मार्कंड ऋषी मंदिर, मार्कंड पिंपरी | Markand Rishi Temple, Markand Pimpri –
नाशिक जिल्ह्यातील कळवण पासून साधारणपणे १६ किलोमीटरवर वसलेले मार्कंड पिंपरी हे छोटसं गावं. श्री सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावापासून हे गावं अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिणेला मार्कंड ऋषींच्या तपश्चर्याने पावन झालेला मार्कंड गड तर पश्चिमेला श्री सप्तशृंगीगड ह्या दोन उंच गडांच्या मधोमध हे सुंदर गावं निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. गावात मार्कंड ऋषींचे पुरातन मंदिर आहे. तसेच गावचे वैभव असणारे एक शिवमंदिर पूर्वी गावात होते. आजमितीस मात्र या मंदिराच्या केवळ खाणाखुणा शिल्लक आहेत.Markand Rishi Temple, Markand Pimpri.
नामशेष झालेल्या शिवमंदिराचे अवशेष आपल्याला परिसरात विखुरलेले दिसतात. मंदिरातील शिवलिंग जवळच ठेवलेले असून त्यावर ग्रामस्थ आता नव्याने मंदिराचे बांधकाम करीत आहेत. मंदिराच्या परिसरात अजून एक छोटेखानी पुरातन मंदिर असून मार्कंड ऋषींच्या माता पित्यांचे हे मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या मंदिराची देखील आता पडझड होत आहे. मंदिराच्या आवारातून मार्कंडेश्वर पर्वत आणि सप्तशृंगी गडाचं मनमोहक रूप दिसतं.
नामशेष झालेल्या मंदिराचे अवशेष पाहिल्यानंतर आपल्या मनाला अतीव वेदना होतात. आपण खूप भाग्यवान आहोत कि, या इतिहासकालीन पुरातन वास्तूंचा वारसा पूर्वजांनी आपल्याकडे ठेवा म्हणून दिला आहे. अशा या इतिहासकालीन पुरातन वास्तू जपल्या पाहिजेत, त्यांचं संगोपन केलं पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना ह्या पुरातन वास्तूंचा इतिहास समजेल, नाहीतर काळाच्या ओघात हे सर्व त्यांच्या इतिहासासोबतच नामशेष होऊन जाईल.
रोहन गाडेकर