मराठी भाषा दिवस –
आज २७ फेब्रुवारी, विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
कोणतीही भाषा समृद्ध वा कधी जन्माला आली असं सांगणं किंवा शोधणं खरोखर फार अवघड आहे. तसंच कोणतीही भाषा ही एक दिवसात नष्ट होईल असं ही सांगता येत नाही. किंवा कोणत्याही भाषेची किंवा संस्कृती ची जडणघडण ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. त्यामुळे कोणत्याही भाषेचा जन्म अमुक अमुक दिवशी झाला असं कोणीही सांगू शकत नाही. सध्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव भाषातज्ज्ञांसमोर मांडण्यात आला आहे. सन १५०० ते २००० या कालावधीत भाषेचा नोंद इतिहास असणं अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असतं. त्याचप्रमाणे प्राचीन साहित्य हे भाषांतरित नसून मूळ भाषेतील असल्याचा निकष पूर्ण केल्यास भाषेला अभिजात दर्जा मिळतो. त्यासाठी च संशोधन सध्या सुरू आहे. मराठी चा उगम सुमारे ५००० वर्षा पूर्वी चा असू शकतो.
मराठी भाषा ही आर्य भाषाकुळात उत्पन्न झाली असे समजले जाते. आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्या भाषेचे नाव काय होते या बद्दल मतभेद आहेत. अगदी त्यावेळी कोणती भाषा होती हे देखील पक्क सांगता येणार नाही. वेदपुर्वकालीन भाषेची कल्पना वेदसमकालीन वाङ्मयावरुन ठरवावे लागेल. पण वेद ही संस्कृतद्भव भाषेत आहे हे विश्वासाने सांगू शकतो. त्याकाळात वेदिक आणि प्राकृत भाषा वापरली जात होती. त्यानंतर च्या काळात संस्कृत भाषेची अवस्था येते. ही मराठी भाषेची सुरुवात आहे असं म्हणू शकतो. प्राकृत भाषेपासून मराठी उत्पन्न झाल्याच्या खुणा या प्राकृत भाषेत दिसतात. कारण बरेचसे मराठी भाषेतील शब्द हे मूळ प्राकृत भाषेतील आहेत. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा ढोबळपणे म्हणू शकतो. मराठी भाषेवर पाली, प्राकृत, मागधी, महाराष्ट्री, आभीर तसेच संस्कृत भाषेचे संस्कार होत गेले. मराठी भाषेची उत्पत्ती पाहण्यासाठी काही शिलालेख, ताम्रपट आणि अन्य मराठी भाषेचा उल्लेख शोधला पाहिजे. श्रवणबेळगोळचा शिलालेख इ.स. ९८३ ला. त्याही मागे अनेक मराठीचे उल्लेख, शिलालेख सापडतात अगदी इ.स. ६८० च्या ताम्रपटात ‘पन्नास, आणि प्रिथवी’ हे शब्द आहेत. त्याचबरोबर ‘धर्मोपदेशमाला’ (इ.स. ८५९) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. प्रत्यक्ष मराठी वळणाचे शब्द इ.स. ६८० पासून शिलालेख आणि ताम्रपटात सापडतात. थोडक्यात सांगायचे तर मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत बोलीभाषेपासून झाला असल्याचं मानायला काही हरकत नसावी.
मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत बोलीभाषेपासून झाला असल्याचं मानलं जातं. पैठण प्रतिष्ठानच्या सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात प्रथम वापर केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीची भरभराट झाली. १२५० ते इ.स. १३५० मध्ये देवगिरी यादवांच्या काळात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला होता. अनेक कवी आणि लेखकांना राजाश्रय मिळाला होता. याच काळात वारकरी संप्रदाय उदयाला आला. तेव्हा विविध जातीत संतांची परंपरा जन्माला आली आणि त्या संतांनी विविध प्रकारांनी काव्यरचनेस सुरुवात केली व मराठी वाङ्मयात मोलाची भर टाकली. संकेतिकी लिपीची सुरुवात याच काळात झाल्याचंही सांगितलं जातं. पुढे यादवांचं स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरू झाला तेव्हाचा म्हणजे इ.स. १३५० ते १६०० असा हा काळ. सरकारी भाषा फारसी असल्याने स्थानिक लोक आणि भाषा याविषयी त्यांना काहीच कर्तव्य नव्हतं. याच काळात मराठीत अनेक फारसी शब्द आले आणि रूढ होत गेले मात्र असं असलं तरीही मराठी भाषा समृद्ध होतच राहिली.
इ.स. १६०० ते १७०० या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांचं आक्रमण थंडावलं. शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवताना फारसीऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितलं. पुढे पेशव्यांच्या पर्यंतच्याकाळात श्रृंगार आणि वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळालं. त्यातूनच लावणी आणि पोवाडा हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झाले. तसंच या काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. इ. स. १७१८पासून म्हणजे इंग्रजी कालखंडाला सुरुवात झाली असून त्या कालखंडामध्ये गद्य लेखनाला सुरुवात झाली. कथा, नियतकालिकं आणि गद्य साहित्य छापण्याची सुरुवात झाली. थोडक्यात मराठीचा उत्कर्ष व्हायला लागला याच काळात मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आग्ल अधिका-याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी चिन्हांची ओळख करून दिली. भारत स्वतंत्र झाला त्यानंतर च्या काळात म्हणजे साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलं होतं आणि मराठी भाषेचा वापर आणि दर्जा वाढत आहे.
मराठी भाषेची आजची स्थिती शासनस्तरावर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयक अनेक चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. भाषेची अभिजातता सिद्ध करण्यासाठी चालू असलेले सकारात्मक प्रयत्न असोत किंवा भाषा सल्लागार समितीची स्थापना असो, विश्वकोषाच्या माध्यमातून चालू असलेले कार्य पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणारे आहे. मराठी भाषेतील सर्वोत्तम साहित्याला आणि चित्रपटांना पुरस्कार देऊन केला जाणारा गौरव ही घटनाही महत्वाची आहे. मराठी नाटक, चित्रपटांना भरघोस अनुदानही दिले जाते. या सगळ्यांच्या मागे एकच हेतू आहे तो म्हणजे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार वाढावा. साहित्य कला आणि इथल्या सांस्कृतिक परंपरांना राजाश्रय मिळत असूनही त्यांच्या दर्जाबद्दल सतत एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसते. साहित्य आणि चित्रपट या गोष्टी निरंतर टिकणाऱ्या असतात. त्या-त्या संस्कृतीचा इतिहास या निमित्ताने समाजासमोर येत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम हे त्या-त्या प्रदेशांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि एकूणच सामाजिक स्तराला उंचावणारे असले पाहिजेत. शालेय, महाविद्यालय आणि विद्यापीठीय पातळीवरील अभ्यासक्रम आपण पाहिले तर ते बहुकेंद्री असल्याचे दुदैवाने जाणवत नाही.
मुळात गेल्या अनेक वर्षापासून मराठी माध्यमाच्या शाळांची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याची दिसते. मराठी भाषेत किंवा माध्यमात शिक्षण घेतल्यास फार भवितव्य नाही असे एक चित्र जाणिवपूर्वक निर्माण करण्यात इंग्रजी शाळा यशस्वी ठरल्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांची भौतिक स्थिती आणि त्या शाळेमधून शिकवले जाणारे अभ्यासक्रम आणि तो अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे. भाषेविषयीची एवढी अनास्था होण्याचे कारण काय ? असा प्रश्न पडू शकतो. अशी परिस्थिती उद्भवण्यामागे कोणती कारणे आहेत याचा विचार व्हायला हवा. म्हणजे मराठी विषय घेऊन पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास नोकरीच्या संधी उपलब्ध आहेते का ? सर्जनात्मक लेखनाचा दर्जा कसा आहे ? त्यातूनच निर्माण होणाऱ्या चित्रपट, नाटक आणि मालिकांचा दर्जा कसा आहे ? ज्या भाषेची परंपरा अभिजात आहे त्या भाषेची आजची स्थिती एवढी गंभीर का झाली. विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे अभ्यासक्रम हे खरंच त्यांना ‘झानार्थी’ बनवतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आली आहे. कारण सामाजिक व्यवहारात मराठी समृद्ध असली तरी शैक्षणिक क्षेत्रातून तिचे उच्चाटन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. असे होऊ नये म्हणून प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्याची भाषाभिरुची वाढवण्यासाठी जागरुक पालकांनी आणि समाजाने प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण व्यवहारातील भाषेपेक्षा शिक्षण आणि साहित्याची भाषा चिरकाल टिकणारी असते. तीच भाषा त्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख असते. मराठीची ही ओळख पुसली जाऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवे.मराठी भाषा दिवस.
लहान मुलं जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. पण तीच माऊली जर आपल्या बाळासोबत मराठीत बोलत नसेल पु ल देशपांडे म्हणतात तसं व्हायचं आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदरटंग मधून आपले थॉट जितके क्लीअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेज मधून करणं फारच डीफिकल्ट जातं इंग्लिश मस्ट बी ऑपशनल असं जर आपलं भाषा विषयक धोरण असेल तर झालंच. त्यात महाराष्ट्रच भौगोलिक स्थान बघता खेड्यापाड्यातली रांगडी आणि अशुद्ध, अपभ्रंश असलेली भाषा असते. कशीही असो ती मराठीच म्हणून मराठी माणसाला आवडते. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाल्या.
आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी तीच दर बारा कोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतात. तिचे हेल वेगळे होतात. मराठी भाषेतसुद्धा असे वेगळे प्रकार होतात. कोकणातली मालवणी भाषा, घाटावरची घाटी भाषा, देशावरची भाषा, वऱ्हाडी भाषा वेगळी, मध्यप्रांत/मध्यप्रदेशातली हिंदी मिश्रित मराठी भाषा आणि गोव्याकडील कोंकणी भाषा वेगळी असते. मराठी भाषा लवचिक आहे थोड्या थोड्या फरकाने शब्दाचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. पूर्वी मराठीला राजभाषेचा मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे. कशीही असो ती मराठीच म्हणून मराठी माणसाला आवडते. आपल्या भाषेचा आपल्याला आभिमान असतो. मी कोणीही असतोतरी चाललं असतं. पण मी मराठी आहे याचा मला अभिमान आहे. कारण अमृताशी पैजा जिंकणारी माझी भाषा आहे. मी मराठीत ओव्या गातो आणि शिव्याही मराठीतच देतो. या भाषेच्या प्रत्येक शब्दात, मला तोच आईचा गोडवा जाणवतो. जगाच्या पाठीवर फिरतो कुठेही, तरी जिभेवर असते मराठी. अडलं नाही अजून कुठेही, कारण रक्तात आहे मराठी !मराठी भाषा दिवस.मराठी भाषा दिवस.
शेवटी जाता जाता सुरेश भट यांच्या आठवलेल्या काही ओळी –
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
लेखन व माहिती संकलन – विजयश श्रीकांत भोसले (अचिंतय)