे शंभूकाळात शर्जाखानाच्या लढाईत वाई इथे गोळा लागून पडले.

संदर्भ:

सभासद बखर
महाराष्ट्रेतीहासाची साधने -खंड २
श्रीशिवभारत
संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना आराखडा व साधने – श्री त्र्यं. शं. शेजवलकर
श्री शिवचरीत्रप्रदीप
छत्रपती शिवाजी – निनाद बेडेकर

 लेखन /संकलन : रमेश साहेबराव जाधव.

मराठा घोडदळ

Leave a Comment