“फरांचीस बादशहा रयतांनी बैदा करून जिवे मारिला”
फ्रेंच राज्यक्रांतीसंबंधीची मराठी पत्र व्यवहारातील बातमी
“तुम्हाला ब्रेड परवडत नसेल तर केक खा” हे फ्रांसच्या राणीचे जगप्रसिद्ध वाक्य आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास आपण सर्वानी शाळेत वाचलेला असतो. पण भारतातील समकालीन लोकांना या बातम्या समजत असतील काय याचं कुतूहल नेहमीच वाटत राहतं ! त्या काळात निदान भारतात तरी सार्वजनिक वृत्तपत्रं नसल्याने या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहोचणे कठीणच होते. त्या मानाने इंग्लंड- युरोपातील परिस्थिती बरी असावी कारण हिंदुस्थानातील काही घटना इंग्लंड मधील लंडन गॅझेट सारख्या वृत्तपत्रांमधून झळकल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत. त्यातली आपल्या अगदी जिव्हाळ्याची बातमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्याची बातमी !
इंग्लंड-युरोपातील मोठ्या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्या तरी हिंदुस्थानातील राजकारणी मंडळींपर्यंत त्या पोहोचत असाव्यात. याचं प्रमुख कारण म्हणजे इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज वगैरे मंडळी येथे नोकरी-धंद्याच्या निमित्ताने येथे अनेक वर्षे स्थायिक झाली होती आणि त्यांचा येथील राजसत्तांशी जवळचा संबंध येत होता. या निमित्ताने त्यांच्या देशातील काही महत्वाच्या बातम्या हिंदुस्थानी लोकांना समजत असाव्यात.
आज श्री वासुदेवशास्त्री खरे यांचा ऐतिहासिक लेख संग्रह वाचताना अशीच एक मजेशीर बातमी वाचनात आली. ही बातमी आहे फ्रेंच राज्यक्रांतीच्या संबंधातली ! विसाजी नारायण वाडदेकर नावाच्या माणसाने कोणा बाळासाहेबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की , ” फरांचीस बादशहा रयतांनी बैदा करून जिवे मारिला, याचा तपशील श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांकडे ( मिरजेचे सरदार परशुरामभाऊ पटवर्धन ? ) लिहिला आहे त्याजवरून विदित होईल” यावरून फ्रेंच लोकांनी क्रांती करून फ्रेंच राजाला (सोळावा लुई) ठार मारले आहे याची बातमी मराठ्यांपर्यंत येऊन पोहोचली होती असे दिसते !
या पत्रात पुढे या संधीचा फायदा इंग्रज, डच वगैरे मंडळी फ्रेंचांचा पराभव करावा असा विचार करत आहेत असा मजकूर देखील येतो आणि त्यामुळे आपण देखील (पेशवे, निजाम, इंग्रज वगैरे ) आता टिपू सुल्तानावर नव्याने मोहीम आखावी वगैरे विचार चालू झाल्याचे दिसतात.
पुढे मागे फ्रेंच राज्यक्रांतीसंबंधी कोणता तपशील या विसाजी नारायण वाडदेकराने लिहून कळवला होता हे वाचायला मिळालं तर मजा येईल नाही !
संदर्भ:-
ऐतिहासिक लेख संग्रह – खंड ९, लेखांक ३५२२, श्री वासुदेवशास्त्री खरे
चित्रं:-
१) फ्रांसचा राजा सोळावा लुई याचा रयतेने केलेला शिरच्छेद
सत्येन सुभाष वेलणकर, पुणे