महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,14,025

मर्दानो हिंमतबुलंद पुरुष

Views: 3657
3 Min Read

मर्दानो हिंमतबुलंद पुरुष

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात केलेल्या स्वाभिमानी वर्तनानंतर मिर्झा राजा जयसिंग यांचा आग्रा येथील प्रतिनिधी परकालदास याने एका पत्रात महाराजांचे वर्णन केले आहे ते असे :

‘‘शिवाजी केवळ सहाशे अनुयायांसह इथे आला आहे. त्याच्याबरोबर सगळे मिळून दोन- अडीचशे घोडेस्वार आहेत. त्यापैकी शंभर स्वार स्वत:चा घोडा असलेले (म्हणजे शिलेदार) आहेत आणि बाकीचे पागेचे बारगीर आहेत. शिवाजीची पालखी जाताना तुर्की वेशातील अनेक धिप्पाड पदाती पुढे चालतात. पुढे शिवाजीचे नारिंगी (भगव्या) रंगाचे सोनेरी छाप असलेले रेशमी कापडाचे निशाण असते. शिवाजीच्या लवाजम्यात माल लादलेले थोडे उंट आहेत. (सामानाच्या वाहतुकीसाठी) शंभर वंजारीही आहेत. शिवाजीच्या चाकरांमध्ये सर्व मातब्बर लोकांना पालख्या आहेत, त्यामुळे त्याच्याबरोबर पालख्या पुष्कळ असतात.

शिवाजी चणीने लहानच दिसतो. त्याचा चेहरा देखणा आहे, वर्ण गोरा आहे आणि तो दिसायला राजबिंडा आहे. हिंमत आणि मर्दानगी यांच्या बाबतीत त्याला पाहताच तो *मर्दानो हिंमतबुलंद* पुरुष आहे असे दिसते. शिवाजीला दाढी आहे. शिवाजीचा मुलगा नऊ वर्षांचा आहे. तोदेखील देखण्या चेहर्‍याचा आणि गोर्‍या वर्णाचा आहे.
शिवाजी आला तेव्हा त्याच्याबरोबर लोक थोडेच होते, पण ते मोठ्या थाटामाटात आले होते. त्याच्या स्वारीत पुढे मोठा हत्ती असतो आणि त्यावर निशाण असते. सोन्या-चांदीचा साज असलेला मोठा घोडा पुढे असतो. धिप्पाड दख्खनी लोक पुढे मोठ्या शिस्तीत चालतात. हौदा असलेल्या दोन हत्तिणी मागे असतात. पुढे एक मोठी ‘सुखपाल’ पालखी असते. तिचे दांडे चांदीने मढविलेले आणि सगळी पालखीही चांदीच्या पत्र्याने मढविलेली. तिचे पाय आणि खुंट्या सोन्याच्या पत्र्याने मढविलेल्या आहेत.

यापूर्वीही शिवाजीच्या मर्दुमकीची व हिमतीची लोकांनी प्रशंसा केली होती आणि आता इथे बादशहासमोर त्याने स्वाभिमानाने करडा जबाब दिल्यामुळे लोक त्याच्या मर्दुमकीची खूपच तारीफ करतात.’’
निकोलाओ मानुची नावाचा शिवकालीन इटालियन पोरसवदा वयातच हिंदुस्थानात आला आणि हिंदुस्थानातच स्थायिक झाला.
त्याने औरंगजेबाचा मुलगा शाह आलम याच्या नोकरीतील चित्रकार मीर मुहम्मद याच्याकडून मोगल दरबारातील छप्पन्न चित्रांच्या नकला १६८६ पूर्वी करवून घेतल्या.
त्यात एक्केचाळीस व्यक्तिचित्रे आहेत. शिवाजी महाराजांच्या स्वारीचेही एक चित्र त्या संग्रहात असून त्यावर महाराजांचे नाव आहे. कदाचित महाराजांच्या आग्रा भेटीत त्यांना पाहूनच मूळ चित्र काढले असेल. महाराजांभोवती जे अनुयायी चित्रात दाखविले आहेत त्यापैकी काहीजणांना दाढ्या आहेत; पण त्यांच्यापैकी बहुतेकांच्या कपाळाला गंध किंवा कानात बाळी ही तत्कालीन हिंदुत्वनिदर्शक चिन्हे आहेत.

महाराज विलासी नव्हते. औरंगजेबाच्या अधिकार्‍यांना पाठविलेल्या एका पत्रात त्यांनी स्वत:चा उल्लेख ‘विरक्त’ असा केला आहे. हिंदुस्थानात येऊन गेलेला शिवकालीन फ्रेंच प्रवासी तेव्नो याने महाराज दिवसातून फक्त एकदाच जेवतात, असे नमूद केले आहे. समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना अनुलक्षून लिहिलेल्या पद्यात ‘‘सकल सुखांचा केला त्याग’’ असे शिवरायांविषयी म्हटले आहे. पण तत्कालीन राजधर्म आणि रिवाज यांच्यानुसार महाराज आवश्यक असेल तेव्हा आणि विशेषत: परकीयांच्या दरबारात जाताना थाटामाटात आणि दिमाखात जात असत. आग्र्याला ज्याप्रमाणे ते सोन्याचांदीने मढविलेली पालखी वापरीत होते तशीच पालखी १६७७ मध्ये ते हैदराबादला गेले तेव्हाही त्यांनी वापरली.
समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे महाराज खरोखरच ‘श्रीमंत योगी’ होते.

साभार – दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य – रजिस्टर

Leave a Comment